करोनाकाळात एखाद्या प्रचंड व्याप असणाऱ्या परीक्षेचा निकाल लावणे ही किती मोठी कसरत असते, याचा अभूतपूर्व अनुभव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला आला आहे. अनंत अडचणींचा डोंगर पार करत करत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्याबद्दल या मंडळाचे अभिनंदन. बारावीच्या परीक्षेला जे १४ लाख १३ हजार विद्यार्थी बसले होते, त्यांना परीक्षा देताना नंतरच्या काहीच दिवसांत करोनासारखे महाभयंकर संकट उद्भवणार आहे, याचा मागमूसही नव्हता. परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना निकाल लागेल की नाही, अशीच भीती वाटत होती आणि ती रास्तही होती. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे, त्या तपासून घेऊन नंतर पर्यवेक्षण करणाऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचे एकत्रीकरण करून निकाल तयार करणे; यासाठी कमी कर्मचारी असूनही जी काही धावपळ झाली, ती एका अर्थाने सार्थकी लागली असे म्हणायला हवे. याचे कारण राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांना कोणतीच परीक्षा व्हावी, असे वाटत नाही. परीक्षा न घेता वरच्या वर्गात ढकलण्याने विद्यार्थ्यांचे हित साधले जाईल, याची त्यांना खात्री आहे. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतरच्या शिक्षणाची जी स्वप्ने पाहिली होती, त्यांना या निकालाने पंख फुटू शकतील. गेल्या काही वर्षांत कला शाखेकडे कल वाढत असून गेल्या वर्षीही वाणिज्य शाखेपेक्षा कला शाखेसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच जास्त होती. यंदाचा बारावी निकाल गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी म्हणजे ९०.६६ टक्के इतका लागला. मागील वर्षीचा ८५.८८ टक्के निकाल हा नीचांकी होता. याचा अर्थ, शक्य तेवढय़ा सगळ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या मांडवाखालून अलगदपणे कसे बाहेर पडता येईल, यालाच यंदा प्राधान्य देण्यात आले. एवढय़ा उच्चांकी निकालातही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा तीन हजाराने वाढून ७,३४४ आहे. बारावीचा निकाल लागला म्हणून पुढचे गाडे सुरळीत चालेल, अशी मात्र सुतराम शक्यता नाही. करोनामुळे एकूणच शैक्षणिक वेळापत्रक पार कोलमडलेले असल्यामुळे विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी आणखी किती काळ लागेल, हे आज तरी सांगता येणे शक्य नाही. सर्वात अधिक अडचण आहे, ती विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची. वैद्यकीय व अभियांत्रिकी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केवळ बारावीला उत्तम गुण असून चालत नाही. त्यासाठी पुन्हा स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा द्यावी लागते. जेईई, नीट यांसारख्या अशा देश पातळीवरील सामायिक प्रवेश परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत. त्या कधी होतील याबाबत अद्याप पुरेशी स्पष्टता नाही. राज्यातील एमएचसीईटी परीक्षाही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे दोलायमान अवस्थेत या निकालाला राज्यातील विद्यार्थी सामोरे जात आहेत. ज्यांना सरळपणे बीए, बीएस्सी, बीकॉम या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनाही अद्याप पुढील मार्ग स्पष्ट झालेला नाही. ४० ते ८० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तर नंतरच्या काळात चाचपडतच राहावे लागेल की काय, अशी स्थिती आहे. उद्योगांची सध्याची केविलवाणी स्थिती पूर्ववत होण्यास किती काळ लागेल, हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे कोणता अभ्यासक्रम निवडला तर किमान नोकरीची शाश्वती आहे, याबाबतही सर्वत्र साशंकता आहे. बारावीच्या गुणांच्या आधारे आयुष्यात फार काही साध्य होत नाही, हे कटू सत्य पचवून या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याला सामोरे जायचे आहे. उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत असतानाच या अशा चाचपडणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणे म्हणूनच आवश्यक आहे.