News Flash

गुंतवणुकीतील यशस्वितेसाठी..

आपल्याकडे साक्षरतेचे प्रमाण हे बऱ्यापैकी असले तरी आर्थिक साक्षरतेचे प्रमाण हे अत्यल्प आहे.

बरेचदा उद्दिष्ट समोर नसल्याने गुंतवणूकदार गोंधळून जातात, बाजारात मोठे चढ-उतार आले तर आपण काय करावे हे त्यांना कळत नाही. गुंतवणुकीत सातत्य नसल्याने इतर अनावश्यक गोष्टींवर खर्च वाढतो, बचतीचे महत्त्व कळत नाही, अनियमित गुंतवणुकीमुळे चक्रवाढ सामर्थ्यांचा फायदा मिळत नाही.

‘ आजही गुंतवणुकीबाबत निर्णय घेताना गुंतवणूकदार हा सर्व बाबींचा विचार न करता भावना, अपुरी माहिती व सांगोवांगी गोष्टींवरून आपली गुंतवणूक करतो. गुंतवणूक करताना काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे, नाही तर एखाद्या छोटय़ाशा चुकीने मोठे नुकसान होऊ  शकते.

गुंतवणुकीचे साधन ठरविताना प्रामुख्याने खालील चुका टाळाव्यात.

भावना आणि वस्तुस्थिती यांची गल्लत

वॉरेन बफे यांनी सांगितल्याप्रमाणे – detach yourself from emotions,, अर्थात भावनेपासून स्वत:ला दूर ठेवा. भारतीयांमध्ये प्रामुख्याने भावनेच्या आधारेच गुंतवणूक केली जाते. एखादा विमा विक्रेता आपला नातेवाईक वा मित्र असल्यामुळे आपण त्याच्याकडून विमा योजना खरेदी करतो, पण ज्या विक्रेत्याकडून आपण गुंतवणूक करतो त्याची पात्रता, विषयातला अनुभव आणि मुख्य म्हणजे तो सुचवत असलेले गुंतवणुकीचे पर्याय या गोष्टी पडताळून घेणे गरजेचे आहे, हे कधीच ध्यानी येत नाही. बरेचदा विक्रेते हे एखाद्या विशिष्ट कंपनीशी संलग्न असल्यामुळे गुंतवणुकीचे विविध पर्याय देऊ  शकत नाहीत. गुंतवणूकदारही कुठलेही प्रश्न न विचारता, गुंतवणुकीतून आपले उद्दिष्ट साध्य होते की नाही हे न पाहता फक्त विक्रेता नातेवाईक व मित्र असल्याने गुंतवणूक करतो.

नुकसान :  भावनेच्या आहारी जाऊन केलेली गुंतवणूक चुकीची ठरू शकते आणि आपल्याला अपेक्षित परतावा मिळत नाही. पाहिलेली स्वप्नं धुळीस मिळतात.

उद्दिष्टाशिवाय गुंतवणूक करणे

आजही बरेचसे गुंतवणूकदार हे गुंतवणूक कुठल्याही विशिष्ट उद्दिष्टाशिवाय करतात. आपल्याकडे साक्षरतेचे प्रमाण हे बऱ्यापैकी असले तरी आर्थिक साक्षरतेचे प्रमाण हे अत्यल्प आहे. फक्त खात्यात काही रक्कम शिल्लक राहते वा कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करणे गैरच. गुंतवणूक करताना कधीही डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून अल्प कालावधी, मध्यम कालावधी व दीर्घावधीचे आडाखे आखून करावी. उद्दिष्ट समोर असेल तर गुंतवणुकीत सातत्य राखले जाते आणि आपण नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू ठेवतो.

नुकसान : बरेचदा उद्दिष्ट समोर नसल्याने गुंतवणूकदार गोंधळून जातात, बाजारात मोठे चढ-उतार आले तर आपण काय करावे हे त्यांना कळत नाही. गुंतवणुकीत सातत्य नसल्याने इतर अनावश्यक गोष्टींवर खर्च वाढतो, बचतीचे महत्त्व कळत नाही, अनियमित गुंतवणुकीमुळे चक्रवाढ सामर्थ्यांचा फायदा मिळत नाही.

