News Flash

अधूरा ऑपेरा..

‘क्या है तेरा गम बता’ (‘कलयुग’) हे डिस्को गाणे भाटियांनी सहज दिले, पण त्यांचा पिंड निराळा होता

लिरिल साबणाच्या जाहिरातीतल्या धबधब्याचा प्रपात आणि त्यातल्या मुलीची उत्फुल्लता या दोहोंना न्याय देणारी शब्दहीन ‘जिंगल’ वनराज भाटियांचीच आणि पंडित नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित हिंदी दूरदर्शन मालिकेमध्ये भारतीय तत्त्वज्ञान सांगणाऱ्या ऋग्वेदाच्या ऋचांचा धीरगंभीर साजही भाटियांचाच. या दोन्हींसाठी सिंथेसायझरसारख्या नव्या वाद्याचा वापर भाटिया लीलया करू शकले, याचे कारण पियानोवर त्यांची असलेली हुकमत. ऑक्सफर्ड वा केम्ब्रिज विद्यापीठात शिकण्याचा नातेवाईकांचा आग्रह असतानाही केवळ वडिलांच्या पाठिंब्यावर भाटिया लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये शिकले आणि तेथे नादिया बूलांजेर (बूलॉजे) यांची तालीम त्यांना मिळाली. पियानोचे भारतीयीकरण शंकर जयकिशनपासून अनेकांनी केलेच होते; पण ते प्रेमगीते/ विरहगीते यांपुरते. भाटियांनी पियानोची दुहेरी स्वरयोजनाच आपल्या संगीताचा प्राण बनवली. म्हणूनच, ‘तुम्हारे बिन जी ना लागे घरमें’ (‘भूमिका’) या गीताची लावणीसदृश चाल असो की ‘मेरो गाम कथा परे’ (‘मंथन’) हे काठियावाडी चालीतील गीत असो, पियानो जणू नसानसांत भिनलेल्या भाटियांनी या पारंपरिक चालींमध्ये गायिकेच्या गळ्यातच दुहेरी स्वरयोजनेची गंमत आणली. सतारीचा पियानोऐवजी आणि पियानोसारखा वापर ताकदीने करणारे भास्कर चंदावरकरांनंतर वनराज भाटियाच, हेही ‘तुम्हारे बिन’च्या दोन कडव्यांमधील संगीत जेथे थांबते, तेथे चटकन समजते.

‘क्या है तेरा गम बता’ (‘कलयुग’) हे डिस्को गाणे भाटियांनी सहज दिले, पण त्यांचा पिंड निराळा होता. त्यांना हे जमले, याचे कारण त्यांनी पाश्चात्त्य संगीताची रीतसर तालीम घेतली होती आणि बालपण मुंबईतच गेल्यामुळे भारतीय अभिजात संगीताचेही रीतसर शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांचे संगीत एकाच वेळी जागतिक आणि त्याच वेळी मातीचा सुगंध असणारे होऊ शकले. बिथोवन, मोझार्ट, शूबर्ट, शोपीन या पाश्चात्त्य संगीतातल्या पंडितांएवढेच वनराज भाटिया भारतीय परंपरेतील बडे गुलाम अली खाँ, नौशाद व खय्याम या उस्तादांच्या मांदियाळीत शोभणारे होते. ‘सरदारी बेगम’ या चित्रपटातील आरती अंकलीकर आणि आशा भोसले यांची सर्वच गाणी, अशाच तवायफी गीतांना ‘मण्डी’मध्ये दिलेला काहीसा छचोर बाज, ‘तमस’ या दीर्घपटाच्या शीर्षकगीताऐवजी योजलेली ‘ओ रब्बा’ ही आर्त आळवणी यांमधून हे उमगते. कारण तेथे भारतीय संगीतात त्यांनी पाश्चात्त्य वाद्यांचा अप्रतिम उपयोग के ला. त्यामुळे भाटिया वेगळेच ठरतात. वैविध्याच्या आकर्षणापायी केवढी मेहनत ते घेत, हे ‘मण्डी’मध्ये शबाना आज्ममीने स्वत:च गुणगुणत म्हटलेले ‘कित्ति बार बोला ना’ हे दख्खनी गीत किंवा ‘जो लरे दीनके हेत सूरा सोही’ हे ‘तमस’मधले पंजाबी गीत ऐकायला हवे. भाटिया सिद्धहस्तही होतेच, याची प्रचीती ‘खानदान’, ‘वागळे की दुनिया’ आदी मालिकांसाठी त्यांनी दिलेल्या शीर्षक संगीतातून येते. ‘म्युझिक फॉर मेडिटेशन’ या दोन सीडींच्या संचात पियानोचा सढळ वापर करू न भारतीय आध्यात्मिक अनुभव घेण्याची त्यांची आस श्रोत्याला भिडते.

