शारदा दाते prathmesh_date@rediffmail.com

डी.के.टी.ई. या संस्थेच्या टेक्सटाइल इंजिनीअिरग कॉलेजमध्ये ग्रंथालयात लायब्ररी अटेंडंट म्हणून एक तरुण कार्यरत आहे, तो संगणकावर बघून कोणते पुस्तक कुठे मिळेल हे अचूक सांगतो. हे सर्व करणारा प्रथमेश दाते हा गतिमंद आहे. त्या यशाचे श्रेय आहे ते त्याची आई शारदा दाते यांचे. आईच्या आजारपणात तिचा आधार होणाऱ्या प्रथमेशविषयी..

खरं तर त्याचं वागणं, त्याच्या कत्रेपणानं मला रडवलं ते माझ्या आजारपणाच्या काळात. त्याला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांनी आम्ही आनंदात असतानाच, मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. आम्ही ही गोष्ट त्याच्यापासून लपवली होती. मात्र माझ्या आजारपणाविषयी माझ्या बहिणीशी बोलताना प्रथमेशनं ते ऐकलं. तो गळ्यात पडून म्हणाला, ‘‘मी मोठा झालो असं तू म्हणतेस आणि एवढा मोठा कर्करोग झाला ते तू मला का सांगितले नाहीस? तू काळजी करू नको, मला मिळालेले नॅशनल ट्रस्टचे पन्नास हजार रुपये बँकेत आहेत. ते घे. शिवाय माझा पगारही आहे. तुझा मुलगा मिळवता आहे.’’

प्रथमेशच्या या कत्रेपणानं मलाच नाही, सगळ्यांनाच रडवलं. त्याने माझ्या शस्त्रक्रियेनंतरही औषधं देणं, अंथरूण घालणं अतिशय जबाबदारीनं केलं. प्रथमेशमुळे माझी इच्छाशक्ती अधिकच प्रबळ झाली आणि मी दुखण्यातून बाहेर पडले.

आपल्या गतिमंदपणावर मात करत स्वावलंबनासाठीचा २०१० चा राष्ट्रपती पुरस्कार आणि त्याआधी २००९ मध्ये केंद्र सरकारच्या वतीने ‘पर्सन विथ डिसअबिलिटिज्’ या विभागातील व्यक्तिगत पुरस्कार प्रथमेशला मिळाला होता. वयाच्या २१ व्या वर्षांपासून प्रथमेश त्याच्या पायांवर उभा आहे. इचलकरंजीच्या डी.के.टी.ई. या संस्थेच्या टेक्सटाइल इंजिनीअिरग कॉलेजमध्ये ग्रंथालयात लायब्ररी अटेंडंट म्हणून कार्यरत आहे. हे सगळं पाहिलं की कौतुकानं भारावून गेलेलं मन नकळत भूतकाळात जातं.

प्रथमेशचा जन्म आमच्या लग्नानंतर दहा वर्षांनी झालेला. पहिलंच अपत्य, तेही उशिरा झालेलं त्यामुळे ती केवळ आनंदाची बाब, मात्र आमचा आनंद फार काळ टिकला नाही. बाळ अतिशय कमी वजनाचं होतं. त्यामुळे काहीतरी अ‍ॅबनॉर्मल असण्याची शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली. बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पंडित यांनी बाळ ‘डाऊन सिंड्रोम’ असल्याचं सांगितलं. हे ऐकताच आम्हा दोघांना अतिशय दु:ख झालं. पण त्या धक्क्यातून सावरतानाच निर्धार केला लढत राहण्याचा. प्रथमेशला आहे तसं स्वीकारून, त्याच्या सर्व मर्यादांचा विचार करून सामर्थ्यांने प्रथमेशला आयुष्यात उभं करण्याचा. अर्थात हे आमच्यासाठी सोप्पं अजिबात नव्हतं. सगळ्या क्षमतांचा कस लावणारं असं हे पालकत्व ठरणार होतं.

