मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते, परंतु देशाच्या राजकीय पटलावर मुंबईची ओळख वेगळी होती. एके काळी वेगवेगळ्या लढय़ांची मुंबई रणभूमी होती. इंग्रजांविरुद्धचे चले जाव आंदोलन असेल, संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीची चळवळ असेल, कामगार-कष्टकऱ्यांचे लढे असतील; सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीचेही मुंबई केंद्र. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचा जन्म याच मुंबईत झाला. निरनिराळ्या समूहांच्या लढय़ांची निर्मिती केंद्र असलेल्या मुंबईने कामगार-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतेही दिले. अशा कामगार नेत्यांपैकी शरद राव एक होते. ते कामगार नेते होते, तरी राजकारणातही त्यांनी अनेकदा आपले नेतृत्व पणाला लावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना कधी यश आले नाही. बंदसम्राट म्हणून ज्यांनी मुंबईच्या कामगार चळवळीवर आपला ठसा उमटविला, त्या जॉर्ज फर्नाडिस यांचे राव हे शिष्य होते. जॉर्ज यांचा लढाऊ बाणा राव यांच्या अंगात पूर्ण भिनला होता. जॉर्ज यांनी दिल्लीच्या राजकारणात कूच केल्यानंतर मुंबईतील पालिका कामगार चळवळीचे नेतृत्व राव यांच्याकडे आले. पालिका कामगार व बेस्ट कामगारांच्या प्रश्नांसाठी, विशेषत: त्यांच्या श्रमाला योग्य मूल्य मिळाले पाहिजे, यासाठी राव यांनी पालिका प्रशासनाशी व प्रसंगी राज्य सरकारशीही टोकाचा संघर्ष केला. कामगारांची पगारवाढ असो व बोनस किंवा त्यांना वेगवेगळ्या सुविधा मिळवून देण्यासाठी ऐन पावसाळ्यात राव संपाची हाक द्यायचे. कामगारांच्या प्रश्नांसाठी मुंबईकर वेठीस धरले जायचे, असा त्यांच्यावर आरोप व्हायचा. टीकेचे प्रहार झेलत ते कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी लढत राहिले. त्यांच्या कार्यशैलीबद्दल हजार मतभेद होते, परंतु पालिका कामगारांना विशेषत: त्यांतील शेवटचा घटक म्हणतो त्या सफाई कामगारांना त्यांनी बरेच काही मिळवून दिले. म्हणून तर, मुंबई महापालिकेत प्रदीर्घ काळ सत्ता असलेल्या शिवसेनेलाही राव यांना शह देता आला नाही, सेनेशी रावांचा राजकीय संघर्ष असतानाही. इतकी त्यांची कामगार संघटनेवर मजबूत पकड होती आणि कामगारांचीही त्यांच्यावर अढळ निष्ठा होती. सामुदायिक सौदेबाजीसाठी त्यांनी संघटनाशक्तीचा पुरेपूर वापर केला. मात्र कामगार लढय़ातील संप हे अखेरचे हत्यार ते वारंवार वापरू लागले, त्या वेळी त्यांच्यावर हेकेखोर, एककल्ली नेतृत्व असे आरोप होऊ लागले. रात्रंदिवस घडय़ाळय़ाच्या काटय़ाला आणि लोकलच्या चाकाला जीवन बांधलेल्या मुंबईकरांना त्यांचे संपासारखे आंदोलन असह्य़ होऊन जनमत रावांच्या विरोधात गेले. पुढे आंदोलनाचा प्रभावही हळूहळू कमी होत गेला. अन्य कामगार चळवळींप्रमाणेच मुंबईतील पालिका कामगार चळवळही क्षीण होत गेली. कामगार चळवळीबरोबरच राव यांनी राजकारणही करण्याचा प्रयत्न केला. देशात जनता दलाचा बहराचा काळ होता, त्या वेळी मुंबई विभागीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही वर्षे धुरा सांभाळली. कालांतराने जनता दलात राज्यनिहाय अनेक गट पडले, महाराष्ट्रातही पक्षाचे अस्तित्व नावापुरते राहिले, त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी अनेकदा लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविल्या, परंतु त्यात त्यांना कधीच यश आले नाही. मुंबई महापालिकेत मात्र एकदा ते नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. अलीकडे पालिका व बेस्ट कामगार संघटनाही फुटीने ग्रासल्या होत्या. शरद रावही काहीसे अलग पडल्यासारखे झाले होते. त्यांच्या निधनाने मुंबईतील अखेरच्या लढाऊ कामगार नेत्याचा अस्त झाला, असे म्हणता येईल. संपाची हाक दिली की, मुंबईच्या पोटात धडकी भरायला लावणारा आता दुसरा कामगार नेता उरलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior mumbai trade union leader sharad rao
First published on: 02-09-2016 at 02:38 IST