घटनेच्या ३७० कलमानुसार जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच काँग्रेसमध्ये मात्र या निर्णयावरून मोठा वैचारिक गोंधळ उडाला आहे. पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया, जनार्दन द्विवेदी, मिलिंद देवरा, माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री आदी नेत्यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. या पाठोपाठ आता हरयाणामधील पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दोनदा मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या भुपिंदरसिंह हुडा यांनी ३७० कलमावरून काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर जाहीरपणे टीकास्त्र सोडत या मुद्दय़ावर पक्ष भरकटल्याची भावना व्यक्त केली. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय हा प्रखर राष्ट्रवादाशी जोडण्यात भाजप यशस्वी झाल्याने त्याला विरोध करणे काँग्रेस नेत्यांना अवघड जाते. पुलवामा आणि बालाकोटवरील हल्ल्याची उमटलेली प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी अनुभवली आहे. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री हुडा यांनी ३७० कलमाचा आधार घेत पक्षाला लक्ष्य करीत स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, असेच म्हणावे लागते, कारण हुडा यांचे दुखणे वेगळेच आहे. महाराष्ट्राबरोबरच हरयाणामध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून, राज्य काँग्रेसची सारी सूत्रे पक्षाने आपल्या हाती सोपवावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे. हुडा यांनी सातत्याने मागणी करूनही प्रदेशाध्यक्षाला बदलण्याचे दिल्लीतील नेतृत्वाने आतापर्यंत तरी टाळले. जाणीवपूर्वक हुडा यांच्या राजकीय विरोधकाला प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवण्यात आले. लोकसभा निवडणुकीत हुडा आणि त्यांचे पुत्र दोघेही पराभूत झाले. काँग्रेस नेतृत्वाला हुडा यांना झुकते माप द्यायचे नाही हे स्पष्टच जाणवते. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या कंपनीने हरयाणामध्ये काँग्रेसची सत्ता असताना स्वस्तात जमिनी खरेदी करून त्या बडय़ा विकासकांना चढय़ा किमतीत विकल्या होत्या. या साऱ्या व्यवहारांना तत्कालीन मुख्यमंत्री हुडा यांनी मदत केली होती. या व्यवहारांपायी गेल्या चार वर्षांपासून वढेरासह हुडादेखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. वढेरा यांना केलेली मदत किंवा सोनिया गांधी यांनी राजकारणात सक्रिय व्हावे म्हणून १९९७च्या सुमारास काँग्रेस मुख्यालयासमोर केलेली घोषणाबाजी, यामागे पक्षनेतृत्वाने हरयाणामध्ये आपल्याला सारे अधिकार द्यावेत, अशी हुडा यांची अपेक्षा आहे. मात्र ‘पक्ष भरकटला आहे’ अशा टीकेनंतरही काँग्रेस पक्षात कायम राहणार की स्वतंत्र पक्ष स्थापन करणार हे पत्ते हुडा यांनी खुले केलेले नाहीत. सोनिया गांधी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो याची वाट बघून पुढील निर्णय हुडा घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षात सध्या निर्नायकी निर्माण झाली आहे. कर्नाटक, गोव्यातील आमदार सहज फुटले. विधानसभेची निवडणूक होत असलेल्या झारखंडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजोय कुमार यांनी ऐन ऑगस्ट क्रांतिदिनी, राज्यातील स्वपक्षीय नेत्यांवर आरोप करीत राजीनामा दिला. महाराष्ट्रातील काही नेत्यांना भाजप किंवा शिवसेना प्रवेशाचे वेध लागले आहेत. चारच दिवसांपूर्वी नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे चार कार्याध्यक्षांसह हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले तेव्हाच नेमके पाचवे कार्याध्यक्ष विश्वजित कदम हे पूरग्रस्तांच्या मदतीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर कदम यांना पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करावे लागले. नेतृत्वाला खूश ठेवण्यासाठी इतरांच्या कलागती करण्याचे दिवस संपून काँग्रेसमध्ये आता, नेतृत्वाला असुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:ची नाखुशी जाहीरपणे व्यक्त करण्याचे दिवस आले आहेत.