डॉ. आनंद पंडित यांच्या सल्ल्यानुसार प्रथमेशवर उपचार सुरू होते. त्याचं शरीरही फारच अशक्त होतं. त्यामुळे रांगणं, पुढे सरकणं असं काही त्याच्या बाबतीत झालं नाही. तो केवळ उभं राहायचा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘ऑक्युपेशनल थेरपी’ सुरू केली होती. यात प्रथमेशला खांबाला बांधून ठेवायचं आणि पायाला फळ्या बांधून चालायला शिकवायचं, असा तो प्रयोग होता. यामुळे होणाऱ्या वेदनांनी प्रथमेश जोरात किंचाळायचा. त्या लहानग्याच्या वेदना पाहून आम्हा दोघांच्या हृदयाचं पाणी व्हायचं. हुंदके दाबून फक्त आणि फक्त तो चालायला लागेल या आशेने ते सगळं मी सहन केलं. त्या उपचारांचा उत्तम परिणाम होऊन प्रथमेश साडेतीन वर्षांचा झाल्यावर चांगला चालायला लागला.

त्याला शाळेत घालण्याबद्दलही डॉ. पंडित यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की, ‘प्रथमेश गतिमंद आहे, मतिमंद नाही. त्याच्या डाऊन सिंड्रोमची लेव्हल सामान्यांच्या जवळच आहे, तेव्हा त्याला सामान्य मुलांच्या शाळेत घाला.’ त्यांनी दिलेल्या पत्रामुळेच प्रथमेशला इचलकरंजीच्याच ‘श्रीमंत सौ. गंगामाई विद्यामंदिर’मध्ये बालवाडीसाठी प्रवेश मिळाला. डॉ. पंडितांनी प्रथमेशसाठी अगदी तो मोठा झाला तरी वेळोवेळी मार्गदर्शन केलं.

शाळेत त्याला प्रवेश मिळाला खरं मात्र तिथं असणाऱ्या मुलांना, अपरिचित असणाऱ्या वातावरणाला घाबरून कावराबावरा झालेला प्रथमेश भीतीने चड्डी ओली करू लागला. मला तर त्याचं शिकणं हवं होतं, त्यासाठी काहीही करण्याची तयारी मी ठेवली होती. मग मी त्याचे कोरडे कपडे, फडकी घेऊन वर्गाबाहेर पायरीवर बसून राहायची. बाईंचा निरोप आला की फरशी स्वच्छ करायची, त्याचे कपडे बदलायचे असं सारखं सुरू असायचं. बालवाडी संपत यायच्यावेळी मात्र तो शाळेत रमला आणि त्याला शाळा आवडूही लागली.

पुढे मात्र शाळेतील अभ्यास, विषय वाढले. त्यावेळी मी त्याला वाक्यच्या वाक्य लिहिणं शक्य होणार नाही हे लक्षात घेऊन आब्जेक्टिव्ह पद्धतीनं प्रश्न सोडवून पास होण्यापुरते गुण कसे मिळतील हे पाहिलं. त्याचं चालणं सुधारलं होतं तरी त्याचा आवाज आणि शब्दोच्चार सुधारण्याची गरज होती, त्यासाठी फुगे फुगवून घेणे, श्लोक पाठ करून घेणे, वाद्यांच्या वापर असे अनेक उपाय मी करवून घेतले. खूप प्रयत्नांनंतर आम्हाला यश दिसू लागलं. प्रथमेश नववीपर्यंत पास होण्यापुरते गुण मिळवत दहावीत गेला. दहावीत गणित सोडून तो सगळ्या विषयांत पास झाला. हा आमच्यासाठी कौतुकाचा विषय होता.

