आपण म्हणू ती पूर्वदिशा आणि साऱ्या व्यवस्थेने त्यापुढे झुकले पाहिजे, अशाच आविर्भावात सार्वजनिक जीवनात काही जण वावरत असतात. जळगाव घरकुल योजनेतील घोटाळ्यात सात वर्षांचा कारावास आणि १०० कोटींचा दंड, अशी शिक्षा झालेले माजी मंत्री सुरेश जैन हे याच पंक्तीत बसणारे. महाराष्ट्रात काही शहरे वा गावे ही नेतेमंडळींवरून ओळखली जातात. त्याप्रमाणे ‘जळगाव म्हणजे सुरेश जैन’ असेच समीकरण होते. सारे नियम धाब्यावर बसवून सरकारी यंत्रणेचा वापर करून घेण्यात सुरेश जैन माहीर मानले जायचे. मूळचे काँग्रेसचे, राज्यात युतीची सत्ता येताच शिवसेनेत, सत्ताबदल होताच राष्ट्रवादी काँग्रेस.. अशा कोलांटउडय़ा मारून स्वार्थ साधायचा हा एकमेव उद्योग जैन यांनी वर्षांनुवर्षे केला. जळगाव घरकुल योजनेतील घोटाळा हा त्याचाच भाग. जळगाव शहरातील झोपडपट्टीवासीयांसाठी घरे बांधण्याचा निर्णय १९९७ मध्ये नगरपालिकेने घेतला होता. नगरपालिकेची स्वत:ची जमीन नसतानाही घरे बांधण्याची योजना आखण्यात आली. सुमारे ११ हजार घरे बांधण्याकरिता कामे सुरेश जैन यांच्या निकटवर्तीयांना देण्यात आली आणि आगाऊ रक्कमही ठेकेदारांना मोजण्यात आली. मात्र, ठेकेदारांना देण्यात आलेली ही आगाऊ रक्कम जैन यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. ते तपासात स्पष्टही झाले. या घरकुल योजनेत ३० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. जळगाव नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले आणि काही काळाने तिथे आयुक्तपदी आलेल्या डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरकुल योजनेची पाळेमुळे खोदून पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सध्या केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या डॉ. गेडाम यांनी दबावाला बळी न पडता हिंमत दाखविल्यानेच जैन व अन्य सारे तुरुंगात गेले आहेत. याबद्दल डॉ. गेडाम यांचे अभिनंदन. जैन यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री गुलाब देवकर, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्यासह ४८ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार जैन हेच होते; बाकीचे सारेच त्यांचे बगलबच्चे आणि हुकमाचे दावेदार! पक्ष कोणताही असो, नेतृत्वाला ‘खूश’ करून मंत्रिपद मिळवायचे आणि मनमानी करायची, ही राजकीय रीत गेल्या काही दशकांत महाराष्ट्रात रुळली आहे. सुरेश जैन हे त्यात आघाडीवर होते. मात्र, अशांच्या मनमानीला चाप बसल्याची उदाहरणे तुरळक असली, तरी आहेत. मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्याबद्दल सुरूपसिंह नाईक या काँग्रेसच्या नेत्याला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली होती. छगन भुजबळ हे तुरुंगवारी करून आले आहेत. सिंचन घोटाळ्यापाठोपाठ राज्य सहकारी बँकेची रक्कम बुडीत निघाल्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर दुहेरी टांगती तलवार आहे. ‘आदर्श’ घोटाळ्यात अशोक चव्हाण अडकले. जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्याने भाजप नेते एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद गेले. सुनील तटकरे यांच्यासह अन्य काही नेत्यांवर आरोप आहेतच. तब्बल अठरा वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर का होईना, सुरेश जैन यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजकीय मनमानीच्या माळेतील इतरांना यातून योग्य तो संदेश मिळाला असेलच.