विक्रमवीर क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना अलीकडेच त्यांच्या कथित टिप्पणीवरून वादात खेचण्याचा प्रकार समाजमाध्यमी बिनडोकपणाचा कळस होता. परंतु पूर्वी ज्या अविचलित आत्मविश्वासाने गावस्कर यांनी तेज गोलंदाजांचा सामना केला, त्याच आत्मविश्वासाने त्यांनी याही वादळाचा सामना केला आणि आत्मप्रतिष्ठेची तसेच इतरांच्या प्रतिष्ठेचीही बूज राखली. त्यांच्यावर संयत शब्दांत, पण दिशाभूल झाल्याने गैरसमजातून टीका करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने (समाजमाध्यमावरूनच मिळालेल्या) माहितीची खातरजमा केली असती, तर झाल्या मनस्तापातून तिलाही थोडा दिलासा मिळाला असता. कदाचित दोष तिच्या पिढीचा असावा. या पिढीला माहिती, मार्गदर्शन, मूल्यांकन आणि अभिव्यक्ती या साऱ्यांचा स्रोत केवळ आणि केवळ समाजमाध्यमेच आहेत असे वाटते. यांची सुखदु:खे इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपवर व्यक्त होतात. विषाणू संसर्गासारखाच यांना अनेकदा चुकीच्या माहितीचा संसर्ग होतो आणि व्यक्त होण्यासाठी शिक्षण, नैतिकता, तारतम्य, सबुरी, स्वयंनियंत्रण, सदसद्विवेकबुद्धी अशी कोणतीच बंधने नसल्यामुळे अभिव्यक्तीचा बाण सूं-सूं करत सुटतोही. कारण भावना आणि सहजप्रवृत्ती (इन्स्टिंक्ट) हेच त्या बाणामागील एकमेव बल आणि प्रेरणा असते. यातून जी उलथापालथ होते, तिचे निराकारण मागाहून ‘पोस्ट डिलीट’ केल्यानेही होत नाही.

आयपीएलमधील परवाच्या सामन्याचे समालोचन करताना, बेंगळूरु रॉयल चॅलेंजर्स या संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीविषयी गावस्करांनी काही विधाने केली.. विराट नेहमीच मैदानावर मोठय़ा स्पर्धेत किंवा सामन्यात उतरण्यापूर्वी उत्तम गोलंदाजांसमोर सराव करण्यास प्राधान्य देतो. या वेळी टाळेबंदीमुळे त्याला केवळ अनुष्काच्या गोलंदाजीवरच सराव करावा लागला. त्यातून काहीच साधणार नाही.. या टिप्पणीला काहींनी जाणीवपूर्वक वेगळा आकार व रंग दिला आणि ती वेगळ्या शब्दांत समाजमाध्यमांमध्ये मांडली व पसरवली. ही प्रदूषित टिप्पणी तर थेट अश्लीलतेकडे घसरणारी होती. कदाचित मूळ टिप्पणीत शेवटच्या वाक्याची काही गरज नव्हती, असे काहींचे मत. शिवाय अनुष्काचा उल्लेखही करायला नको होता, असेही काहींचे मत. गावस्करांच्या समालोचनाविषयी जे ज्ञात आहेत, त्यांना ठाऊक असेल की समालोचन म्हणजे निव्वळ कोरडे वर्णन नव्हे. सुनील गावस्कर यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीपेक्षा त्यांचे समालोचन अधिक रंगतदार असते. ते त्यांच्या फलंदाजीइतके निर्दोष मात्र नसते. काही वेळा त्यांनी केलेली एखादी कोटी सर्वाना मानवतेच असे नाही. शिवाय समालोचनात ते अनेकदा दाखवतात तसा परखडपणा ही तर भारतीय भावनाव्याकूळ समाजमनाला खचितच झेपणारी बाब! याच गावस्करांनी मैदानाबरोबरच समालोचनकक्षातही प्रकटणाऱ्या सुप्त वर्णद्वेष आणि वंशद्वेषाविरोधात रोखठोक भूमिकाही अनेकदा घेतलेली आहे. सबब, त्यांच्या हेतूंविषयी, निष्ठेविषयी आणि श्रेष्ठतेविषयी शंका घ्यावी अशी परिस्थिती नाही. उलट, अलीकडे गावस्कर त्यांचा तो सुविख्यात रोखठोकपणा पुरेसा दाखवत नाहीत, अशी त्यांच्या चाहत्यांची आणि क्रिकेटप्रेमींची तक्रार आहे. राहता राहिली अनुष्काला विराटविषयी टिप्पणीत ‘निष्कारण ओढण्याची’ बाब. या मुद्दय़ावर दुमत असू शकते. एक तर मिरवणे ही तिच्यासाठी सामान्य बाब आहे. कारण ती चित्रपट कलाकार आहे. भारतीय संघाच्या अनेक समारंभांमध्ये अनुष्का आवर्जून उपस्थित असते. अनेकदा सामना संपल्यावर किंवा दोन डावांच्या मधल्या अवकाशात अनुष्का मैदानातही उतरलेली दिसून आली. मैदानावर कोणी आणि केव्हा उतरायचे याविषयीचे नियम आणि संकेत असतात. त्यांचे पालन अनुष्काच्या बाबतीत नेहमीच होते असे नाही. तेव्हा आपण प्रत्येक वेळी विराटबरोबर ‘दिसणार’ असू, तर त्याच्याविषयीच्या उल्लेखांमध्येही काही वेळा आपला समावेश होणार, हे तिने समजून घ्यायला हवे होते.

त्याऐवजी तिने समाजमाध्यमावर प्रकटलेल्या प्रदूषित माहितीचा आधार घेतला आणि गावस्करांना जाब विचारला. हे जाब विचारणे आता कोणत्याही थराला जाऊ शकते. अनुष्काने खूपच सभ्य मार्ग स्वीकारला यातून तिचा सुसंस्कृतपणा दिसतो. पण तो सुशिक्षितपणा नव्हे! आपण केलेला माझा नामोल्लेख मला पसंत नाही, इतकेच तिला म्हणता आले असते. त्याऐवजी गावस्करांची टिप्पणी अभिरुचीहीन आणि स्त्रीवर्गासाठी अपमानजनक असल्याचे ती बोलून गेली. कारण गावस्करांविरोधात बाकीचे बहुतेक त्या वेळी हेच शब्द वापरत होते. समाजमाध्यमावरील माहितीच्या कचऱ्याला गाळून घेण्याचे भान सुशिक्षित आणि सुसंस्कृतांकडेच असते. तसेच आपल्याविषयी किंचित नर्मविनोदी टिप्पणी स्वीकारण्याचा प्रगल्भपणा समाजमाध्यमांच्या कच्छपि गेलेल्यांच्या अंगी नसतो. कारण निव्वळ चिखलफेक आणि लघुसंदेशात्मक त्वरित मतप्रदर्शनापलीकडेही व्यक्त होता येते, हे यांतील असंख्यांना ठाऊक नसते. गावस्करांवर अत्यंत असभ्य भाषेत बरसलेल्या जल्पक मंडळींपैकी एकाने तरी मूळ चलचित्रफीत पाहिली असती, तर शब्दांची मोडतोड त्यांच्या लक्षात आली असती. काही सहेतुक मंडळींनी ती चलचित्रफीतदेखील समाजमाध्यमांवरच चालवली. पण बेभान झालेल्यांना ती पाहून खातरजमा करण्याचे भान नव्हते. या चहाटळकेपणातून मनस्ताप आणि गैरसमजापलीकडे हाती काही लागणार नव्हते. तसेच झाले.