प्रश्न : मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मी काही कारणाने मागील दोन वर्षांचे म्हणजे आर्थिक वर्ष २०१५-१६ आणि २०१६-१७ चे विवरणपत्र भरू शकलो नाही. या दोन्हीही वर्षांसाठी माझे करपात्र उत्पन्न आहे आणि उद्गम करसुद्धा कापला गेला आहे. मी विवरणपत्र दाखल करू शकतो का? मला व्याज किंवा दंड भरावा लागेल का?

श्रीकांत फाटक, नाशिक

उत्तर : या दोन्हीही वर्षांचे विवरणपत्र आपण दाखल करू शकता. मागील वर्षांपर्यंत करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षांच्या आत विवरणपत्र दाखल करता येत होते. आर्थिक वर्ष २०१५-१६ सालचे विवरणपत्र करनिर्धारण वर्ष (२०१६-१७) संपल्यानंतर एक वर्ष म्हणजेच ३१ मार्च २०१८ पर्यंत दाखल करू शकता. आर्थिक वर्ष २०१६-१७ सालपासून विवरणपत्र करनिर्धारण वर्ष (२०१७-१८) संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्च २०१८ पर्यंत दाखल करू शकता. थोडक्यात दोन्हीही वर्षांचे विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१८ ही आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ आणि २०१६-१७ चे विवरणपत्र ३१ मार्च २०१८ नंतर आपण दाखल करू शकणार नाही. त्यामुळे त्वरा करा आणि दोन्हीही विवरणपत्रं ३१ मार्च २०१८ पूर्वी दाखल करा. आपण ज्येष्ठ नागरिक असाल आणि आपल्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नसेल तर आपल्याला फक्त २३४ अ या कलमानुसार देय कर रकमेवर दरमहा १ टक्का इतक्या दराने व्याज भरावं लागेल. आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तर कलम २३४ अ व्यतिरिक्त कलम २३४ ब आणि २३४ क नुसारसुद्धा आपल्याला व्याज भरावे लागेल (जर आपला देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर!)

प्रश्न : माझ्या वडिलांचे एप्रिल २०१७ मध्ये निधन झाले, त्यांचे नावे असलेल्या बँकेतील मुदत ठेवींवर वारसदार म्हणून माझे नाव होते. मुदत ठेव रक्कम १,५०,००० रुपये अधिक व्याज १२,००० रुपये मिळून १,६२,००० रुपये रक्कम मे २०१७ मध्ये माझ्या बचत खात्यावर जमा झाले, सदरची रक्कम उत्पन्न म्हणून माझ्या उत्पन्नात धरावी लागेल का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

महेंद्र हावरे, ई-मेलद्वारे

उत्तर : आपल्याला वारसदार म्हणून मिळालेली रक्कम म्हणजेच १,६२,००० रुपये आपल्याला करपात्र नाही. त्यामुळे ही रक्कम आपल्या उत्पन्नात गणली जाणार नाही. परंतु ती रक्कम पुढे गुंतविली तर त्यावर मिळणारे उत्पन्न आपल्या उत्पन्नात गणले जाईल आणि त्या उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागेल. वडिलांचे निधन होण्यापूर्वी मुदत ठेवींवर मिळालेल्या व्याजाच्या उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागणार नाही.

प्रश्न : मी २० वर्षांपूर्वी एक प्लॉट खरेदी केला होता. त्या प्लॉटची विक्री करून मी दुसऱ्या ठिकाणी एक घर खरेदी केले. घराची खरेदी किंमत प्लॉटच्या विक्री किमतीपेक्षा जास्त आहे. मला प्लॉट विक्रीच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का?

विनोद धुमे, ईमेलद्वारे

उत्तर : घराव्यतिरिक्त कोणत्याही मालमत्तेची विक्री करून दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झालेला असेल आणि नवीन घरात गुंतवणूक केली असेल तर कर भरावा लागत नाही. ‘कलम ५४ एफ’नुसार आपण नवीन घरात गुंतवणूक केली असे दाखवून भांडवली नफ्यावरील कर वाचवू शकता. आपल्याला काही अटींची पूर्तता करावी लागेल. या अटी पुढीलप्रमाणे (१) प्लॉटची संपूर्ण विक्री किंमत (विक्रीसाठीचा खर्च वजा जाता) नवीन घरात गुंतवली असली पाहिजे (२) करदात्याकडे नवीन घरातील गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त एकापेक्षा जास्त घरे असता कामा नयेत. (३) नवीन घरात गुंतवणूक प्लॉट विक्रीच्या एक वर्षांपूर्वी किंवा दोन वर्षांच्या आत (बांधले तर तीन वर्षे) केली असली पाहिजे. (४) नवीन गुंतवणूक एकाच घरात करता येते (५) घर भारतातच असले पाहिजे. या अटींची पूर्तता केलेली असल्यास आपल्याला कर भरावा लागणार नाही.

