आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावा असे दोन महत्त्वाचे विक्रम गेल्या आठवड्यात नोंदवलेली मिताली राज हिला क्रिकेटइतकाच भरतनाट्यममध्येही रस होता. नैपुण्य दोन्हींमध्ये समान पातळीवर होते. पण त्या वेळी म्हणजे साधारण पंचवीसेक वर्षांपूर्वी दोनपैकी एक मार्ग निवडायची वेळ आली, त्या वेळी मितालीने क्रिकेटला पसंती दिली. निर्णय अत्यंत धाडसाचा होता. महिला क्रिकेट आजही संधी, पुरस्कर्ते व समन्यायी कौतुकमान्यतेच्या शोधात असते. मागील सहस्राक सरत असतानाच्या काळात तर नृत्यनिपुण असूनही क्रीडाक्षेत्राच्या वाटेला जाणे काही जणांना वेडेपणा वाटलाही असेल. मात्र देशातील बहुतेक प्रज्ञावंत क्रीडापटूंप्रमाणेच मितालीचे पालकही वेगळ्या वाटेच्या बाबतीत प्रयोगशील होते. त्यांच्या खंबीर पाठबळावरच मिताली क्रिकेटकडे वळली. वयाच्या १६व्या वर्षी तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक झळकवले होते. वीसहून अधिक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळूनही ती सातत्याने धावा करत आहेच, शिवाय विजयासाठी आसुसलेली आहे. सध्या भारतीय महिला संघाची मायदेशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील एका सामन्यात मितालीने आंतरराष्ट्रीय सामन्यांतील १० हजार धावांचा आणि दुसऱ्या सामन्यात ‘एकदिवसीय’मधील ७ हजार धावांचा विक्रम प्रस्थापित केला. इतरेजन तिच्या विक्रमांविषयी बोलत असताना मिताली मात्र त्या दोन्ही सामन्यांमध्ये झालेल्या भारतीय पराभवाविषयी नाराज होती. भारतीय गोलंदाजांची कामगिरी समाधानकारक होत नाही याविषयी ती विद्यमान संघाची कर्णधार या नात्याने अस्वस्थ होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीचे पदार्पण १९९९ मध्ये झाले. २२ वर्षे, ३००हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने, १० हजारांहून अधिक धावा इतकी झळाळती आणि प्रदीर्घ कारकीर्द रसिक आणि माध्यमांतीलही किती जण जवळून पाहात होते, हा प्रश्न उरतोच. मितालीच्या विक्रमी धावांऐवजी वलयकेंद्री माध्यमांमध्ये चर्चा आहे तिच्या कारकीर्दीवर येऊ घातलेल्या चित्रपटाची! मितालीचे अभिनंदन आघाडीच्या पुरुष क्रिकेटपटूंनी कसे केले किंवा तिच्यावर आधारित आगामी चित्रपटात तिची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने काय म्हटले या विषयांना मितालीच्या पराक्रमगाथेपेक्षाही अधिक प्रसिद्धी मिळताना दिसते, तेव्हा प्राधान्यक्रमाच्या बाबतीत आपण आजही काही तरी गल्लत करतो हे स्पष्ट होते. मिताली राजपेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्सच्याच अधिक धावा आहेत, पण शार्लट २०१६ मध्येच निवृत्त झाली आहे. मिताली लवकरच तिचा विक्रम मोडेल. दोन विश्वचषक सामन्यांच्या अंतिम सामन्यात खेळलेली मिताली एकमेव. तिच्या नावापुढे अद्यापही एखादे जागतिक अजिंक्यपद दिसत नाही. पण आज असंख्य मुली मितालीला आदर्श मानून क्रिकेटकडे वळू लागल्या आहेत. तेव्हा एखादे अजिंक्यपद नजीकच्या भविष्यात भारताच्या नावे नक्की नोंदवले जाईल. पण कदाचित तेव्हाही महिलांच्या क्रिकेटला प्रक्षेपण, पुरस्कर्ते किंवा आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये दुय्यम स्थान मिळणार असेल तर वेगळा मार्ग निवडण्यासाठी या मुलींना पर्यायच शोधावे लागतील. महिला क्रिकेटच्या बाबतीत भारतात दिसून येत असलेली अनास्था निधीच्या, गुणवत्तेच्या अभावातून नव्हे, तर प्रशासकांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे अधोरेखित होते. हे बदलण्याचा मार्ग महिला आयपीएलमध्ये चारऐवजी सहा संघांना समावेश करून सुकर होणार नाही. गेल्या वीसेक वर्षांमध्ये महिलांच्या क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यांची योग्य ती दखल भारतीय क्रिकेट मंडळाकडून घेतली जाते असे दिसत नाही. महिला क्रिकेटपटूंच्या वाढलेल्या मानधनाकडे बोट दाखवून काही जण त्यांच्या ‘प्रगती’ आणि ‘स्थैर्या’चे हवाले देऊ लागतात. पण प्रवाहाच्या विरोधात पोहून स्वत:ला प्रस्थापित करण्याची वेळ या बहुतेक क्रिकेटपटूंवर येते, त्याऐवजी प्रवाहच बदलण्याचा निर्धार मंडळाने दाखवला पाहिजे. तसे झाल्यास अनेक मिताली राज निर्माण होतील.