News Flash

‘एनबीसीसी’तील १५ टक्के हिस्सा विक्रीला मंजुरी

अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने ‘एनबीसीसी’तील निर्गुतवणुकीचा मार्ग मोकळा केला आहे.

| July 14, 2016 07:32 am

‘एनबीसीसी’तील १५ टक्के हिस्सा विक्रीला मंजुरी
पीटीआय, नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम असलेल्या ‘नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन’ अर्थात ‘एनबीसीसी’तील १५ टक्के हिस्सा विक्रीला बुधवारी मान्यता मिळाली. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीमुळे या माध्यमातून १,७०६ कोटी रुपये निधी उभारला जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने ‘एनबीसीसी’तील निर्गुतवणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. कंपनीत सरकारचे ९० टक्के भागभांडवल आहे. त्याचे बाजारमूल्य १४,२७४ कोटी रुपये आहे. पुनर्विक्री प्रक्रियेसाठी कंपनीच्या समभागाची किंमत, उपलब्ध करून दिले जाणाऱ्या समभागांची संख्या वगैरे लवकरच स्पष्ट केले जाईल, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांना दिली. कंपनीतील कर्मचाऱ्यांना ५ टक्के सवलतीत समभाग उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे.
‘एनबीसीसी’ची २०१२ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्धता झाली. या वेळी सरकारने १० टक्के हिस्सा कमी करत १२४.९७ कोटी रुपये उभारले होते. १० रुपये दर्शनीमूल्य किंमत असलेल्या समभागाचे समान पाच भागांत विभागणी करण्यात आली होती. बुधवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग १०.७२ टक्क्यांनी कमी होत २२९.८० रुपयांवर स्थिरावला.
निर्गुतवणुकीच्या २०१६-१७ सालच्या ५६,५०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टांमध्ये ३६,००० कोटी रुपये हे सार्वजनिक उपक्रमातील हिस्सा विक्रीतून तर २०,५०० कोटी रुपये धोरणात्मक विक्रीतून उभारले जातील.

एफटीआयएल, इंडिया बुल्स समभागांत पडझड

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
कर तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील कारवाईनंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध इंडिया बुल्स तसेच जिग्नेश शहा प्रवर्तित फायनान्शिअल टेक्नॉलॉजीज् (आताचे नाव ‘६३ मून टेक्नॉलॉजीज’) समूहातील कंपन्यांचे समभाग बुधवारी कमालीने खाली आले.
‘नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड’च्या (एनएसईएल) ५,६०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात कंपनीचे प्रमुख प्रवर्तक व फायनान्शियल टेक्नॉलॉजीज्चे (एफटीआयएल) संस्थापक जिग्नेश शहा यांना सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी अटक केली. यानंतर बुधवारी झालेल्या भांडवली बाजारातील व्यवहारात ‘एफटीआयएल’चा समभाग ८.४५ टक्क्यांनी घसरला. दिवसअखेर तो मंगळवारच्या तुलनेत ६.०४ टक्क्यांनी खाली येत ८५.६० वर स्थिरावला. कंपनीचे बाजारमूल्य एकाच व्यवहारात २४.५७ कोटी रुपयांनी खाली येत ३९४.४३ कोटींवर राहिले.
तर दुसरीकडे स्थावर मालमत्ता, वित्तीय सेवा आदी क्षेत्रात व्यवसाय असलेल्या इंडिया बुल्स समूहाच्या मुंबई तसेच दिल्लीतील मालमत्तांची प्राप्तिकर विभागाने तपासणी केली आहे. कर चुकवेगिरीसह मालमत्ता हस्तांतरणही विभागाच्या चौकशीच्या टप्प्यात सापडले आहे.
या प्रकरणात विभागाच्या अधिकाऱ्यांनी समूहातील काही कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेतली असून अन्य मालमत्तांची जप्तीही केली आहे. या प्रकरणात समूह तपास यंत्रणेला सहकार्य करत असल्याचे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे.

