भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील मिग २१ लढाऊ विमाने, लष्कराकडील ‘चीता’ व ‘चेतक’ हेलिकॉप्टरे आणि आता सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यातील विमाने यांचा संदर्भ नुकत्याच झालेल्या अपघातामुळे देणे भाग पडले आहे. देशाच्या संरक्षणाची भिस्त सांभाळणाऱ्या यंत्रणांना कालबाह्य व सदोष लष्करी सामग्रीची काय किंमत मोजावी लागते, याची प्रचीती पुन्हा एकदा दिल्लीत घडलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या विमान अपघाताने आली आहे. या अपघातात सीमा सुरक्षा दलाच्या १० जवान व तंत्रज्ञांना नाहक प्राण गमवावे लागले. या अपघाताची रीतसर चौकशी होईल. त्यातून कारणही पुढे येईल. तथापि, या घडामोडीत जुनाट सामग्री आणि त्यांची देखभाल याविषयी ठोस निर्णय होणे आवश्यक झाले आहे. जवळपास दोन दशकांपासून वापरात असणारे सीमा सुरक्षा दलाचे हे सुपर किंग विमान. जगात जे देश या विमानांचा वापर करीत होते, त्यांनी कधीच त्यांना निरोप दिला आहे. पण भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यात नवीन विमाने समाविष्ट होत नसल्याने त्यांचा आजदेखील वापर होत आहे. जुनाट सामग्रीमुळे होणारे अपघात ही देशातील काही पहिलीच घटना नाही. हवाई दल आणि लष्कराला वारंवार अशा अपघातांना सामोरे जावे लागल्याचा इतिहास आहे. त्याविरोधात लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी आवाज उठविला. प्रारंभी निर्णय घेताना दिरंगाई आणि नंतर तो घेतल्यानंतर अंमलबजावणीत होणारे कालहरण अनेकांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे. सीमांच्या संरक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सीमा सुरक्षा दलावर आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर लष्कर तैनात करता येत नाही. तसेच राज्याच्या अखत्यारीतील पोलीस दलास सीमेवर प्रभावी कामगिरी करण्यास मर्यादा येत असल्याचे लक्षात घेऊन १९६५ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत खास या दलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. घुसखोरी व अतिरेकी कारवाया रोखणे, नैसर्गिक आपत्तीप्रसंगी मदतकार्य अशा अनेक मोहिमांमध्ये हे दल सक्रिय आहे. त्यांच्या हवाई विभागाकडे सद्य:स्थितीत एम्बरर १३५ जे, अ‍ॅव्हरो आणि सुपरकिंग बी २०० ही विमाने आहेत. बीएसएफ वापरत असलेली ही विमाने १० ते ३० वर्षे जुनी आहेत. नवी विमाने समाविष्ट करण्याची अनेक वर्षांपासून चाललेली प्रक्रिया अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. परिणामी, जीव धोक्यात टाकून त्यांचा वापर करणे क्रमप्राप्त ठरले. या विमानांची देखभाल व दुरुस्ती यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. देशात या पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या देखभालीसाठी हवाई दलाच्या अखत्यारीत स्वतंत्र व्यवस्था झाल्यास त्यांच्या अनुभवाचा उपयोग इतरांना होईल. कालबाह्य लष्करी सामग्रीमुळे जीव गमवाव्या लागलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना तोंड द्यावे लागले. अशी घटना घडल्यावर भावनिक उद्रेक होणे स्वाभाविकच. हा उद्रेक तात्कालिक असला तरी त्यातील तथ्याकडे डोळेझाक करता येणार नाही. जिवावर उदार होऊन देशाचे रक्षण करणाऱ्यांना जुनाट वा सदोष सामग्रीमुळे प्राण गमवावे लागणार नाहीत याची हमी देण्यासाठी तातडीने कृतीची गरज आहे. सर्व निमलष्करी दलांच्या ताब्यातील विमानांची देखभाल हवाई दलाकडे, ही त्या कृतीची पहिली दिशा असायला हवी.