परराष्ट्र व्यवहारांत आणि त्यातही दोन देशांतील सशस्त्र संघर्ष अथवा सीमावादासारख्या परिस्थितीत शूरासारखे बोलण्यापेक्षा अनेकदा गप्प राहणेच उपयुक्त ठरते. हे सत्ताधाऱ्यांपैकी काहींना कळणे आणि काहींना न कळणे, ही अवस्था बरी नव्हे. देशाचे महामार्ग-राज्यमंत्री निवृत्त लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग यांची वक्तव्ये या अवस्थेचे पुरेपूर सूचन करतात. या सिंग यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात केलेले ताजे वक्तव्यही बाष्कळ म्हणावे लागते, कारण सरकारातील सिंग यांचे वरिष्ठ जे म्हणताहेत त्याच्याशी ते विसंगत आहे. सिंग यांच्यासाठी सर्वोच्च वरिष्ठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ‘भारताच्या हद्दीत कोणतीही घुसखोरी झालेली नाही. लडाखमधील कोणत्याही सीमासुरक्षा ठाण्याच्या भागात कोणी घुसलेले नाही’ असे विधान मोदी यांनीच १९ जून २०२० रोजीच्या चित्रवाणी-संवादात केले होते हे खरे, पण त्या विधानापासून आता भारत बराच दूर आलेला आहे. देशातील १५ प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी झालेला तो संवाद देशभरातील चित्रवाणी-वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपित केला होता.  मात्र त्यानंतर काही काळात असाही खुलासा करण्यात आला की, चीनने घुसखोरी केलेलीच होती परंतु भारतीय जवानांनी त्यास चोख प्रत्युत्तर देऊन ती परतवून लावली. वास्तविक ‘घुसखोरी परतवून लावली’ अशा अर्थाच्या त्या खुलाशानंतर चीनशी कोणतीही चर्चा, वाटाघाटी आदी करण्याची गरजच उरली नसती; तथापि तसे झालेले नसून ज्याअर्थी वाटाघाटींची दहावी फेरीदेखील होणार आहे, त्याअर्थी संघर्षांचे कारण शमलेले नाही. या वाटाघाटींच्या नऊ फेऱ्यांत काय झाले ते सांगा असा आग्रह ना प्रसारमाध्यमे धरतात, ना विरोधी पक्षीय. कारण या बाबतीतील मौनाचे महत्त्व सर्वच संबंधितांना माहीत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चीनविषयी फार बोलत नाहीत, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही मोजकेच बोलतात, त्यापैकी ताजे वक्तव्य म्हणजे नऊ फेऱ्यांनंतर जमिनीवरील स्थितीत काही फरक पडलेला नसला तरीही दहाव्या फेरीच्या वाटाघाटी होतील आणि त्याही नित्याप्रमाणे, लष्करी अधिकाऱ्यांमध्येच होतील. अशा वेळी राजकीय नेतृत्वाने वाटाघाटींत आपल्या बाजूचा फायदा होईल, अशा रीतीने काही वक्तव्य करणे एकवेळ ठीक. पण व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्याचा लाभ चीनच घेऊ पाहातो आहे. ‘‘चीनने जर भारतीय हद्दीत दहा वेळा घुसखोरी केली असेल, तर भारतीय जवान चीनच्या हद्दीत ५० वेळा घुसलेले असतील’’ असे सिंग यांचे विधान. त्यावरून चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्याने, भारतच अधिक वेळा घुसखोरी करतो याची ही कबुलीच आहे, असे तर्कट मांडले. वास्तव तसे नाही, हे चीनचे नाव न घेता ‘वर्चस्ववादी शक्ती’ असा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्यापासून साऱ्याच भारतीयांना माहीत आहे. तरीही चीनकडून हा टोला भारतास ऐकावा लागला, तो सिंग यांनी मदुरै येथे शनिवारी केलेल्या वक्तव्यामुळे. मुळात सिंग यांनी त्या पत्रकार परिषदेत हेही सांगितले की, ‘भारत- चीन सीमा’ ही बव्हंशी भारताच्या व चीनच्या कल्पनेवर अवलंबून आहे आणि त्या कल्पनांत मतभेद असल्यामुळे ‘घुसणे’ कशाला म्हणावे हे धूसर ठरू शकते. पण एवढेच सांगून न थांबता, भारताला अधिक चढाईखोर ठरवणारे आकडे त्यांच्या तोंडून निघाले! सत्ताधारी पक्ष व त्याच्या समर्थकांची गेल्या काही वर्षांतील पद्धत अशी की, कोणतीही आगळीक घडल्यास ‘काय चुकले त्यात?’ असे म्हणायचे. त्या चालीवर ‘भारताने चीनवर आक्रमण केल्याचे दु:ख होते काय?’ असेही देशबांधवांनाच विचारण्याचे प्रकार सिंग यांच्यासाठी घडू शकतील. परंतु प्रश्न शौर्य मोजण्याचा आहे की मुत्सद्देगिरीचा, हे न ओळखणे नुकसानकारकच, असे इतिहास सांगतो.