संगीत हा प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असतो. कुणाला तरल संथ सुरावटींचं शास्रीय संगीत भावतं तर कुणाला पावले थिरकायला लावणारं रॉक म्युझिक आवडतं. कुणी उच्च शब्दसंपदेचा आविष्कार असलेल्या गझलच्या प्रेमात असतो तर कुणी जुन्या हिंदी गाण्यांच्या श्रवणाने तृप्त होत असतो. संगीताचे प्रकारही अनेक असल्याने प्रत्येकाला आपल्या आवडीचा संगीतप्रकार आणि त्याच्याशी संबंधित गाणी ऐकायला मिळत असतात. ही ओढ श्रवणापुरतीच मर्यादित नसते तर, आपल्यापैकी प्रत्येक जण गायनाचीही हौस बाळगून असतो. मग ‘बाथरूम सिंगर’ असो, घरातल्या घरात गायनाची हौस भागवणारे असोत की, मिळेल त्या व्यासपीठावर आपल्या गानकलेचे कसब मांडणारे गायक असो, गायन हादेखील आपल्या जिव्हाळय़ाचा विषय असतो. पण सहज गंमत किंवा ओठांवर आलं म्हणून गुणगुणणं आणि आपल्यातल्या आवाजाला सुरांच्या हिंदोळय़ावर झुलवून कलासक्तीचा आनंद लुटणं, यात फरक आहे. दुसऱ्या प्रकारात गायकाला गरज लागते ती संगीताची. विशेषत: सोसायटीतील एखाद्या समारंभात गायचं असेल किंवा अॅफिसात, महाविद्यालयात होणाऱ्या एखाद्या गायन स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल किंवा अगदी एखाद्या ‘टॉलेंट शो’मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपल्या गायनाला संगीताची जोड असणं अतिशय आवश्यक बनतं. गायनाची हौस अगदी व्यावसायिकपणे भागवणारे अनेक छोटे-मोठे स्टुडिओ मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांत उपलब्ध झाले आहेत. या स्टुडिओंमध्ये तासाचे भाडे मोजून आपल्याला हवी ती गाणी अगदी संगीताच्या तालावर गाऊन रेकॉर्ड करता येतात आणि त्या पेनड्राइव्ह, सीडीवर साठवूनही ठेवता येतात. परंतु, हा खर्चीक मार्ग नको असेल तर तुम्ही आपल्या घरालाच स्टुडिओ बनवून मोबाइलवर गाडी रेकॉर्ड करू शकता. यासाठी अँड्रॉइड आणि अॅपलवर असंख्य ‘कराओके’ अॅप उपलब्ध आहेत.

अॅप स्टोअरवर विविध संगीत प्रकारांनुसार ‘करोओके’ अॅप आढळून येतात. त्यातील आपल्याला अधिक भावेल असे अॅप म्हणजे ‘गाओ बॉलीवूड अॅण्ड हिंदी कराओके’ (Gaao Bollywood & Hindi Karaoke) हे अॅप. नावाप्रमाणेच बॉलीवूडमधील शेकडो हिंदी गाण्यांचे बोल आणि स्वर असलेल्या या अॅपमध्ये हिंदीखेरीज मराठी व अन्य भारतीय भाषांमधील गाणीही उपलब्ध आहेत. हे अॅप डाउनलोड करून त्यावरील गाणी निवडून तुम्हाला ‘रेकॉर्डिंग’ सुरू करता येईल. विशेष म्हणजे, आपल्या आवाजाला विविध इफेक्ट देणे, व्हिडीओ रेकॉर्ड करणे, सोशल मीडियावर शेअर करणे आदी गोष्टी करण्याचीही सुविधा या अॅपवर आहे. या अॅपमध्ये ‘एको’, ‘थिएटर’, ‘केटीव्ही’, ‘कॉन्सर्ट’, ‘स्टुडिओ’, ‘रिव्हर्ब’ अशा प्रकारचे इफेक्ट अनुभवायला मिळतात.

अशाच प्रकारचे अनेक अॅप तुम्हाला अॅप स्टोअर किंवा गुगल प्लेवरून मिळवता येतील. त्यापैकी ‘योकी’चे ‘कराओके’ हे अॅप जगभरात लोकप्रिय आहे. या अॅपवर इंग्रजी गाणी उपलब्ध आहेत. याशिवाय ‘स्मूल’, ‘रेड कराओके सिंग अॅण्ड रेकॉर्ड’, ‘गाओ न कराओके’ असे अनेक अॅप्स तुम्हाला मिळतील.

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com