07 July 2020

News Flash

‘बाणा’ हरवलेले लेखक..

संकटाच्या काळात व्यक्त होणे हे केव्हाही चांगलेच; पण त्याला कृतिशीलतेची जोड मिळत असेल तर ते अधिक चांगले.

संग्रहित छायाचित्र

 

प्रतिभावंतांकडून राज्यकर्त्यांच्या निर्णयाची चिकित्सा अपेक्षित असते. चिकित्सा करणाऱ्यावर जहरी टीका होते. आजच्या करोना- आपत्तीकाळात काही प्रश्न केंद्र व राज्य सरकारमुळेही निर्माण झाले वा चिघळले. पण त्याकडे न पाहता केवळ दु:ख व सहानुभूती व्यक्त करून थांबणाऱ्यांना साहित्यिक म्हणावे की ‘पापभीरू’ असा प्रश्न राज्यातील नामवंत लेखकांचे निवेदन वाचून कुणालाही पडेल. संकटाच्या काळात व्यक्त होणे हे केव्हाही चांगलेच; पण त्याला कृतिशीलतेची जोड मिळत असेल तर ते अधिक चांगले. लेखकाने कृतिशील व्हावे की नाही, हा वादाचा मुद्दा ठरवणे हीच चक्क पळवाट आहे व तिचाच वापर हे प्रतिभावंतांचे वर्तुळ आजवर करत आले आहे. करोनाकाळावर भाष्य करणारे साहित्यिकांचे ताजे निवेदन याच वाटेने जाणारे आहे. करोनाशी दोन हात करताना सरकारांनी गेल्या दोन महिन्यांत अनेक मोठे निर्णय घेतले. त्यातील बहुसंख्य निर्णयांवर माध्यमात चिकित्सा होत असताना लेखकांनी त्याला स्पर्श न करता केवळ ‘शोकाकुल’ व ‘उद्विग्न’ व्हावे हे या वर्गाला अजिबात शोभणारे नाही. जगभरातील प्रतिभावंत परखडपणे व्यक्त होत असताना मराठी लेखकांनी अशी बोटचेपी भूमिका घेण्याचे कारण काय? ‘चिकित्सेला सरकारच्या प्रशंसेने प्रत्युत्तर’ असा पत्रकबाजीचा नवा प्रकार सरकारसमर्थकांनी गेल्या दीड वर्षांत सुरू केला; त्या धोरणाला हा वर्ग घाबरला काय? असे घाबरून टीकेचा प्रतिक्रियावाद विसरणे हेसुद्धा नेळभटपणाचे लक्षण. ते या मान्यवरांच्या वर्तुळात दिसू लागणे हे मराठी साहित्यासाठी आणखीच लाजिरवाणे! या आजाराने साऱ्या समाजाचीच घडी विस्कळीत करून टाकली. या स्थितीला तोंड देण्यासाठी शेकडो हात पुढे सरसावले. दानशीलतेचे आवाहन करणे सोपे, पण त्यासाठी रस्त्यावर उतरून पुढाकार घेणे कठीण. हे कठीण काम काही अपवाद वगळता लेखकांचा वर्ग कुठे करताना दिसला नाही. या वर्गाचा चाहता समाजाच्या सर्व स्तरांत पसरलेला आहे. आजही लेखकांविषयी समाजात आदराची भावना आहे. त्याचा फायदा घेत हा वर्ग या कठीण काळात कृतिशीलतेचे अनेक नवे धडे गिरवू शकला असता. पण तसे घडताना कुठे दिसले नाही. टाळेबंदी लादणे, ती उठवणे व करोनाचा कहर आणखी वाढत जाणे यातील सरकारी धोरणांची विसंगती स्पष्टपणे जाणवत असतानासुद्धा लेखकांनी त्यांच्या निवेदनात टाळेबंदी हा शब्दही उच्चारू नये याला काय म्हणायचे? कदाचित सर्व विचारांचे लोक एकत्र येऊन निवेदन काढण्याच्या प्रयत्नात या शब्दाला तिलांजली दिली गेली असावी. असे असेल तर ही कचखाऊ वृत्ती या वर्गाला खचितच शोभणारी नाही असे खेदाने म्हणावे लागते. या काळात मजुरांचे लोंढे रस्त्यावरून चालत होते. खरे तर हे नियोजनशून्यतेचे मूर्तिमंत प्रतीक. तरीही लेखक ‘ही आपत्ती आपण निर्माण केली’ असे म्हणत ‘सरकार’ला अलगद बाहेर ठेवतात हा बोटचेपेपणा झाला. या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला. त्याचा फटका लेखकांसकट सर्वाना बसणार आहे हे सत्य ठाऊक असूनसुद्धा हे निवेदन त्यावर भाष्य करण्याचे टाळते. याच मुद्दय़ावर राजीव बजाजसारखे महाराष्ट्रीय उद्योगपती स्पष्ट व परखड भूमिका मांडून टीकेचे आसूड ओढवून घेत असताना; काहीही गमावण्यासारखे नसलेल्या लेखकांनी त्यापासून पळ काढावा हे मराठी संस्कृतीला शोभणारे नाही. सर्वाना मोफत उपचार, आरोग्य सेवेचे राष्ट्रीयीकरण यांसारख्या मागण्यांना पुढे रेटण्यासाठी प्रतिभावंतांची गरज नाही. सर्वसामान्यसुद्धा ते करू शकतात याची जाणीव या वर्गाला झाली नसेल काय? लेखक शेवटी नामदेव ढसाळांच्या एका ओळीचा उल्लेख करतात. आज ढसाळ असते तर परखड मत नोंदवण्यासोबतच कृतिशीलतेतही आघाडीवर राहिले असते व प्रत्येकाच्या वाटय़ाला तीळ कसा येईल यासाठी लढले असते. मराठी लेखकांमधला हा बाणा हरवत जाणे वेदनादायी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 12:02 am

Web Title: article on statements from writers commenting on the corona period abn 97
Next Stories
1 गांभीर्य ओळखण्याची परीक्षा
2 मध्यमवर्गाचा भाव-इतिहासकार!
3 ‘टाळेबंदी’ची नि:स्पृह चिकित्सा!
Just Now!
X