जाहिरातींच्या सुमारे सात हजार जिंगल्स हे त्यांच्यासाठी उपयोजित संगीत होते. पण दिल्लीत परत येऊन तेथील विद्यापीठात प्रपाठक म्हणून काम करण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष संगीतात उतरण्याचे ठरवले, कारण तीच त्यांची मानसिक गरज होती. त्या जिंगल्समुळेच श्याम बेनेगल यांनी त्यांना ‘अंकुर’ या चित्रपटासाठी पाचारण केले. तेव्हा भाटियांचे वय होते ४५ वर्षे. परंतु त्यानंतर ते सातत्याने त्यांना हवे ते आणि तसेच संगीत करत राहिले. भारतीय चित्रपटांच्या मुख्य प्रवाहाने त्यांना कधी आपलेसे मानले नाही. भाटिया यांना त्याबद्दल आयुष्यात कधी खंतही वाटली नाही. त्यांच्या समकालीन संगीतकारांमध्ये त्यांच्याएवढे शैलीवैविध्य फारच थोडय़ांकडे होते. केवळ पाचच वादकांमध्ये प्रचंड मोठा ऑर्केस्ट्राचा भास निर्माण करण्यासाठी जी प्रज्ञा लागते, ती त्यांच्यापाशी होती. त्यामुळे कमी खर्चाचे संगीतकार अशी जरी त्यांची ओळख राहिली, तरी अतिशय दर्जेदार संगीतकार अशी स्वतंत्र ओळख त्यांच्या संगीतानेच त्यांना मिळवून दिली. लंडनला शिकायला गेल्यापासून भाटिया यांचे ऑपेरा निर्माण करण्याचे स्वप्न होते. भारतीय संगीत व्यवस्थेत त्यांना ते क्वचितच शक्य झाले. गिरीश कार्नाड यांच्या ‘अग्निवर्षां’ या नाटकाचे संगीत भाटिया यांचे. यानिमित्ताने ऑपेरा निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न साकार होणार होते. ते त्यांनी केलेही, परंतु रसिकांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली. तरीही आयुष्याच्या शेवटापर्यंत वनराज भाटिया यांना ते अधूरे स्वप्न पुरे करण्याचा ध्यास राहिलाच. जागतिक संगीताच्या संदर्भात कोणालाही काम करताना ‘मेलडी’ आणि ‘सिम्फनी’ या दोन स्वरतत्त्वांवर हुक मत मिळवावीच लागते. भाटिया यांनी ती स्वकष्टाने मिळवली होती आणि त्याचा अतिशय कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण उपयोग त्यांनी त्यांच्या विविधांगी संगीतात के ला. भारतीय संगीतात ते ‘अनसंग हिरो’ राहिले तरी त्यांच्या चाहत्यांसाठी मात्र अतिशय वरच्या दर्जाचे कलावंत अशीच त्यांची कधीही न पुसली जाणारी ओळख राहील!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 3:07 am

Web Title: article about indian composer vanraj bhatia zws 70
Next Stories
1 ‘काशी- मथुरे’तील पीछेहाट…
2 ब्रेग्झिटोत्तर भ्रातृभाव
3 मुरब्बी प्रशासक
Just Now!
X