‘पेटीएम’चे मुंबईतील दोन लाख व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

मुंबई : देशातील सर्वात मोठा मोबाइल शुल्क भरणा मंच असलेल्या पेटीएमने आपल्या मोबाइल वॉलेट सुविधेसाठी मुंबईतील दोन लाख व्यापाऱ्यांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले असून अर्धा अब्ज लोकसंख्येला रोकडरहित व्यवहार सवयीचे बनविले जाणार आहे.
‘‘सध्या देशातील सर्वात मोठे शुल्क भरणा (पेमेंट) जाळे उभारण्यावर आमचा भर आहे. २०१७च्या अखेपर्यंत आमच्या व्यासपीठावर ४० लाख व्यापाऱ्यांना आणण्याचे ध्येय आहे. हे व्यापारी किराणा दुकाने, दूध सहकारी संघ, उपाहारगृहे, रिक्षा-टॅक्सीवाले, वाहनतळांचे चालक आणि अगदी फेरीवालेही असतील, असे पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण वासिरेड्डी यांनी सांगितले.
खऱ्या अर्थाने रोखीशिवाय चालणारा आणि पेटीएमद्वारे सर्व प्रकारच्या दैनंदिन गरजांसाठी पैसे भरणारा समाज आम्हाला तयार करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या शुल्क भरणा व्यवहारांसाठी पेटीएम हे सुरक्षित व सोयीस्कर व्यासपीठ संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. ‘सेमी-क्लोज्ड प्रीपेड इन्स्ट्रमेंट’ म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेचा परवाना प्राप्त असलेले पेटीएम हे मोबाइल वॉलेटप्रमाणे काम करते, जेथे पैसे डिजिटल स्वरूपात साठवता येतात आणि रोख, डेबिट/क्रेडिट कार्ड विनिमय किंवा नेट बँकिंगच्या ऐवजी वापरता येऊ शकतात.

‘शारंगधर’कडून पंढरीच्या वारीत मोफत औषध वाटप
मुंबई : आयुर्वेदिक औषधीत अग्रगण्य शारंगधर फार्माने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप केले. पुणे तसेच सासवड येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी आयोजित शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन काही औषधे मोफतही देण्यात आली. वारकरी रुग्णांवर मोफत प्रथमोपचार करण्यात आले, तसेच अनेकांना ‘शारंगधर घरचा वैद्य’ ही आरोग्य मार्गदर्शिकाही देण्यात आली.
व्यवसायापलीकडे जाऊन रुग्णांसाठी सामाजिक तसेच मानसिक समाधान देणारा उपक्रम राबविण्यात येतो, अशी माहिती कंपनीच्या व्यवस्थापिका प्रिया कुलकर्णी यांनी दिली. या वेळी कार्यकारी संचालिका डॉ. गौरी अभ्यंकर, डॉ. मुग्धा कुमठेकर, डॉ. शीतल कुलकर्णी, गिरीश जोशी, प्रसाद साळवी, अतुल, नीलेश जाधव सहभागी झाले होते.

दुबईमध्ये रुग्णसेवा कर्मचाऱ्यांना रोजगार संधींसाठी भागीदारी
मुंबई : रुग्णनिगेच्या क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची फळी उभारणाऱ्या भारतातील लाइफ सपोर्ट्स इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ केअर सायन्सेस (एलआयएचएस) या संस्थेने ही दुबई सरकारची या क्षेत्रातील संस्था ‘दुबई कार्पोरेशन फॉर अ‍ॅम्ब्युलन्स सव्‍‌र्हिसेस (डीसीएएस)’ सोबत एका सामंजस्य करारावर अलीकडेच स्वाक्षरी केली. दुबईमध्ये रुग्णनिगा व्यावसायिक अर्थात पॅरामेडिकल परवान्यासाठी अर्ज करताना, प्री-हॉस्पिटल इमर्जन्सी केअर काऊन्सेल ऑफ आर्यलड(पीएचईसीसी)चे प्रमाणपत्र सर्वात महत्त्वपूर्ण समजले जाते. डीसीएएसने मान्यतादेखील दिली आहे. दक्षिण आशियामध्ये या प्रशिक्षणासाठी प्राधिकृत असलेली लाइफ सपोर्ट्स इन्स्टिटय़ूट ही एकमेव प्रशिक्षण संस्था आहे. त्यामुळे ही भागीदारी दुबई तसेच आखाती देशांत भारतातून प्रशिक्षित पॅरामेडिकल व्यावसायिक, नर्सेस आणि आयुष डॉक्टर्सना रोजगाराच्या संधींच्या उपलब्धतेस उपयुक्त ठरेल, असा विश्वास लाइफ सपोर्ट्स इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. परेश नवलकर यांनी व्यक्त केला. सध्या तातडीची गरज म्हणून तेथे ४०० प्रशिक्षित व्यावसायिकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 7:32 am

Web Title: approval for 15 percentage disinvstment in nbcc
Next Stories
1 कर थकविणाऱ्या केर्न एनर्जीचाच उलट सरकारकडे भरपाईचा दावा
2 सलग दुसरा दिवस तेजीचा; ‘निफ्टी’ ८,५०० पल्याड!
3 महागाई दराचा २२ महिन्यांचा उच्चांक
Just Now!
X