वाढत्या करोना साथ प्रसारात अपुऱ्या पडणाऱ्या विविध आरोग्य सुविधांची भर पडत असतानाच देशातील उद्योग क्षेत्राने आता थेट पुढाकार घेतला आहे. प्राणवायू पुरवठा साखळी नियमित राखण्यासाठी विविध आघाडीच्या कंपन्यांनी त्यांची क्षमता अल्पावधीत विस्तारित केली आहे.

देशातील आघाडीच्या उद्योगांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’ (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) ने प्राणवायूच्या पुरवठा साखळीवर लक्ष ठेवण्यासाठी एका कृती दलाची स्थापनाही केली आहे.

प्राणवायू पुरवठा साखळीवर ‘सीआयआय’च्या कृती दलाच्या अध्यक्षपदी जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य वित्तीय अधिकारी शेषागिरी राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

करोना प्रतिबंधाच्या उपाययोजनेत केंद्र तसेच राज्य सरकारबरोबर सहकार्य करण्यासाठी घरगुती क्षमता वाढवून आयातीवर कार्य करून प्राणवायू पुरवठा वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील कंपन्या एकत्र आल्या आहेत. राज्यांमधील वाहतुकीची समस्या, प्राणवायू सिलेंडरची अनुपलब्धता आदींचा या उपाययोजनेत समावेश करण्यात आला आहे.

टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू समूह, अदानी, आयटीसी आणि जिंदाल स्टील या औद्योगिक कंपन्यांसह अन्य काही कंपन्या वैद्यकीय प्राणवायू, क्रायोजेनिक वाहिन्या पुरवून करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना मदत करण्यास पुढे आल्या आहेत.

देशाने यापूर्वीच ५०,००० मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू आयातीसाठी निविदा काढली आहे.

द्रवरूप प्राणवायू आयात करण्यासाठी थेट जहाजांचा वापर करणे, माल वाहतुकीतील अडथळे दूर करणे, हस्तांतरण कालावधी कमी करणे, साठवणूक वाहनांची जलद पोहोच होणे, यासाठीच्या प्रक्रियेला जलदगतीने मंजुरी देणे आणि गंतव्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीची कार्यक्षमता वाढविणे यासाठी या कृती दलाने सरकारला काही सूचना केल्या आहेत.

मित्र देशांसमवेत सद्य:स्थितीच्या आपत्कालीन परिस्थितीत पाठिंबा मिळविण्यासाठी सरकार जी-२-जी यंत्रणेचा अवलंब करू शकेल, असेही सुचविण्यात आले आहे.

सध्याची क्रायोजेनिक कंटेनरची कमतरता लक्षात घेता एप्रिल अखेरीस टाटा ३६ क्रायोजेनिक जहाजांची आयात करत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच टाटा स्टील रुग्णालयांना ६०० मेट्रिक टन वैद्यकीय प्राणवायू तूर्त पुरवत असल्याचेही नमूद करण्यात आले.

जेएसडब्ल्यू स्टील सध्या दररोज १,००० मेट्रिक टन पुरवठा करीत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये एप्रिलमध्ये एकूण २०,००० मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायूचा पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज सध्या गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दमण, दीव आणि नगर हवेली येथे दररोज ७०० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पुरवत आहे.

याव्यतिरिक्त, आयटीसीचे २४ क्रायोजेनिक कंटेनर आहेत. त्यांची प्रत्येकी क्षमता २० मेट्रिक टन आहे. भद्राचलम येथील आयटीसीच्या पेपरबोर्ड युनिटने यापूर्वीच राज्यातील सरकारी रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा सुरू केला आहे.

अदानी ग्रुप सौदी अरेबियातून ८० मेट्रिक टन प्राणवायूसह ४ आयएसओ क्रायोजेनिक टँकर आयात करत आहे.

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील गुजरातला दररोज २२० मेट्रिक टन प्राणवायूची वाहतूक करत आहे. जिंदल स्टील अँड पॉवर विविध राज्यांना दररोज ८० ते १०० मेट्रिक टन वायूपुरवठा करत आहे आणि ही क्षमता प्रतिदिन १५० मेट्रिक टनपर्यंत विस्तारण्यात येणार आहे.

प्राणवायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची गती नियमित राहण्यासाठी ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सियाम) या देशातील वाहन निर्मात्या देशव्यापी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येत आहेत.

टाटा स्टील  ६०० मेट्रिक टन

जेएसडब्ल्यू स्टील    १,००० मेट्रिक टन

रिलायन्स       ७०० मेट्रिक टन

अर्सेलर मित्तल   २२० मेट्रिक टन

प्राणवायूची उपलब्धता वाढवण्याची आणि देशभर त्याची वाहतूक करण्याच्या तार्किक मुद्द्यांकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन उद्योग क्षेत्र शक्य तितक्या कमी मार्गाने सर्व संभाव्य साधनांचा वापर करून यासाठीचे समर्थन करण्यासाठी आणि समाधान प्रदान करण्यासाठी इतक्या मोठ्या मार्गाने पुढे आले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.

– टी. व्ही. नरेंद्र, अध्यक्ष, सीआयआय.