दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) या दिल्लीतील प्रमुख विद्यापीठांच्या विद्यार्थी प्रतिनिधी-सभांच्या निकालांकडे साऱ्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेले असते. दिल्लीचा राजकीय नूर या दोन विद्यापीठांच्या निकालांतून समोर येतो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हा पारंपरिकदृष्टय़ा डाव्या पक्षांचा बालेकिल्ला. प्रकाश करात, सीताराम येचुरी यांच्यासह डाव्या चळवळीतील अनेक नेते या विद्यापीठाच्या राजकीय मुशीत तयार झाले. दिल्ली विद्यापीठात भाजपप्रणीत अभाविप किंवा काँग्रेसप्रणीत एनएसयूआयचे आलटून पालटून वर्चस्व असते. या दोन्ही विद्यापीठांच्या निवडणुका यंदाही गाजल्या. दिल्ली विद्यापीठाच्या चारपैकी तीन महत्त्वाच्या पदांवर अभाविपने विजय संपादन करीत प्रभाव राखला. एक जागा काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेला मिळाली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत चारही जागा डाव्या पक्षांच्या एकत्र आलेल्या चार विद्यार्थी संघटनांनीजिंकल्या. भाजपने सारी ताकद लावूनही अभाविपला यश मिळाले नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्यांचे वर्चस्व मोडून काढण्याचे भाजपचे प्रयत्न पुन्हा एकदा फोल ठरले. दोन्ही विद्यापीठांच्या मतमोजणीवरून पराभूतांनी संशय निर्माण केला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ चर्चेत आले ते दोन वर्षांपूर्वी कथित देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याच्या अभाविपच्या आरोपांवरून. या वादात विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैयाकुमार याला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक झाली होती. सुटका झाल्यावर याच कन्हैयाकुमारला देशभर प्रसिद्धी मिळाली. उमर खलिद, शेहाला रशिद हे नवीन विद्यार्थी नेतृत्व या वादातूनच पुढे आले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्यांचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता तेव्हापासून भाजपने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू ठेवले. विद्यापीठाच्या कुलगुरू आणि रजिस्ट्रारपदी संघ परिवाराशी संबंधितांच्या नेमणुका झाल्या. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने भाजपचा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. पंतप्रधानांच्या विरोधात मत व्यक्त केलेल्या एका प्राध्यापकावर कारवाई करण्यात आली. काहीही करून या विद्यापीठातील डाव्यांचे वर्चस्व मोडून काढायचे हा भाजप किंवा अभाविपचा एककलमी कार्यक्रम आहे. भाजपने सत्तेचा वापर करून कितीही प्रयत्न केले तरीही विद्यार्थ्यांचा मात्र डाव्या संघटनांनाच पाठिंबा असल्याचे रविवारच्या निकालांवरून स्पष्ट होते. याआधी २०१५ मध्ये एक सहसचिवपद अभाविपने पटकविले होते. त्यापूर्वी एकदाच, १९९०मध्ये विनोद तावडे जेएनयूत तळ ठोकून असताना अभाविपने तेव्हाची निवडणूक जिंकली होती. हे अपवाद वगळता जेएनयूमध्ये डाव्यांचीच नेहमी सरशी झाली आहे. दिल्ली विद्यापीठात अभाविपने आपले वर्चस्व कायम राखले. दिल्लीची एकहाती सत्ता काबीज करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेचा राजधानी दिल्लीत तेवढा प्रभाव पडलेला दिसत नाही. दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत आपच्या विद्यार्थी संघटनेने डाव्या संघटनांशी आघाडी केली होती. पण आपला फार काही यश मिळाले नाही. आम आदमी पार्टीला विद्यार्थी क्षेत्रात अद्याप तरी तेवढा पाठिंबा मिळालेला नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकांच्या निकालांवरून डाव्या संघटनांना बळ मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Left unity wins all 4 seats in jnu students union election
First published on: 18-09-2018 at 02:24 IST