आव्हानात्मक करोनाकाळ आणि त्यासाठी योजलेली टाळेबंदी यामुळे उद्योगधंद्यांचे नुकसान झाले हे तर स्पष्टच. पण ते किती हे समजून घ्यायचे तर बुधवारच्या दिवसात जाहीर झालेल्या काही प्रमुख कंपन्यांच्या वित्तीय निकालांकडे पाहता येईल. प्रवासी वाहनांच्या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने २४९ कोटी रुपयांचा तोटा एप्रिल ते जून तिमाहीत नोंदविला. गतवर्षी याच तिमाहीत कंपनीने १,४३५ कोटींचा नफा कमावला होता. २००३ साली मारुती भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली, म्हणजे नंतरच्या १७ वर्षांत प्रथमच तोटा पाहावा लागण्याचा कंपनीवर प्रसंग आला आहे. दुसरीकडे क्रमांक एकची विमान कंपनी इंडिगोने या तिमाहीत नोंदविलेला तोटा २,८४३ कोटी रुपयांचा आहे. याच क्षेत्रातील स्पाइसजेटचा तोटा ८०७ कोटी रुपयांचा आहे. देशभरात २४ मार्चपासून करोना साथीला प्रतिबंध म्हणून टाळेबंदी सुरू झाली. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत मारुती-सुझुकीच्या प्रकल्पांमध्ये जेमतेम दोन आठवडे उत्पादन घेतले गेले. गतवर्षी ज्या तिमाहीत चार लाखांच्या घरात गाडय़ा विकल्या गेल्या, त्या तुलनेत यंदाची तिमाही विक्री फक्त ६७,००० गाडय़ांची आहे. तिमाहीतील बहुतांश काळ उत्पादन आणि विक्री ठप्प राहिल्याचा स्वाभाविक परिणाम हा विक्रमी तोटा आहे. विमान कंपन्यांवर तर टाळेबंदी काळात अगदी मे अखेपर्यंत प्रवासी उड्डाणांवर बंदी होती. मिळकतीचे मार्ग बंद आणि खर्च मात्र सुरूच अशी स्थिती ओढवल्याने, नोकर कपात, वेतन कपात असे खर्चाला कात्री लावणाऱ्या उपायांना सुरुवात याच क्षेत्रातून आणि मुख्यत: इंडिगोकडून झाली. यापुढे भागधारकांना लाभांशाला मुकावे लागणार, तर स्वमालकीच्या विमानांची सरळ विक्री अथवा ती भाडय़ाने देण्यासारखे मार्ग अवलंबले जातील, असे कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. टाळेबंदीने सर्वाधिक बेजार असलेल्या विमानोड्डाण, वाहन उद्योगांच्या बरोबरीने आतिथ्य, पर्यटन उद्योगावरील अर्थ- परिणाम किती भयानक, हे येत्या आठवडय़ात या कंपन्यांचे तिमाही आकडे प्रसिद्ध झाल्यावर दिसेलच. तथापि टाळेबंदीत घरून काम करण्याच्या वाढलेल्या प्रघाताच्या काही कंपन्या लाभार्थीही ठरल्या. दूरसंचार सेवा क्षेत्रातील कंपन्या त्यापैकीच एक. मात्र या लाभार्थी क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारती एअरटेललाही सरलेल्या एप्रिल-जून तिमाहीत १६ हजार कोटी रुपयांच्या घरात तोटा सोसावा लागला. कंपनीने तोटा नोंदविलेली ही सलग पाचवी तिमाही असली आणि त्याची काही विशेष कारणे सांगता येतील हेही खरे असले; तरी तोटय़ाचे यंदाच्या तिमाहीतील फुगलेले प्रमाण शोचनीयच. खरा प्रश्न आहे, अर्थचक्र पुन्हा ताळ्यावर कधी येईल, हाच. त्यापुढले आनुषंगिक प्रश्न म्हणजे :  कंपन्यांना पूर्वीसारखे मिळकतीचे आकडे साधता येतील काय? असल्यास, किती लवकर? इंडिगोचा हवाला द्यायचा तर सप्टेंबपर्यंत जेमतेम ४० टक्के उड्डाणे सुरू होतील, असा त्या कंपनीच्या व्यवस्थापनाचाच अदमास आहे. टाळेबंदीचे म्हणाल तर, ती अद्याप काही भागांत अव्याहत सुरूच आहे. ती केव्हा पूर्णत: उठेल आणि उद्योग- व्यवसायांचा श्वास मोकळा होईल, याबद्दलची अनिश्चितता आजही आहेच. यावर आता उद्योजक बोलू लागले आहेत. एरवी सत्ताधारी दुखावणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेणारी ‘सीआयआय’सारखी उद्योजकांची संघटनासुद्धा स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करू लागली आहे. एकुणात बेजारतेच्या या प्रारंभिक अर्थखुणा आगामी काळात आणखी भीतिदायी रूप धारण करणे क्रमप्राप्तच दिसते.