22 February 2018

News Flash

पुरातन विरुद्ध अद्यतन

एकीकडे सर्व प्रकारच्या आधुनिकतेच्या प्रकाशात स्वतला न्हाऊमाकू घालायचे

लोकसत्ता टीम | Updated: January 25, 2018 2:36 AM

एकीकडे सर्व प्रकारच्या आधुनिकतेच्या प्रकाशात स्वतला न्हाऊमाकू घालायचे आणि त्याच वेळी पुरातन परंपरांचा अंधारही कवळून धरायचा हे सध्याचे समाजवास्तव. यातील वैचारिक आणि वर्तनविषयक विसंगती एवढी रुळलेली आहे की कोणताही तर्कशुद्ध विचार समजून घेण्याची मानसिकताच त्याने अडगळीत फेकली आहे. कंजारभाट समाजात कौमार्य चाचणीविरोधी चळवळ सुरू करणाऱ्या काही तरुणांना झालेली मारहाण हा याच परंपराग्रही निर्बुद्धपणाचा आविष्कार. खेदाची बाब अशी की याचीही एक परंपरा या देशाने जिवापाड जपली आहे. कोणत्याही अद्यतन, सुधारणावादी, तर्कशुद्ध, वैज्ञानिक आणि मानवतावादी विचाराला केवळ पुरातन रूढी-परंपरांच्या नावाने श्रद्धा आणि हिंसापूर्वक विरोध करण्याचा एक इतिहासच आपण रचलेला आहे. त्या तरुणांवरील जातपंचायत समर्थित हल्ले हे त्याचेच उदाहरण. या पंचायतींची निर्मिती ही कोणे एकेकाळी समाजाचे नियमन करण्यासाठी, समाजाचे कायदे वा नैतिक मूल्यांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आली होती. कदाचित कोणे एके काळी त्या उपयुक्तही ठरल्या असतील. परंतु तो ‘कोणे एक काळ’ कायमचा टिकून राहत नसतो. काळ बदलतो. त्यानुसार कायदे, नीतिमूल्येही बदलणे आवश्यक असते. परंतु तशा कोणत्याही बदलाला त्या-त्या समाजातून, जातींतून विरोध होत असतो. त्यामागे बदलांमुळे येणाऱ्या अस्थैर्याचे भय असते. परंतु ते शहाणपणाने, प्रसंगी कायद्याने दूर करता येते. अनेक सामाजिक सुधारणा अशा प्रकारे झालेल्या आहेत. मात्र सुधारणांना होणाऱ्या विरोधामागे आणखी एक भय असते. ते असते सत्ता जाण्याचे. कोणत्याही व्यवस्थेत हितसंबंधीयांच्या सत्तेची एक उतरंड आपोआपच तयार होत असते. समाज वा जातींच्या रचनेतही ती दिसते. जातपंचायत हा त्याचाच एक भाग. या पंचायतींच्या सत्तेला आधार असतो तो रूढी-परंपरांचा. कंजारभाट समाजातील काही तरुण-तरुणींनी त्यातील एका – कौमार्य चाचणीच्या- रूढीविरोधात समाजमाध्यमांतून चळवळ सुरू केली. केवळ महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी ही रूढी लांच्छनास्पद आहे. ती कालबाह्य़ आहेच आणि तरीही सुरू आहे. याचे कारण ती त्या समाजातील पुरुषांच्या सत्तेचे वहन करीत आहे. दुपदरी सत्ता आहे ती. एकाचवेळी महिलांना लगाम घालणारी आणि दुसरीकडे त्या महिलांच्या कुटुंबांतील पुरुषांनाही गुलाम करणारी. ती कायम असण्यात जातपंचायतींना कमालीचा रस आहे याचे कारण हे आहे. या सत्तेला काही शिकलेले तरुण-तरुणी विरोध करतात हे जातपंचायतीला कसे मानवणार? त्यांनी आता या मुलांचा लढा दडपण्यास सुरुवात केली आहे. त्या संघर्षांची दखल ‘चतुरंग’ पुरवणीतून ‘लोकसत्ता’ घेईलच; पण त्या सुधारणावादी मुलांच्या या लढाईतील एक बाब येथे आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे त्यांना समाजातील महिलांचा पाठिंबा आहे तो फारसा लक्षणीय नाही. गुलामांना गुलामीची जाणीवही होऊ द्यायची नाही. उलट त्यांना त्याचा अभिमानच वाटला पाहिजे, हे येथील जातवर्चस्ववादातील एक सत्तातत्त्व. त्याच आधारे या जातपंचायती आपले बळ टिकवून आहेत, ही बाब सुधारणावादाच्या लढय़ातील प्रत्येक पाईकाने ध्यानात घ्यायला हवी. कारण हे सारेच अत्यंत विचित्र आहे. ज्यांच्यासाठी लढायचे त्यांचाच त्या लढय़ाला विरोध असा हा प्रकार आहे. अतिशय विषम असे पुरातन विरुद्ध अद्यतनाचे युद्ध आहे. आणि म्हणूनच त्यात सरकारने आणि समाजातील जाणत्यांनी त्या तरुणांना बळ दिले पाहिजे.

First Published on January 25, 2018 2:36 am

Web Title: what is the truth about virginity testing
  1. Vinay Ramteke
    Jan 25, 2018 at 5:25 am
    कंजारभाट समाजातील त्या तरुणांचे खरे तर स्वागत करायला हवे मनुवादी विचारसरणी बाळगलेल्या जातपंचायती कायद्याने बंदच करायला हव्यात. भारतात विविध जाती संस्कृतीने अक्षरश धुमाकूळ घातलेला आहे मग ते महाराष्ट्रातली जात पंचायती असोत वा हरियाणातील वैचारिकदृष्ट मागासलेल्या राज्यातल्या खाप पंचायती असोत जातीय अस्मितेच्या स्वयंघोषित रक्षकांना आपला समाजावर वाचक राहील कसा याची ते पुरेपूर काळजी ते बाळगतात त्यातूनच सुधारणावादी विचारसरणी असलेल्या व्यक्तींवर हल्ले घडवून आणले जातात गौरी लँकेशा,कल ्गी, दाभोलकर , पानसरे ही त्याचीच उदाहरणे आहेत. जोपर्यंत कायद्याचा धाक तत्सम संस्कृतीरक्षक म्हणवून घेणार्यांना होत नाही तो पर्यंत जातीय अस्मितेचे बांडगुळे डोके वर काढताच राहतील
    Reply