वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

*  मी ६५ वर्षांचा असून ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तांत’चा नियमित वाचक आहे . मी राष्ट्रीयीकृत विमा कंपनीमधून निवृत्त झालो आहे. मला सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळतो, ज्यातून मी मासिक ५,००० रुपयांची बचत करू शकतो. हा पैसा नेमका कोणत्या प्रकारच्या फंडात गुंतवावा?  – प्रफुल्ल पांडे, स्नेहनगर, चंद्रपूर 

तुम्ही तुमच्या सेवानिवृत्ती वेतनातून बचत करू इच्छिता ही आनंदाची गोष्ट आहे. सेवानिवृत्तीनंतर सर्वसामान्यांचा असा समज, ‘मला या वयात काय करायची आहे बचत? खावो, पियो, मजा करो..’ असाच असतो. परंतु जसे वय वाढत जाते तशी महागाईसुद्धा वाढत जाते आणि निवृत्ती वेतन महागाईच्या प्रमाणात वाढत नाही. तेव्हा मिळणारे निवृत्ती वेतन कमी पडू लागते. म्हणून सेवानिवृत्तीनंतर लगेचच ज्या वेळेला आरोग्याच्या फारशा तक्रारी नसतात, तेव्हा बचत ही केलीच पाहिजे. तुम्ही वित्तीय नियोजकाच्या साहाय्याने किंवा ‘लोकसत्ता-कर्ते म्युच्युअल फंड’ या यादीतून एखाद्या बॅलन्स्ड फंडाची निवड करू शकता. ज्या वेळेला मिळणारे सेवानिवृत्ती वेतन कमी पडू लागेल, तेव्हा तुम्ही ‘एसडब्ल्यूपी’द्वारा या फंडातून नियमित रक्कम काढू शकाल.

*  सरकारी नोकरीत वीस वर्षे आणि वयाची चाळिशी मी ओलांडली असून, मला म्यमुच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे. मी कोणत्या फंडात व किती गुंतवणूक करावी? अशी गुंतवणूक कोणाकडे करावी लागते? मी ग्रामीण भागातील असल्यामुळे कृपया माहिती द्यावी.   – सुभाष कोटकर

वयाच्या चाळिसाव्या वर्षी आपण सेवानिवृत्ती पश्चातच्या नियोजनाचा विचार करत आहात त्याबद्दल तुमचे तुमचे अभिनंदन. सध्या आपण ज्या वयोगटात आहात त्या वयात उत्पन्नाचा मोठा हिस्सा कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात जातो. या वयात स्वत:करिता व विशेषत: सेवानिवृत्ती पश्चातच्या नियोजनाचा विचार फारच कमी व्यक्ती करतात. आकडेमोड करण्यासाठी असे आपण समजू की, तुमच्या कुटुंबाचा सध्याचा मासिक खर्च २५ हजार आहे. तुम्ही साठाव्या वर्षी सेवानिवृत्त होणार आहात व पुढील वीस वर्षे महागाईचा दर सरासरी ८ टक्के असेल. तुम्ही सेवानिवृत्त व्हाल तेव्हा तुमचा मासिक खर्च १.१५ लाख रुपयांवर गेलेला असेल. तुम्हाला मासिक खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी २.८५ कोटीच्या सेवानिवृत्ती कोशाची गरज भासेल. असे समजू की सध्या तुमच्या भविष्य निर्वाह निधीतील बचत ५ लाख असून पुढील २० वर्षांत या बचतीवर वार्षिक ७ टक्के व्याज मिळेल. तुम्ही सेवानिवृत्त व्हाल तेव्हा भविष्य निर्वाह निधी व तुमचा स्वत:चा निधी मिळून २.८५ कोटी जमविण्यासाठी मासिक ३२ हजारांची बचत करणे जरुरीचे आहे. या ३२ हजारांच्या बचतीवर वार्षिक १२ टक्के परतावा मिळेल असे गृहीत धरले आहे. अर्थव्यवस्थेतील व्याजदर कमी होत असताना वार्षिक १२ टक्के परतावा केवळ समभागसंलग्न गुंतवणूक देऊ  शकते. दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या ‘लोकसत्ता – कर्ते म्युच्युअल फंड’ यादीची म्युच्युअल फंडाच्या निवडीसाठी तुम्ही मदत घेऊ  शकता अथवा फंड निवडीसाठी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा शोध घेणे गरजेचे आहे.

* ‘अर्थ वृत्तान्त’मध्ये  (७ ऑगस्ट २०१७) लिक्वि ड फंडांबद्दल माहिती दिली होती. त्या लेखात ‘इंस्टंट रिडम्प्शन’चा उल्लेख आहे. अशी सोय कोणत्या फंडात आहे?  – मिलिंद कर्णिक, ठाणे (असाच प्रश्न विजय वराटकर यांनीही विचारला आहे.)

सेबीने प्रत्येक फंड घराण्याला ‘इंस्टंट रिडम्प्शन’ची सुविधा असणारा फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. प्रत्येक फंड घराण्याचा एक तरी फंड ‘इंस्टंट रिडम्प्शन’ सुविधा असलेला आहे. गुंतवणूक मूल्याच्या ९५ टक्के किंवा ५० हजार रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल तितक्या रकमेची ‘इंस्टंट रिडम्प्शन’ची सुविधा गुंतवणूकदारांना यातून उपलब्ध होऊ  शकेल. फंड घराण्याचा संकेतस्थळावर अथवा फंड घराण्याच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे गुंतवणूकदार रिडम्प्शन रिक्वेस्ट नोंदवू शकेल. ही नोंद म्युच्युअल फंडाच्या प्रणालीमध्ये नोंदली गेल्यानंतर मागील उपलब्ध मालमत्ता मूल्यांनुसार तितक्या किमतीची लिक्विड फंडाची युनिट्स विकून जमा झालेली रक्कम गुंतवणूकदारच्या म्युच्युअल फंडाकडे नोंद झालेल्या बँक खात्यात जमा होते. दिवसाचे २४ तास व आठवडय़ाचे सातही दिवस ही सुविधा गुंतवणूकदरांसाठी उपलब्ध असून अनेक गुंतवणूकदार याचा लाभ घेत आहेत. लिक्विड फंडाशी संलग्न डेबिट कार्डाची सुविधादेखील म्युच्युअल फंडांनी सुरू केली आहे. अगदी बँकांच्या डेबिट कार्डाप्रमाणे या कार्डाचा वापर करता येतो. अगदी एटीएममध्ये जाऊन रोखही काढता येते. तुमच्या पसंतीच्या म्युच्युअल फंड घराण्याच्या लिक्विड फंडाची तुम्ही यासाठी निवड करू शकता.

 फंड गुरू