मोठय़ा निवडणुकांच्या तोंडावर देशात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण होण्यासाठी चिथावणीखोर वर्तन वा वक्तव्ये करणे हे या देशातील जनतेसाठी अजिबात नवे नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर असे प्रकार देशभरात कुठे ना कुठे घडण्याची, घडवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे गृहीत धरल्यानंतरही हरयाणातील गुडगाव किंवा गुरुग्राम येथे गुरुवारी धुळवडीच्या सायंकाळी घडलेला प्रकार धक्कादायक आणि संतापजनक ठरतो. गुरुग्राम येथील धमसपूर गावात गुरुवारी सायंकाळी मोहम्मद साजिद याच्या घरात घुसून २० ते २५ जणांच्या जमावाने त्याला, त्याच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. या गुंडांनी त्या वेळी साजिदच्या घरात उपस्थित असलेल्या महिला आणि लहान मुलांनाही सोडले नाही. साजिदच्या घराची, घरातील सामानाची, घरासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलींची मोडतोड करून हे गुंड निघून गेले. त्यांच्या या कृतीमागील कारण फारच किरकोळ होते. त्या दिवशी दुपारनंतर साजिदचा पुतण्या दिलशाद आणि काही जण घराजवळच क्रिकेट खेळत असताना दोघे जण तेथे आले आणि ‘येथे काय करता, पाकिस्तानात जाऊन खेळा,’ असे सांगत त्यांना धमकावू लागले. साजिदने मध्ये पडून परिस्थिती निवळवण्याचा प्रयत्न केला असता, त्याला रट्टे खावे लागले. त्यांच्याशी भांडणारे दोघे परत गेले, पण तासाभरात मोटारसायकलींवर त्यांच्या दोस्तांसह, भाले, तलवारी, लाठय़ा असा जामानिमा घेऊन परतले. मारहाण होईपर्यंत साजिद आणि त्याचे कुटुंबीय आक्रोश करत राहिले, पण त्यांच्या मदतीला आजूबाजूचे कोणीही धावून आले नाही. या प्रकाराबद्दल भोंडशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर शनिवारी महेशकुमार नामक एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र बाकीचे अजूनही बाहेरच आहेत. वरकरणी हा किरकोळ भांडण विकोपाला जाण्याचा एखादा प्रकार असल्यासारखे दिसत असले, तरी त्याला अनेक कंगोरे आहेत. मोहम्मद साजिद तीन वर्षांपूर्वी नव्या घरी राहायला आल्यानंतर परवाचा प्रकार घडेपर्यंत आसपासच्या कोणीही त्याच्याशी फारसे संबंध ठेवलेले नव्हते. स्थानिक नगरसेवकाने साजिदची भेट घेऊन त्याची व कुटुंबीयांची विचारपूस वगैरे केली. पण हे महाशय झाल्या प्रकाराला ‘दोन गटांतील वाद’ असे संबोधून मोकळे झाले. पोलिसांनी आजवर एकालाच अटक केली आहे. साजिद आणि त्याचे कुटुंबीय वगळता कोणीही साक्षीदार म्हणून रविवापर्यंत तरी पुढे आले नव्हते. या प्रकाराबद्दल विरोधी पक्षीयांनी टीकेची झोड उठवलेली असली, तरी हरयाणातील सत्तारूढ भाजप नेत्यांनी किंवा राष्ट्रीय पातळीवर नेत्यांनी (हा प्रकार नवी दिल्लीपासून फार दूरवर घडलेला नाही) प्रतिक्रिया दिलेली नाही. मोहम्मद साजिद हा तुलनेने सुस्थित मुस्लीम होता, तरीही त्याच्यावर अशी वेळ येऊ शकते हे अस्वस्थ करणारे आहे. ‘पाकिस्तानात चालते व्हा’ असे सांगणाऱ्यांची संख्या आणि हिंमत विद्यमान सरकारच्या अमदानीतच अधिक वाढलेली आहे. गुरुग्रामच्या घटनेत कोणी दगावले असते, तरच राज्य आणि केंद्र सरकार  या प्रकाराची दखल घेणार होते का? स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्यांच्या राज्यात मोहम्मद साजिदसारख्यांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची कोणाही चौकीदाराची इच्छा नाही, हेच आतापर्यंत दिसून आलेले आहे. सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांनी, एखाद्या जाहीर सभेत या घटनेचा उल्लेख करून खेद व्यक्त करतील, सलोख्यालाच आपल्या सरकारचे प्राधान्य असल्याचे जाहीरही करतील. त्यापेक्षा अधिक अपेक्षा- सर्वच्या सर्व हल्लेखोरांना त्वरित अटक व्हावी आणि यापुढे अशा प्रकारांना जरब बसवली जावी ही अपेक्षा- सत्ताधाऱ्यांकडून करणे चूक आहे काय? त्याऐवजी विविध राज्यांत लोक कायदा हातात घेत आहेत आणि बघ्यांच्या जमावाप्रमाणेच ‘कायदा-सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय’ म्हणत केंद्रातील धुरिण जबाबदारी झटकताहेत, हेच दिसले आहे. केंद्रातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी निवडणूक काळात याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल, तर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना त्यांनी या प्रकरणात लक्ष घालायला लावावे.  हा मुद्दा केवळ ‘मोहल्ल्या’बाहेर येणाऱ्या अल्पसंख्याकांचा नसून असहाय स्थलांतरितांचाही आहे. सहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातून आलेल्या साजिदने तीन वर्षे खपून स्वत:चे घर गुरुग्राममध्ये उभे केले होते. स्थानिक प्रशासन, स्थानिक पोलीस, स्थानिक नेतृत्व यांच्या निष्क्रियतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या उदासीनतेतून असे प्रकार इतरत्र झाल्यास, अंतिमत: ते मोदी सरकारच्या निष्क्रियतेचे आणि उदासीनतेचे प्रतीक ठरू लागतील. चौकीदार केवळ ट्विटर हॅण्डलपुरता मर्यादित राहणे जसे निरुपयोगी, तसेच चौकीदार म्हणवणाऱ्यांनी स्वत: कायदा हाती घेणेही अयोग्यच.