प्रथमेशला समाजात मिसळणं सोप्प जावं, तो गर्दीला, माणसांना घाबरू नये, स्वावलंबी बनावा यासाठी त्याच्या बाबांनी खूप प्रयत्न केले. फेरीवाले, विक्रेते, पोस्टमन यांच्या कामाची ओळख करून दिली. मोठय़ा शहरामंध्ये, गर्दी असणाऱ्या दुकानांमध्ये, मॉलमध्ये, ट्रेनमध्ये त्याला फिरवलं, त्यामुळे त्याला स्वतंत्ररीत्या फिरण्याचा आत्मविश्वास आला. या सगळ्या प्रवासात वाईट अनुभव आले नाहीत असं झालं नाही. प्रथमेशचे उभे राहिलेले केस, बारीक डोळे, बावरलेला चेहरा पाहून मुलं त्याला चिडवत, त्याची नक्कल करत. किंवा अनेकदा आम्हाला त्याच्या अपंगत्वाविषयी विचारणं, अनाहूत सल्ले देणं हे सुरूच होतं. हे सगळं पाहिलं की खूप वेदना होत. शिवाय वेळोवेळी त्याला होणारा त्रास, किंवा शस्त्रक्रिया यांनीही अनेकदा खचायला व्हायचं. मात्र त्याच्या अंगच्या समजूतदारपणामुळे तेही त्याने निभावून नेलं. तो दहावी झाल्यावर अखेर संगणकाच्या साह्यने त्याला साजेशी केशरचना करून दिली. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वात बराच फरक पडला. आम्ही त्याला संगणकाचं प्रशिक्षण दिलं. ते त्याला आवडलंही आणि जमलंही. तो मराठी टायिपग करायला शिकला. इचलकरंजीतून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकात त्याला टाइप सेटिंगची नोकरी मिळाली. तिथे वेळ रात्री उशिरापर्यंतची होती. मला नेहमी काळजी वाटायची, पण त्याने चिकाटीने काम केलं. तो जेव्हा पहिला पगार घेऊन आला आणि ते पैसे त्याने माझ्या हाती दिले तेव्हा आनंदाने माझे डोळे वाहू लागले. ते पैसे माझ्यासाठी अमूल्य होते. पण आपण आईला आपल्या पगाराचे पैसे दिल्यानंतरही ती का रडते ते निरागस प्रथमेशला समजलंच नाही.

दरम्यानच्या काळात ग्रंथालयात वापरता येईल अशा सॉफ्टवेअरची माहिती त्याच्या बाबांना मिळाली. त्यासाठी ते पुण्यात जाऊन डॉ. मधुसुदन गायकैवारी यांना भेटले, डॉ. गायकैवारी यांनी स्वत: इचलकरंजीत येऊन प्रथमेशला प्रशिक्षण दिलं. डॉ. पंडित, गायकैवारी यांच्यासारखी सहृदय व्यक्तींमुळे प्रथमेशची वाटचाल सोपी झाली असं म्हणण्यास हरकत नाही. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला डी.के.टी.ई. या संस्थेच्या टेक्सटाइल इंजिनीअिरग कॉलेजमध्ये ग्रंथालयात लायब्ररी अटेंडंट म्हणून नोकरी मिळाली. मुख्य म्हणजे त्याला ही नोकरी खूप आवडली. रोज सकाळी नऊ वाजता तो तयार होऊन लुनावर बसून कॉलेजला जायला निघतो तेव्हा मन कौतुकाने भरून येतं. शिवाय तो आमचा व्यवसायही शिकून घेत आहे. तिथेही तो आम्हाला मदत करतो.

प्रथमेशला आता देश-विदेशांतून व्याख्याने द्यायला बोलावलं जातं, त्याचा, त्याचे पालक म्हणून आमचा सत्कार केला जातो. या प्रवासाचं सार एकच आहे, आपल्या मुलाबाबत निर्णय हा आपल्यालाच घ्यावा लागतो. आपण घेतलेला निर्णय आपल्यालाच निभवावाही लागतो. तो निर्णय मनापासून निभावला की त्याचं फळ हे नेहमी चांगलंच मिळतं.

chaturang@expressindia.com