फक्त पारंपरिक साधनांत गुंतवणूक करणे

भारतात आजही मुख्यत्वे मुदत ठेवी, विमा योजना आणि सोने यांसारख्या पारंपरिक साधनात गुंतवणूक केली जाते. अनेकदा अज्ञान किंवा भीती यामुळे गुंतवणूकदार बाकीच्या साधनांकडे गुंतवणूक म्हणून दुर्लक्ष करतात. गुंतवणूक करताना महागाई दर याचा विचार न करता पारंपरिक गुंतवणुकीतून मिळणाऱ्या पाच-सहा टक्क्यांच्या अपुऱ्या परताव्यात समाधान मानतात. गुंतवणूक करताना बचत विविध गुंतवणूक साधनांत विभागणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच निश्चित केलेल्या उद्दिष्टांप्रमाणे गुंतवणुकीच्या साधनांची निवड करावी. उदाहरणार्थ, अल्पावधीसाठी बचत खाते व लिक्विड म्युच्युअल फंड, मध्यम कालावधीसाठी मुदत ठेव, डेट किंवा बॅलेन्स्ड म्युच्युअल फंड आणि दीर्घावधीसाठी इक्विटी फंड एसआयपी, पीपीएफ वगैरे.

नुकसान : मुलीच्या उच्च शिक्षणासाठी जर १५ वर्षे मुदत ठेवीत गुंतवणूक केली तर त्यातून येणारा परतावा खात्रीशीर असेल, पण ही गुंतवणूक ठरावीक मर्यादेपर्यंतच वाढेल आणि कदाचित महागाई दराशीही ती स्पर्धा करू शकणार नाही.

गुंतवणूक म्हणजे फक्त परतावा?

बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की गुंतवणुकीचे उद्दिष्ट म्हणजे अधिकाधिक परतावा. गुंतवणुकीचा निवडलेला पर्याय हा आपण कुठल्या कारणासाठी गुंतवणूक करतो यावर अवलंबून असतो. वर सांगितल्याप्रमाणे जर उद्दिष्ट अल्पावधीचे असेल तर जोखीम न घेता किंवा जास्त परताव्याचा विचार न करता गुंतवणूक कमी, पण निश्चित परतावा देणाऱ्या पर्यायात करावी. बरेचदा गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपेक्षा शेअर्समध्ये जास्त जोखीम पत्करून सट्टा खेळण्याचा प्रयत्न करतात तसेच अनेकांनी पैसा दुप्पट करून देणाऱ्या फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करून स्वत:चे नुकसान करून घेतले आहे. जास्तीतजास्त परताव्याच्या मागे न लागता गुंतवणूकदाराने आपल्याला पत्करता येईल तितकीच जोखीम घ्यावी.

नुकसान : बरेचदा जास्त परताव्याच्या हव्यासापायी अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी गमावली आहे. जास्त जोखीम म्हणजे जास्त परतावा हे जरी खरे असले तरी गुंतवणूक करताना ‘सेबी’कडे नोंदणीकृत योजनांमध्ये गुंतवणूक करावी. त्यासाठी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला निश्चित घ्यावा. अथवा सेबीच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती गोळा करून त्या कंपनी अथवा स्कीमची खात्री करून घ्यावी.

वरील सर्व मुद्दय़ांवरून एक गोष्ट आपल्या ध्यानात आली असेल की चुका कितीही साधारण असोत पण त्यातून होणारे नुकसान हे असाधारण असू शकते आणि भविष्यात त्याची भरपाई होणे कठीण होऊन जाते. म्हणून गुंतवणुकीचे निर्णय घेताना अशा चुका कटाक्षाने टाळाव्यात आणि सर्व बाबींचा विचार करूनच गुंतवणूक करावी.

सुयोग काळे

(लेखक गुंतवणूक समुपदेशक असून, त्यांच्या ई-मेल contactsuyogk@gmail.com वर संपर्क साधता येईल.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 1:03 am

Web Title: tips for investment success
Next Stories
1 फंड विश्लेषण : नावाप्रमाणे ब्लूचिप..
2 माझा पोर्टफोलियो : वाहन क्षेत्राच्या फेरउभारीचा लाभार्थी!
3 कर समाधान : दानकर्म देईल करांपासून मोक्ष!
Just Now!
X