एका बाजूला हिंदू संघटित झाले, तरच देश बळकट होईल, असे म्हणायचे आणि त्याच वेळी कट्टर हिंदुत्व म्हणजे कट्टर अहिंसा आणि उदारता, अशीही व्याख्या करायची; यामुळे भारतातील हिंदुत्वनिष्ठांच्या मनातही गोंधळच निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या रौप्यमहोत्सवी राष्ट्रोदय समागम या कार्यक्रमात संपूर्ण देशाला रा. स्व. संघात येण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ या देशात जे विविध धर्म आहेत, त्यातील सगळ्यांना संघ आपल्या कवेत घेऊ इच्छितो, असा होतो. मात्र असे म्हणताना, ज्यांना भारत माता आपली आई आहे, असे वाटते त्यांच्यासाठीच संघाची कवाडे खुली राहतील, असे सांगून कोणाला नाकारायचे आहे, याची धूसर कल्पना भागवत यांनी मांडली आहे. या देशात जन्मलेला प्रत्येक जण हिंदू आहे, असे संघाचे पहिल्यापासून म्हणणे आहे. या देशात पूर्वापार चालत आलेल्या परंपरांना मानणारा, त्याबद्दल आदर व्यक्त करणारा प्रत्येक जण हिंदूच आहे, असे संघाचे म्हणणे असते. धर्माधिष्ठित राष्ट्रे आजच्या काळात कोणत्याही पातळीवर प्रगती साधू शकलेली नाहीत, हे मान्य करण्यास संघातील विचारवंतही तयार नसतात. जगातील जे जे देश धर्माच्या पायावर उभे राहिले, त्यांनी विकासाच्या एका टप्प्यावर धर्माचे अवडंबर  झुगारून दिले आणि त्यामुळेच तेथे विकासाची पावले उमटली, या इतिहासाला आजही भारतातील हिंदू संघटना मान्यता देत नाहीत. त्यामुळे हिंदू या शब्दाची व्याप्ती वाढवत जायचे आणि त्यातून आणखीनच गोंधळ उडवून द्यायचा, एवढेच साध्य होऊ शकते. एकदा कट्टर अिहसा म्हणजे हिंदुत्व ही व्याख्या मान्य केली आणि त्याचबरोबर या देशातील विविधतेमध्ये सामावलेली एकता समजावून घेतली, की गेल्या काही वर्षांत या देशात धर्माच्या नावाखाली ज्यांनी ज्यांनी धुडगूस घातला, ते सगळे हिंदुत्व नाकारणारे आहेत, असे मानणे क्रमप्राप्तच. यास मोहन भागवत यांची मान्यता आहे की नाही, हे कधीही सांगितले जाणार नसल्याने गोंधळ कायम राहील. भारतात खाणे-पिणे, भाषा, धर्म-पंथ, पूजा पद्धती यामध्ये विविधता आहे. त्या वैविध्यातच एकता आहे, असे सरसंघचालक म्हणाले. हे जर खरे मानायचे, तर मांस भक्षणाच्या विरोधात होत असलेली सामाजिक हिंसा त्यांना मान्य नाही, असे मानावे लागेल. मग भागवत यांनी अहिंसेचा पुरस्कार करताना, असा सामाजिक हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध रा. स्व. संघाची आघाडी उभी करण्याचे सूतोवाच का केले नाही, असा प्रश्न त्यामुळे उभा राहतो. भारतासारख्या वैविध्यतेने भरलेल्या देशात एकाच धर्माच्या झेंडय़ाखाली, सर्वानी एकत्र आल्याशिवाय देश बळकट होणार नाही, असे सांगणाऱ्या सरसंघचालकांना, आधुनिक काळात धर्म हा राष्ट्रीय आधार बनू शकत नाही, याची जाणीव नाही, असे कसे म्हणायच़े  एका मोठय़ा देशातील सत्ताधारी राजकीय पक्षाचे मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या रा. स्व. संघासारख्या सांस्कृतिक-सामाजिक संघटनेने, समाजात विविध पातळ्यांवर, अनेक कारणांनी उडालेला वैचारिक गोंधळ दूर करणे अधिक आवश्यक आहे. विविधता मान्य करताना, त्यातील स्वातंत्र्याचीही बूज राखणे हे, गोंधळ दूर होण्यासाठी महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशातील मंत्र्यांच्या अहंकारीपणामुळे स्वयंसेवकच भाजपच्या कामात रस घेईनासे झाले आहेत, या स्वयंसेवकांच्या तक्रारीवरून भागवत यांना हे कळलेच असेल. जगातील नव्या जाणिवांचा शोध घेऊन, त्यांना आपल्या विचारधारेत समाविष्ट करण्याचा उदारमतवाद जर रा. स्व. संघाने जोपासला, तरच खऱ्या अर्थाने एकतेतील विविधता आणि विविधतेतील एकता साकार होऊ शकेल.