03 August 2020

News Flash

आकर्षक केशभूषेच्या टिप्स

चांगल्या वेशभूषेला आकर्षक केशभूषेची जोड असेल तरच ती चारचौघांत लक्षवेधी ठरते आणि सौंदर्य खुलवते.

दिवाळीचा सण म्हणजे साजशृंगाराची पर्वणीच. त्यामुळे दिवाळीतील चार दिवसांतील कपडय़ांची खरेदी, त्यासोबत अलंकारांचा साज या गोष्टींची तयारी जवळपास महिनाभर आधीपासूनच सुरू होते; पण चांगले कपडे किंवा उठून दिसणारे दागिने एवढय़ानेच भागत नाही. चांगल्या वेशभूषेला आकर्षक केशभूषेची जोड असेल तरच ती चारचौघांत लक्षवेधी ठरते आणि सौंदर्य खुलवते. त्यामुळे महिलावर्गाचे आकर्षक केशरचनेवर विशेष लक्ष असते. एरवी केसांची गुंडाळी करून झटपट बांधलेला अंबाडा किंवा एखादी सरळसोट वेणी यावर भागवणाऱ्या स्त्रियादेखील सणासुदीच्या दिवशी आकर्षक आणि वेगळय़ा केशरचनेवर भर देतात. यासाठी प्रसंगी घरातल्या इतर स्त्रियांची मदत घेतली जाते किंवा अधिक चांगली केशरचनेसाठी थेट पार्लरची वाट धरली जाते. मात्र, येत्या दिवाळीत तुम्ही पार्लरमध्ये जाऊन खर्च होणारे पैसे हमखास वाचवू शकतात. स्मार्टफोनवरील अ‍ॅपच्या महाजालात हेअरस्टाइल अर्थात केशरचनेशी संबंधित असंख्य अ‍ॅप्स तुम्हाला मिळतील. यातील काही अ‍ॅप आकर्षक केशरचना दर्शवतात, तर काही वेगवेगळय़ा केशरचनांच्या टिप्स देतात, काही केशरचना कशी करायची हे दाखवतात, तर काही तुमचा लूक बदलणाऱ्या केशरचना सुचवतात. त्यामुळे एखाद्या फावल्या वेळात अ‍ॅप स्टोअरवर किंवा गुगल प्लेवर जाऊन तुम्ही अशा अ‍ॅपमधून आपल्याला हव्या त्या अ‍ॅपची निवड करून ते इन्स्टॉल करू शकता.

ही शोधाशोध टाळायची असेल तर ‘हेलेनसॉफ्ट’ या कंपनीने विकसित केलेले हेअरस्टाइल्स स्टेप बाय स्टेप (Hairstyles Step by Step) हे अ‍ॅप जरूर अजमावून पाहा. या अ‍ॅपवर केशरचनेच्या अनेक पद्धती विस्ताराने सचित्र टप्प्याटप्प्यांत दाखवण्यात आल्या आहेत. वेण्या बांधण्याच्या वेगवेगळय़ा पद्धती, झटपट केशरचना, केशसंभार आकर्षक बनवण्यासाठी करता येण्यासारख्या गोष्टी अशी सगळी माहिती तुम्हाला या अ‍ॅपवर पाहायला मिळते. विशेष म्हणजे हे अ‍ॅप पूर्णपणे मोफत असून डाऊनलोड व इन्स्टॉल केल्यानंतर इंटरनेटचा वापर न करताही ते हाताळता येते.

या अ‍ॅपखेरीज अनेक अ‍ॅप्स आहेत ज्यावर वेगवेगळय़ा हेअरस्टाइल्सची माहिती आणि ती साकारण्याची पद्धत जाणून घेता येते. ५० क्यूट हेअरस्टाइल्स, ५ मिनिटे हेअरस्टाइल्स, थाऊजंड प्लस गर्ल्स हेअरस्टाइल्स, पोनी हेअरस्टाइल्स असे अ‍ॅप्स तुम्हाला नक्कीच आवडतील. याशिवाय प्ले स्टोअरवर ब्रायडल अर्थात वधूसाठीच्या केशरचनेशी संबंधित अ‍ॅपचे भांडारच खुले करून देण्यात आले आहे. यावर अतिशय आकर्षक अशा केशरचना तुम्हाला पाहायला मिळतील. ‘पफ’ नावाच्या अ‍ॅपवर तर केशरचनेचे व्हिडीओज तुम्हाला पाहायला मिळतील. या ध्वनिचित्रफितींच्या मदतीने तुम्ही घरबसल्या वेगवेगळय़ा केशरचना करून आपले सौंदर्य खुलवू शकता आणि दिवाळीतील वेशभूषेला अधिक उठावदार बनवू शकता.

असिफ बागवान – asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2016 5:28 am

Web Title: how to make an awesome hairstyle
Next Stories
1 गाडीचे व्यवस्थापन
2 गायनाची हौस
3 रांगोळीच्या ‘स्मार्ट’ आयडिया
Just Now!
X