06 April 2020

News Flash

समाजवादाचे शानदार राजकारण!

सफई या मुलायमसिंहांच्या जन्मभूमीत कालपासून सुरू झालेल्या आणि कर्मभूमी लखनऊमध्ये तीन दिवस चालणाऱ्या या अतिभव्य वाढदिवस सोहळ्याला अनेक राजकीय पदर आहेत.

गरिबांचे तारणहार, राममनोहर लोहियांच्या समाजवादी विचारांचे स्वयंघोषित वारसदार आणि अल्पसंख्याकांचे मसीहा म्हणविणारे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष, नेताजी मुलायमसिंह यादव यांच्या वाढदिवसामुळे, उत्तर प्रदेशातील दुष्काळात होरपळणाऱ्या वंचितांना, उपेक्षितांना आणि गरिबांनाही भव्यदिव्य अनुभवायची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी नेताजींच्या ७५ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून उत्तर प्रदेश सरकारने गरिबांच्या मनावर या अनुभवाची खैरात केली होती. त्या सोहळ्यात सरकारने सढळ हाताने तिजोरीतून केलेल्या उधळपट्टीवर सडकून टीका झाल्यानंतरही त्यांच्या ७६ व्या वाढदिवसाला गेल्या वर्षीहून सरस ठरेल अशीच झळाळी देण्याचा चंग त्यांच्या पक्षाने आणि उत्तर प्रदेश सरकारने बांधल्याने, पुन्हा एकदा डोळ्याचे पारणे फेडून घेण्याचा भाग्ययोग जनतेच्या नशिबी अवतरला आहे.

सफई या मुलायमसिंहांच्या जन्मभूमीत कालपासून सुरू झालेल्या आणि कर्मभूमी लखनऊमध्ये तीन दिवस चालणाऱ्या या अतिभव्य वाढदिवस सोहळ्याला अनेक राजकीय पदर आहेत. नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी ठरलेल्या महागठबंधन प्रयोगाचा रथ उत्तर प्रदेशात तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दिशेने येऊ घातला आहे. या रथाचा लगाम आता आपल्या हाती असावा, अशी स्वप्नेबिगरभाजप राजकीय पक्षांच्या नेत्यांना पडू लागली आहेत. हा लगाम उत्तर प्रदेशात मुलायमसिंहांच्या हाती असावा, यासाठी आता महागठबंधनातील मोहरे समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्याच्या
हालचाली सुरू होतील. मुलायमसिंहांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून, तीन दिवसांत हे सारे मोहरे एका व्यासपीठावर आणले जातील.
त्यांच्याकडून मुलायमसिंहांची तोंड भरून स्तुती घडविली जाईल आणि उत्तर प्रदेशाच्या राजकीय भवितव्याचे तारणहार म्हणून मुलायमसिंहांच्या समाजवादी पार्टीला पर्याय नाही असे चित्र रंगविण्यास सुरुवात होईल. तीन दिवसांचा भव्यदिव्य वाढदिवस सोहळा, हा त्या चित्राचा कॅनव्हास आहे.

येथे याचित्राचे पहिले रंग भरले जाणार आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकीय रणांगणावर भाजप आणि महाआघाडीतील
भाजपविरोधी पक्षांमध्ये सुरू होणाऱ्या सामन्याचे रणिशग मुलायमसिंहांच्या वाढदिवस सोहळ्यातून फुंकण्याचा समाजवादी पार्टीचा चंग आहे. बिहारमधील भाजपविरोधी आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तरी केवळ भाजपला सत्तेपासून रोखणे एवढय़ा एकमेव नि:स्वार्थी हेतूने या आघाडीतील सारे पक्ष एकत्र राहतील का, याविषयी शंका व्यक्त होत आहेत. काँग्रेससारखा देशावर दीर्घकाळ सत्ता गाजविणारा पक्ष आघाडीतील एक दुय्यम घटक पक्ष होऊन राहिला, तर पक्ष दुर्बळ होऊन जाईल याची जाणीव काँग्रेसी नेत्यांना होऊ लागली आहे. त्यामुळे बिहारमध्ये सहजसाध्य झालेला महागटबंधनाचा प्रयोग उत्तर प्रदेशासाठी सोपा नाही, याची जाणीव असल्यामुळे, उत्तर प्रदेशात
भाजपविरोधी आघाडीची मोट किती भक्कम होईल याचा अंदाज घेण्यासाठीच मुलायमसिंहांच्या वाढदिवसाचे निमित्त साधण्यात आले आहे. भाजपविरोधी आघाडीच्या रथाचा लगाम हाती घेण्याच्या या प्रयत्नांना काँग्रेससह अन्य पक्षांची किती साथ मिळते, तेच तीन दिवसांच्या सोहळ्यात ठरणारआहे. मुलायमसिंह यादव यांनी आपली पहिली निवडणूक लढविण्याकरिता सायकलवरून घरोघरी
फिरून लोकवर्गणी जमा केली होती. अशा या नेत्याच्या नव्या राजकीय समीकरणासाठी सरकारीतिजोरीची दारे उघडली जात असतील, तर ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे यश म्हणायचे की समाजवादी विचारांचा विजय मानायचा?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2015 7:06 am

Web Title: thoughts of lohiya and politics
टॅग Politics
Next Stories
1 शेतकऱ्यांचा आक्रमक रोष !
2 धोरण की सूचना
3 तेच खरोखर विजयी जीवन..
Just Now!
X