03 August 2020

News Flash

संगणकाचा ‘रिमोट कंट्रोल’

परवा सहज म्हणून फोनची फोटोगॅलरी तपासली तर त्यावरील फोटोंचा आकडा बघून चाटच पडलो.

अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर असे अनेक अ‍ॅप्स आहेत जे तसं पाहता आपल्या दैनंदिन उपयोगाच्या दृष्टीने फार महत्त्वाची नसतात. परंतु, कधी तरी अचानक अशा अ‍ॅप्सचं आपल्या स्मार्टफोनमध्ये असणं अत्यंत आवश्यक वाटू लागतं. कधी प्रवासादरम्यान, कधी कार्यालयीन कामात तर कधी घरात काही काम करीत असताना असे अ‍ॅप्स आपल्याला आठवतात. अशाच एका अ‍ॅपबद्दल आपण आज जाणून घेऊ. ‘माऊस किट (कीबोर्ड+प्रेझेंटर)’ mouse kit (Keyboard Presenter)) नावाचे हे अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनला तुमच्या संगणकाचा माऊस आणि कीबोर्ड बनवते. या अ‍ॅपच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या संगणकावर ‘टायपिंग’ करू शकता, ‘माऊस’सारखा वापर करू शकता. अगदी संगणकावरील प्रोग्रॅम चालू-बंदही करू शकता. यासाठी हे अ‍ॅप स्मार्टफोनवर इन्स्टॉल करण्यासोबतच तुम्हाला तुमच्या संगणकावर ‘मोबाइल बडी’ हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागेल. हे सॉफ्टवेअर या संकेतस्थळावर मिळू शकेल. अ‍ॅप आणि सॉफ्टवेअर आपापल्या ठिकाणी इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून संगणक हाताळू शकाल. त्याद्वारे तुम्ही तुमच्या संगणकावरील कोणत्याही प्रक्रिया करू शकता. या अ‍ॅपचा कीबोर्ड युनिकोडही टाइप करू शकतो, हे विशेष. पण हे अ‍ॅप काम करण्यासाठी तुमचा फोन आणि संगणक एकाच ‘वायफाय’शी कनेक्ट असणे आवश्यक आहे.

आता याचा उपयोग काय, असे म्हणाल तर कार्यालयात पॉवरपॉइंट सादरीकरण करताना रिमोटची गरज लागते. मात्र, रिमोट नसल्यास हे अ‍ॅप वापरून तुम्हाला सादरीकरण करता येते. दुसरं म्हणजे, तुम्ही संगणकावर एखादा चित्रपट बघत असाल तर बसल्या जागेवरून तुम्ही ‘व्हिडीओ प्लेअर’ हाताळू शकता. अशाच प्रकारे संगणकावरील ‘म्युझिक प्लेअर’ हाताळणेही शक्य आहे. त्यामुळे हे अ‍ॅप बहुउपयोगी आहे.

अनावश्यक फोटोंची वासलात

परवा सहज म्हणून फोनची फोटोगॅलरी तपासली तर त्यावरील फोटोंचा आकडा बघून चाटच पडलो. ५६७३ फोटो! बरं या फोटोंनी फोन स्टोअरेजची जागा तरी किती घ्यावी? जवळपास ६२ टक्के! आता एवढे फोटो डिलिट तरी कसे करायचे, हा प्रश्न होता. त्यातूनच ‘गुगल प्ले’वर ‘गॅलरी डॉक्टर’चा शोध लागला. नावाप्रमाणेच तुमच्या स्मार्टफोनच्या फोटोगॅलरीचा ‘स्थूलपणा’ कमी करणारा ‘डॉक्टर’ आहे हा अ‍ॅप. कॅमेरा, व्हॉट्सअ‍ॅप, डाऊनलोड, ईमेल अशा विविध मार्गानी आपल्या फोनमध्ये छायाचित्रे जमा होत असतात. त्यातही ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून छायाचित्रांचा भडिमारच होतो. ही छायाचित्रे आपल्या नकळत आपल्या फोनच्या गॅलरीत जमा होतात. यामुळे फोनची ‘स्टोअरेज स्पेस’ अर्थात साठवण क्षमता कमी करीत जातात. हीच गोष्ट कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंची. आपण अनेकदा एका वेळी पाच-सहा फोटो ‘क्लिक’ करतो. त्यातील एखादा फोटो चांगला निघतो. पण बाकीच्या छायाचित्रांचे काय? ती तर फोनमध्ये जमा झालेली असतात. अशी छायाचित्रेही मग फोनला जड पडू लागतात. हे सर्व थांबवायचं असेल किंवा सुधारायचं असेल तर ‘गॅलरी डॉक्टर’ हा उत्तम पर्याय आहे.

‘गॅलरी डॉक्टर’ हे अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनमधील अनावश्यक छायाचित्रे शोधून काढतो आणि ती तुमच्या परवानगीने उडवून टाकतो. या अ‍ॅपची छायाचित्र निवड प्रक्रियाही चांगली आहे. एकाच प्रकारचे फोटो, अस्पष्ट किंवा अंधूक छायाचित्रे, कमी दर्जाची छायाचित्रे एवढेच नव्हे तर तुमची ‘वाईट्ट’ आलेली छायाचित्रेही हे अ‍ॅप हुडकून काढते. त्यानंतर ही छायाचित्रे गोळा करून तुमच्यासमोर आणली जातात आणि मग त्यांची वासलात लावली जाते. याशिवाय ‘गॅलरी डॉक्टर’ने निवडलेले फोटो तुम्ही एका ‘स्वाइप’वर ठेवू अथवा हटवू शकता. ‘गॅलरी डॉक्टर’च्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची किमान ३५ टक्के जागा नक्कीच वाचवू शकता.

-असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2016 1:13 am

Web Title: smart phone photo gallery article
Next Stories
1 फोटोंच्या ‘मूव्ही’ बनवा!
2 किचनच्या गोष्टी
3 ‘सीएनजी’चा शोध
Just Now!
X