मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणारे व्हेंडिंग मशीन सुरू झाल्याच्या वृत्ताबद्दल संबंधितांचे अभिनंदन करतानाच, व्यक्तिगत आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत भारतीय समाजात वर्षांनुवर्षे रुजलेल्या तिटकाऱ्याबद्दलही बोलणे आवश्यक आहे. देशात निदान कागदावर जोरात सुरू असलेले स्वच्छ भारत अभियान फसणार असल्याबद्दल जो कमालीचा विश्वास देशभर व्यक्त केला जातो, तो पाहता, येथील कुणालाच त्याबद्दल फारशी आत्मीयता नसल्याचे दिसून येते. व्यक्तिगत स्वच्छतेबाबत कमालीचे अज्ञान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दलच्या उदासीनतेला झेवियर्स महाविद्यालयाने कृतीने उत्तर दिले आहे. सार्वजनिक कचऱ्यामध्येही रुग्णालयातील कचरा ही भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची संस्कृती न रुजल्याने आणि त्याबाबत कडक नियम असूनही त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने रुग्णालयातील कचरा रोगराई पसरवण्यास कारणीभूत ठरत असतो. आपण सगळेच सार्वजनिक पातळीवर अशा आणि विशेषत: शरीरधर्माशी निगडित गोष्टींबद्दल जाहीरपणे बोलण्यास कचरत असतो. त्याचे कारण आपण हे विषय बेटासारखे बाजूला ठेवलेले असतात. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील घाण आणि दरुगधी याबद्दल कोणीही पुढे येऊन बोलत नाही. त्याविरुद्ध आंदोलन करणे हे तर धारिष्टय़ाचेच. महिलांच्या मासिक पाळीचा विषय त्यापैकीच एक. त्याबद्दल आणि त्या काळातील आरोग्याच्या समस्यांबद्दल जाहीर तर सोडाच पण समूहातही कुजबुजल्या स्वरात बोलण्याची रीत पाळली जाते. या सगळ्याला छेद देणारी कृती देशातील काही निवडक ठिकाणी घडते आहे, हे अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. मुंबईतीलच पोद्दार महाविद्यालयात अशा प्रकारच्या व्हेंडिंग मशीनबरोबरच वापरलेले नॅपकिन्स जाळून टाकण्याची यंत्रे (इन्सिनरेटर्स) बसवण्यात आली आहेत. देशातील सगळ्या आस्थापनांमध्ये अशा प्रकारची यंत्रे बसवण्याची खरे तर सक्ती करायला हवी. तशी ती होत नाही आणि झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती बळावते, हे भारतीय समाजाचे खरे दुखणे आहे. विकसित देशातून भारतात परत येणाऱ्या कोणाही भारतीयाच्या नजरेत पहिल्यांदा भरते ती येथील अस्वच्छता.कोणत्याही देशातील कचरापेटय़ा तेथील स्वच्छतेच्या संस्कृतीचे प्रतीक असतात. शक्यतो कचरापेटीच्या बाहेर कचरा टाकण्याची सवय आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रशासनाची मानसिकता अनाकलनीय आहे. त्यामुळे भारत त्यामध्ये अनुत्तीर्ण देश आहे. हे टाळण्यासाठी व्यक्तिगत स्वच्छतेचे धडे अगदी केजीपासून गंभीरपणे द्यायला हवेत आणि त्याबाबत आग्रही असायला हवे. मुलींच्या शरीरधर्माबाबत मुंबईतच सुरू असलेली ‘राइट टू पी’ ही चळवळही अशीच महत्त्वाची मानायला हवी. सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रांबरोबरच ठिकठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृहे हा स्त्रियांचा अधिकार आहे, हे सर्व पातळ्यांवर अद्याप मान्य झालेले नसल्याने, याही विषयासाठी चळवळ उभारावी लागते. भारतातील महिलांना संध्याकाळनंतर असुरक्षित वाटण्याची परिस्थिती सुधारत असताना, सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील सुरक्षा हाही विषय तेवढाच गंभीर आहे. या साऱ्या गोष्टींचे भान शिक्षणातून आणि आचारविचारातून येणे स्वाभाविक असायला हवे. मुंबईप्रमाणेच सगळ्या महानगरांमधील महिलांचा घराबाहेर राहण्याचा काळ वाढतो आहे. अशा वेळी व्हेंडिंग मशीनच्या या कृतीचे स्वागत करतानाच त्याच्या अनुकरणाचे आवाहन गैर ठरणारे नाही.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2015 रोजी प्रकाशित
स्वागतार्ह आणि अनुकरणीय
मुलींच्या शरीरधर्माबाबत मुंबईतच सुरू असलेली ‘राइट टू पी’ ही चळवळही अशीच महत्त्वाची मानायला हवी.
Written by रत्नाकर पवार

First published on: 07-12-2015 at 02:27 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St xaviers college starts vending machine to provide sanitary napkins