X

स्वयंपूर्णतेची भरारी

इस्रोच्या ‘सतीश धवन तळा’वरून सोमवारी झेपावलेल्या या विमानाचा प्रवास ७७० सेकंदांत पूर्ण झाला.

चंद्रापासून मंगळापर्यंत स्वारी करण्याची आकांक्षा बाळगणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही एरवीही भारतीयांच्या कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय आहेच. ‘अंतराळविमाना’सारखे प्रयोग यशस्वी झाले की या अभिमानालाही भरते येते आणि ‘मानवी अंतराळ प्रवास कधी?’ किंवा ‘मंगळयान काय नवी माहिती देणार?’ यासारखे कुतूहल पुन्हा जागे होते. जगातील प्रगत देशांच्या तुलनेत संस्थेची वाटचाल कासवगतीची असल्याची जाणीव याच कुतूहलयुक्त प्रश्नांमधून होते.. परंतु ‘इस्रो’ची गती कमी असली, तरी ती देशाला खूप काही देणारी ठरते आहे. याचे कारण स्वावलंबन! अल्पावधीत प्रगतीची तद्दन यशवादी गणिते बाजूला ठेवून इस्रो काम करत राहिली, म्हणून अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत स्वतच्या पायावर उभा राहण्यास सक्षम झाला. पुनर्वापरयोग्य यान किंवा ‘अंतराळविमाना’च्या यशस्वी चाचणीनंतर पुन्हा एकदा इस्रोने जगातील अंतराळ संशोधन करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. या चाचणीत एकदा सोडलेले यान अंतराळातून पुन्हा वातावरणात परत आणण्याचा आणि ठरलेल्या जागीच उतरवण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आपण गाठला. अमेरिकादी देशांनी हे प्रयोग कितीतरी आधी केलेले आहेत, हे खरेच. जगातील इतर देशांमध्ये अंतराळ संशोधनासाठी उपलब्ध असलेले अर्थसाह्य, राजकीय इच्छाशक्ती आणि समाजाची विज्ञानाभिमुख मानसिकता हे सर्व स्वातंत्र्योत्तर भारतात रुजण्यास बराचसा वेळ गेला यामुळेच देशाला हा टप्पा गाठण्यासाठी इतकी वर्षे वाट पाहावी लागली. इस्रोच्या ‘सतीश धवन तळा’वरून सोमवारी झेपावलेल्या या विमानाचा प्रवास ७७० सेकंदांत पूर्ण झाला. त्याचे सुटे भाग समुद्रात पडले. आत्ताच्या चाचणीत हे अंतराळ विमान भूमीवर उतरविण्याचा किंवा समुद्रात उतरविण्याचा प्रयास नव्हताच त्यामुळे अंतराळात गेलेले विमान पुन्हा आणणे आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्याची बाब सिद्ध झाली असली तरी ते आहे त्या अवस्थेत परत आणण्याचे आव्हान आपल्या वैज्ञानिकांसमोर कायम आहे. यासाठीचे संशोधन पूर्ण झाले असून तेही यशस्वी होणार यात वादच नाही. इस्रोच्या या संशोधनामुळे आपला उपग्रह-प्रक्षेपणावर होणारा खर्च कमी करता येणे शक्य होणार आहे. म्हणजेच, कमी खर्चात अधिकाधिक प्रयोग करण्याची संधी. त्या प्रयोगांचाच पुढचा  टप्पा हा मानवासहित अंतराळ प्रवास असा असणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अंतराळ तंत्रज्ञानात आत्तापर्यंत झालेल्या संशोधनाचा टप्पा आपण गाठू शकणार आहोत. यास कदाचित पुढील दहा वर्षेदेखील लागतील. सोविएत संघाच्या विघटनानंतर १९९२ मध्ये रशियाने आपल्याला क्रायोजनिक इंजिन देण्यास होकार दर्शविला मात्र त्याचे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता. यानंतर या क्षेत्रात आपण स्वावलंबी व्हायचे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इस्रोने आपली वाटचाल सुरू केली आणि २००१ मधील पहिल्या भूसंकालिक उपग्रह क्षेपणयानाच्या (जीएसएलव्ही) चाचणीपासून या वाटचालीची फळे दिसू लागली. अंतराळविमानाच्या भारताने केलेल्या चाचणीत देखील संपूर्णत: भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या आधीच्या भू-स्थान निश्चिती प्रणालीसाठीही (जीपीएस) पूर्णत: भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. अंतराळातील या भराऱ्या अखेर जमिनीवरले जगणे सुकर आणि समृद्ध करण्यासाठीच आहेत.. यापुढच्या काळात इस्रो समोर ग्राम नियोजन, सुरक्षा यंत्राणा आणि उपग्रहाधारित मोबाइल सेवा यंत्रणांवर काम करण्याचे आव्हान असणार आहे. हे आव्हानही इस्रो लीलया पेलेल आणि स्वयंपूर्णतेच्या या भराऱ्यांना आपला राजकीय इच्छाशक्तीची साथही मिळत राहील अशी अपेक्षा आहे.

  • Tags: अन्वयार्थ,