27 February 2021

News Flash

..त्याच्या ‘विशी’चे रहस्य!

२०वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावल्यानंतर रॉजर फेडरर परत एकदा भावनावश झाला.

रॉजर फेडरर

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद सहाव्यांदा आणि एकूण २०वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावल्यानंतर रॉजर फेडरर परत एकदा भावनावश झाला. असाच भावनावश तो पहिलीवहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा (विम्बल्डन २००३) जिंकल्यावरही झाला होता. कारण जेतेपदाचे मोल, नवलाई, आनंद, समाधान या सगळ्या भावना फेडररमध्ये अजूनही जिवंत आहेत. अजिंक्य राहण्याच्या ईष्र्येपेक्षाही टेनिसवरील प्रेम अधिक आहे. देशोदेशीचे टेनिसरसिक फेडररचे कुटुंबीय असतात. म्हणूनच ३६ व्या वर्षी त्याच्यापेक्षा वयाने तरुण असलेल्या आणि आकार व शक्तीने अधिक असलेल्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध पाच सेट्समध्ये सामना जाऊनही फेडरर जिंकू शकतो. क्रोएशियाचा मरिन चिलिच हा साधासुधा प्रतिस्पर्धी नव्हे. राफाएल नडाल, नोव्हाक जोकोविच, अँडी मरे आणि खुद्द फेडरर यांच्या गेल्या दशकभरातील टेनिसमधील साम्राज्याला आव्हान देणाऱ्या अत्यंत मोजक्या टेनिसपटूंपैकी तो एक. २०१४ मधील अमेरिकन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत फेडररचा धक्कादायक पराभव करून चिलिच पहिल्यांदा प्रकाशात आला. चिलिचने ती स्पर्धाही जिंकली. थोडक्यात, रविवारच्या अंतिम लढतीत दोघांचे पारडे समसमान होते. तो सामना पाच सेट्समध्ये गेला, त्या वेळी फेडररची दमछाक होईल, असा अनेकांचा होरा होता. फेडररने तो खोटा ठरवत हा सेट ६-१ असा आरामात जिंकला. फेडररचे तीन प्रमुख प्रतिस्पर्धी राफाएल नडाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे वेगवेगळ्या दुखापतींनी बेजार आहेत. तिघेही फेडररपेक्षा लहान आहेत, पण त्यांच्या कारकीर्दीना आता दुखापतींची घरघर लागली आहे. फेडररमागेही काही वर्षांपूर्वी दुखापतींचा स्वाभाविक ससेमिरा लागला होताच. येथेच त्याच्यातील आणि इतरांमधील फरक ठळकपणे जाणवणारा आहे. २०१३ मध्ये त्याला पाठीच्या दुखापतीने सतावले. २०१६ मध्ये त्याला गुडघ्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. पण या दोन्ही दुखापतींमधून फेडरर सावरला. इतकेच नव्हे, तर पुन्हा पहिल्यासारखा बहरूही लागला. ही आकडेवारी पाहाच : २०१२ मध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर त्याला तब्बल साडेचार वर्षे एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आली नव्हती. पाठोपाठच्या दुखापती फेडररला नामशेष ठरवू पाहत होत्या. पण या काळात मानसिक कणखरपणाला शारीरिक मेहनतीची जोड देत फेडरर नव्या जोमाने, नव्या दमाने खेळू लागला आणि गेल्या १२ महिन्यांत त्याने ऑस्ट्रेलियन (२०१७, २०१८) आणि विम्बल्डन (२०१७) अशा तीन स्पर्धा जिंकून दाखवल्या. ताकदीपेक्षा नजाकतीवर आणि टायमिंगवर भर दिल्यामुळे फेडररच्या शरीराला इतरांच्या तुलनेत कमी आघात पचवावे लागतात, हे त्याच्या प्रदीर्घ तंदुरुस्तीचे एक गुपित आहे. योग्य उपचार आणि दुखापतीनंतरची योग्य काळजी या द्विसूत्रीच्या जोरावर त्याने आपली कारकीर्द लांबवलेली आहे. प्रसंगी तो एखाद-दुसऱ्या स्पर्धेत खेळतही नाही. त्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवर झाला, तरी फेडरर त्याची फारशी फिकीर करीत नाही. टेनिसमध्ये तो महान असला, तरी टेनिस त्याच्या दृष्टीने सर्वस्व नाही. फेडरर कुटुंबवत्सल आहे. आपली पत्नी आणि दोन जुळ्या मुली व दोन जुळे मुलगे, आई-वडील अशा विशाल कुटुंबाबरोबर राहणे त्याला आवडते. नैराश्यग्रस्त असताना कोणत्याही खेळाडूसाठी त्याच्या कुटुंबाचा आधार आणि प्रेम याच्याइतके दुसरे टॉनिक नाही, असे फेडररच एकदा म्हणाला होता. तो अजूनही काही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणार याविषयी त्याच्यापेक्षा अधिक खात्री त्याच्या चाहत्यांना वाटते. फेडरर त्याविषयी चिंताग्रस्त नाही; हे त्याच्या तंदुरुस्तीमागील आणि जिंकत राहण्यामागील रहस्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 2:13 am

Web Title: federer gets emotional after winning australian open
Next Stories
1 अमर्याद अधिकारही धोक्याचे
2 महाभियोगाचा व्यर्थ प्रचारखेळ
3 पुरातन विरुद्ध अद्यतन
Just Now!
X