News Flash

संवेदना आणि वेदना..

लांब पल्ल्याच्या प्रवासात तहान लागली म्हणून किंवा मांडीवरच्या बाळाला भूक लागली

लांब पल्ल्याच्या प्रवासात तहान लागली म्हणून किंवा मांडीवरच्या बाळाला भूक लागली म्हणून थेट रेल्वेमंत्र्यांना ‘टॅग’ करणारे ‘ट्वीट’ कुणा प्रवाशाने करावे, त्याची गंभीर दखल घेऊन रेल्वेमंत्र्यांनी उभी यंत्रणा हलवावी आणि पुढच्या काही मिनिटांतच पाण्याची बाटली किंवा गरमागरम दूध घेऊन रेल्वेच्या अधिकाऱ्यानेच नम्रपणे त्या प्रवाशासमोर उभे राहावे.. मग त्या बातमीने माध्यमांचे रकाने भरावेत आणि सामान्य प्रवाशाच्या सुखाची केवढी आस रेल्वेमंत्र्यांना आहे, या कौतुकाचे पोवाडे सुरू व्हावेत हे चित्र अलीकडचे आहे. मुंबईच्या उपनगरी प्रवाशांना मात्र त्याचे काही कौतुकच नाही. आपल्याच महानगरातला, कालपर्यंत आपल्यातलाच असलेल्या एका माणसाची गुणवत्ता हेरून थेट पंतप्रधान त्याला दिल्लीत बोलावतात आणि रेल्वेसारख्या सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या संवेदनशील खात्याचा भार विश्वासाने त्याच्याकडे सोपवितात, हे खरे म्हणजे मुंबईकरांना सुखावणारे आहे. देशाच्या एखाद्या कोपऱ्यातील सामान्य प्रवाशाची लहानशीदेखील समस्या विनाविलंब सोडविण्यासाठी थेट रेल्वेमंत्रीच धाव घेतात, ही बाबदेखील कौतुकाचीच आहे. तरीही मुंबईकरांना आपल्या माणसाच्या या संवेदनशीलतेचे कौतुक का बरे वाटत नसावे?.. एखाद्या प्रवाशाला पाणी मिळाले, कुणा भुकेल्या बाळाला प्रवासात वेळेवर दूध मिळाले, तर देशभरातील माध्यमांतून त्याचा गाजावाजा होत असताना, मुंबईकर उपनगरी प्रवासी मात्र थंडपणे त्या बातम्या वाचतो आणि स्वस्थ बसतो, असे का होत असावे?.. मुंबईच्या उपनगरी प्रवाशाला दररोजच्या जगण्यात रेल्वे प्रवासामुळे सोसाव्या लागणाऱ्या वेदना हे त्याचे कारण असावे. मुंबईची उपनगरी रेल्वे हे आता मुंबईकर नोकरदाराचे रोजचे दुखणे ठरले आहे. सकाळी घाईघाईने घराबाहेर पडून ‘लेट मार्क’ टाळण्यासाठी जिवाची बाजी लावत गाडी पकडणारा चाकरमानी ठरलेल्या वेळेत तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचेलच याची कोणतीच हमी न देता मनमानी करणाऱ्या उपनगरी रेल्वेपुढे मुंबईकरांनी अक्षरश: हात टेकले आहेत. एखादी जलद गाडीदेखील ‘डबल स्लो’ वेगाने धावते, कुठल्याही स्टेशनच्या मागेपुढे कितीही वेळ थांबते आणि काय झाले आहे, हे प्रवाशाला कळतही नाही. त्यातच, उन्हाळ्याने हैराण झालेल्या आणि मेंढरांपेक्षाही हलाखीने स्वत:ला डब्यात कोंबून घेतलेल्या प्रवाशाच्या डोक्यावरचा पंखा व डब्यातले दिवेही बंड पुकारतात, तेव्हा अपरिमित मानसिक संतुलनाची कसोटी लागते. एका बाजूला ‘बुलेट ट्रेन’च्या गप्पा वेग घेत आहेत, केवळ एका ट्वीटवर एखाद्या प्रवाशाला मिळणाऱ्या दूध-पाण्याच्या बातम्यांतून कौतुकाचे धबधबे ओसंडत आहेत, अशा वेळी मुंबईचा उपनगरी प्रवासी मात्र हलाखीत भरडून निघत आहे. ‘वेळापत्रकानुसार न धावणारी उपनगरी गाडी दाखवा आणि बक्षीस मिळवा’, अशी एखादी योजना रेल्वेमंत्र्यांनी मुंबईत राबविली, तर दोन-चार दिवसांत रेल्वेची तिजोरी रिकामी करावी लागेल, एवढी मुंबईची उपनगरी रेल्वेसेवा ढेपाळत चालली आहे. पावसाचा दोन-चार थेंबांचा शिडकावा होताच येथील सिग्नल यंत्रणा कोलमडते, तर उन्हाचा कडाका वाढताच रुळांच्या समस्या सुरू होतात. गाडय़ा रुळावरून घसरून वाहतुकीचे बारा वाजतात. रडतखडत धावणाऱ्या उपनगरी गाडय़ांमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेच, पण मानसिक स्थैर्याचीही कसोटी सुरू झाली आहे. कुणा मुंबईकराने त्याबाबत रेल्वेमंत्र्यांना ट्वीट करून साकडे घातले, तर त्याकडे कानाडोळा करणेच सोयीचे ठरेल, नाही का रेल्वेमंत्रीजी?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 3:03 am

Web Title: suresh prabhu responds to tweet again milk provided to child in train delayed by fog
टॅग : Suresh Prabhu
Next Stories
1 आणखी किती बळी?
2 काँग्रेसयुक्त भाजप?
3 कायद्याचे ‘कमाल’ अवशेष
Just Now!
X