प्रश्न : मी २०११ मध्ये ११ लाख रुपयांना एक सदनिका खरेदी केली होती आणि ती मी २०१८ मध्ये १४ लाख रुपयांना विकली तर मला किती कर भरावा लागेल?

प्रशांत निंबाळकर, ईमेलद्वारे

उत्तर : आपण घर खरेदी केल्या तारखेपासून सात वर्षांनंतर विकले असल्यामुळे होणारा भांडवली नफा दीर्घ मुदतीचा असेल. त्यामुळे आपल्याला महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येईल. आपण २०११ मध्ये घर खरेदी केले आहे त्या वर्षीचा म्हणजे आर्थिक वर्ष २०११-१२ सालचा महागाई निर्देशांक १८४ आहे आणि आर्थिक वर्ष २०१८-१९ चा निर्देशांक अजून प्रकाशित झालेला नाही, आपण तो २८० असा गृहीत धरू. यानुसार आपली खरेदी किंमत खालीलप्रमाणे :

खरेदी किंमत = ११,००,००० (भागिले) १८४  (गुणिले) २८० = १६,७३,९१३

या गणनेनुसार आपल्या सदनिकेची खरेदी किंमत १६,७३,९१३ रुपये इतकी आहे. आणि विक्री किंमत १४ लाख रुपये असेल तर आपल्याला २,७३,९१३ रुपयांचा दीर्घ मुदतीचा तोटा होईल. यामुळे आपल्याला कर भरावा लागणार नाही. सदनिकेच्या मुद्रांक शुल्कासाठी मूल्यांकन आपल्या विक्री करार मूल्यापेक्षा कमी आहे असे गृहीत धरले आहे. हा तोटा आपण इतर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करू शकता आणि या वर्षी दीर्घ मुदतीचा भांडवली नफा नसेल तर पुढील आठ वर्षांसाठी तो कॅरी फॉरवर्ड करता येईल.

प्रश्न : मी २०१७ मध्ये एक घर बुक केले आहे आणि या घराचा ताबा मला मार्च २०१८ मध्ये मिळणार आहे. घराची किंमत ६३ लाख रुपये आहे. यासाठी मी बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे. माझ्याकडे एक प्लॉट आहे तो मी पुढील महिन्यात विकण्याचे ठरवीत आहे. हा प्लॉट मी १० वर्षांपूर्वी खरेदी केला होता. या प्लॉटच्या विक्रीतून मिळणारे पैसे (अंदाजे ५० लाख रुपये) मी बँकेचे गृहकर्ज परतफेडीसाठी वापरले तर मला प्लॉट विक्रीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का?

धनंजय झोडपे, ईमेलद्वारे

उत्तर : आपण प्लॉटच्या विक्रीतून झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल तर कलम ५४ एफ नुसार नवीन घरात गुंतवणूक केली पाहिजे. ज्या अटींची पूर्तता करावी लागते. त्या अटी, वरील विनोद धुमे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नमूद करण्यात आलेल्या आहेत. आपण नवीन घरामध्ये, प्लॉट विक्रीच्या एक वर्षे आधी गुंतवणूक केली आहे. कलम ५४ एफनुसार नवीन घरात गुंतवणूक, नमूद करण्यात आलेल्या काळात करणे महत्त्वाचे आहे. या नवीन घरातील गुंतवणुकीसाठी नेमके कोणते पैसे वापरले ते महत्त्वाचे नाही. या संदर्भात करदात्याला अनुकूल असे निर्णय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने (जे.व्ही. कृष्णराव विरुद्ध डी.सी.आय.टी.), मुंबई उच्च न्यायालयाने (ए.सी.आय.टी. विरुद्ध डॉ. पसरिचा) दिले आहेत. माझ्या मते नवीन घरामध्ये गुंतवणुकीची आणि इतर अटींची पूर्तता केल्यास आपल्याला प्लॉट विक्रीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही, जरी हे पैसे आपण गृहकर्जाच्या परतफेडीसाठी वापरले तरी. आपण या संदर्भातील कागदपत्रे दाखवून आपल्या कर सल्लागाराची मदत घ्यावी.

(लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत, त्यांना ई-मेल: pravin3966@rediffmail.com वर वाचक आपले प्रश्न पाठवू शकतील.)