16 January 2021

News Flash

स्वागत तेजीने

सप्ताहातील बाजार घडामोडींचे अवलोकन आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींचे पट मांडणारे सदर

|| सुधीर जोशी

जागतिक अर्थव्यवस्थेसाठी गेल्या सत्तर वर्षांतील सर्वात वाईट ठरलेले २०२० साल समभागात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगले गेले असेच म्हणावे लागेल. बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी वर्षभरात १५ टक्क्यांचा परतावा दिला. त्यामध्ये सर्वात मोठी भर घातली माहिती तंत्रज्ञान आणि औषध व आरोग्य सेवा क्षेत्राने. परदेशी वित्तीय संस्थांनी केलेली एक लाख कोटींहून जास्त रुपयांची गुंतवणूक हे या कठीण परिस्थितीतही भरघोस परताव्याचे मुख्य कारण ठरले. एकदा गुंतवणूक करून त्याकडे वरचेवर लक्ष न देणाऱ्यांसाठी बँकांच्या व्याज दरापेक्षा अथवा महागाईच्या दरापेक्षा नक्कीच जास्त परतावा मिळाला. पण मार्च महिन्यांतील घसरणीनंतर नकारात्मक बातम्यांकडे लक्ष न देता धाडसाने गुंतवणूक करणाऱ्यांना त्याचे घसघशीत फळ मिळाले. घरातून काम करण्याची मुभा मिळालेल्या तरुणांनी बाजारातील गुंतवणुकीचा मार्ग चोखाळला व त्यात यशही मिळाले.

बाजाराच्या हालचालीवर नजर ठेवून गुंतवणूकदारांना सतर्क करण्याचा व गुंतवणुकीच्या संधी शोधण्याचा हा प्रयत्न गेली दोन वर्षे दर शनिवारी ‘बाजार साप्ताहिकी’ मथळ्याखाली प्रसिद्ध होत असे. नवीन वर्षांत दर सोमवारी आपण पाहूया गेल्या सप्ताहातील बाजाराचे अवलोकन व गुंतवणुकीच्या नव्या संधी!

जागतिक बाजारातील रोकड सुलभता, कमी व्याज दर यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहात परदेशी गुंतवणूकदारांकडून नित्यनेमाने अपेक्षित असलेला विक्रीचा दबाव दिसला नाही आणि भारतीय बाजारांचे निर्देशांक दररोज नवे शिखर गाठत होते. सप्ताह अखेर नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी निफ्टीने चौदा हजारचा टप्पा पार करून नववर्षांचे हर्षभरित स्वागत केले.

शेतीपूरक उत्पादने व कीटकनाशके बनविण्यासाठी लागणारी रसायने निर्माण करणारी भारत रसायन ही एक अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचे ५० टक्के उत्पादन त्याच समूहातील कंपन्यांना विकले जाते. कंपनीचे कर्जाचे प्रमाण नगण्य आहे. कंपनी आंतरराष्ट्रीय व्यापार व कंत्राटी उत्पादन क्षेत्रात आपला सहभाग वाढवीत आहे. चीनबद्दलच्या जागतिक नकारात्मक धोरणाचा कंपनीला फायदा होईल. कंपनीने एक वर्षांपूर्वी उभारलेल्या दहेज येथील कारखान्यात २०२० साली बॅकवर्ड इंटिग्रेशन करून कच्चा माल पुरवठय़ात स्वायत्तता मिळविली आहे. कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य खरेदीसाठी आकर्षक आहे.

डीव्हीज लॅब या भारतातील या सर्वात मोठय़ा एपीआय उत्पादक कंपनीचे पहिल्या सहा महिन्यांचे निकाल उत्कृष्ट होते. विक्रीमधे ३३ टक्के तर नफ्यात ६० टक्के वाढ झाली होती. कंपनी कंत्राटी उत्पादनात अग्रेसर आहे. चीनवरील नकारात्मक भावनेचा कंपनीला फायदा मिळेल. ३० वर्षे पूर्ण केलेल्या या कंपनीने उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ३,७०० कोटींचा मोठा विस्तार कार्यक्रम हाती घेतला आहे. सध्याच्या बाजार मूल्यात वर्षभराच्या मुदतीत कंपनीमधील गुंतवणूक चांगला फायदा देऊ शकेल.

डिसेंबर महिन्यासाठी जीएसटी संकलनाचे उच्चांकी आकडे व वाहन विक्रीतील समाधानकारक वाढ बघता बाजारात तेजीची मालिका सुरूच राहील. येत्या शुक्रवारी टीसीएसच्या निकालांनी तिसऱ्या तिमाहीच्या निकालांची सुरुवात होईल.

sudhirjoshi23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 3:11 am

Web Title: how to invest in india mppg 94
Next Stories
1 ‘माझा पोर्टफोलियो’ कोविड घात-रोधी!
2 संकल्पना सर वॉरन हेस्टिंग यांच्या काळातील
3 नववर्षांतील बदल आणि आव्हाने
Just Now!
X