अरिवद परांजपे

हैबती आणि महिपती हे दोघेही शेतकरी होते आणि त्यांची शेतजमीन शेजारी शेजारी होती. हैबतीने त्याच्या संपूर्ण शेतात फक्त भात लावला, तर महिपतीने ४० टक्के शेतात भात आणि उरलेल्या भागात भाजीपाला, फळे आणि काही मसाल्याची लागवड केली. हैबतीच्या दुर्दैवाने पाऊस कमी झाला आणि जेमतेम ३० टक्के पीक पदरात पडले. पण महिपतीने इतर पिकांच्या साहाय्याने हैबतीच्या दुप्पट उत्पन्न मिळविले. हैबतीनेही कष्ट केले होते पण तो एकाच पिकावर अवलंबून राहिला, तर महिपतीला विविधतेचा फायदा म्हणून किमान उत्पन्न मिळवू शकला. महिपतीचेच तत्त्व गुंतवणुकीच्या बाबतीतसुद्धा लागू केले, तर जोखीम कमी होते आणि स्थिर दराने परतावा मिळू शकतो. अ‍ॅसेट अलोकेशन करून एकापेक्षा अधिक मालमत्ता प्रकारांचा समावेश पोर्टफोलिओत करता येतो.

अ‍ॅसेट अलोकेशन म्हणजे, गुंतवणुकीच्या कोणत्या प्रकाराची निवड करावी आणि त्या प्रकारात किती पैसे गुंतवावेत याचे तंत्र. गुंतवणुकीवर स्थिर परतावा मिळण्याकरता हे सर्वात महत्त्वाचे असते, ज्यामुळे ‘सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नये’, हे तत्त्व आचरणात आणता येते.

गुंतवणुकीचे मुख्य प्रकार (अ‍ॅसेट क्लास) असे आहेत.

’ निश्चित उत्पन्न देणारे (मुदत ठेवी, एनएससी, पीपीएफ इ.), रोखे (डेट ) ’ शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंड  ’ स्थावर मालमत्ता (दुसरे घर, फार्म हाऊस इ.) ’  सोने/चांदी

गुंतवणूकदाराने सुरुवातीला अर्थनियोजन करून निश्चित केलेली आर्थिक उद्दिष्टे अमलात आणण्याकरिता अ‍ॅसेट अलोकेशन करायचे असते. ते करताना आपल्या जोखीम क्षमतेचाही विचार करून अ‍ॅसेट प्रकार निवडायचे असतात. अ‍ॅसेट अलोकेशन करताना ते तुमच्या आर्थिक उद्दिष्टांप्रमाणे केले पाहिजे. उदाहरणार्थ, अल्पकालीन (तीन वर्षांपर्यंत) उद्दिष्टांकरता ‘डेट’ (कर्जरोखे) प्रकारातील गुंतवणूक, तर मध्यम (चार ते १० वर्षे) आणि दीर्घकालीन (दहा वर्षांहून अधिक) उद्दिष्टे आहेत त्यांच्याकरता ‘इक्विटी’ (समभाग) प्रकार योग्य असतात.

अ‍ॅसेट अलोकेशनचे महत्त्व

गुंतवणुकीवरील परतावा मुख्यत: पुढील घटकांवर अवलंबून असतो.

१.  अ‍ॅसेट प्रकार –

२. त्या प्रकारातील प्रत्यक्ष गुंतवणुकीची निवड

३. गुंतवणुकीची अचूक वेळ

दीर्घ काळात ‘अ‍ॅसेट अलोकेशन’ हा परतावा ठरवणारा सर्वात मोठा घटक आहे असे दिसून आले आहे. पण मार्केट टायिमग आणि कुठल्या कंपनीचा शेअर याला जास्त महत्त्व दिले जाते. त्याऐवजी विविधता असलेला पोर्टफोलिओ तयार करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच वेळोवेळी पोर्टफोलिओचे ‘रिबॅलिन्सग’ फेरसंतुलन केले पाहिजे. योग्य वेळी योग्य अ‍ॅसेट प्रकार, योग्य त्या प्रमाणात असेल तर स्थिर गतीने परतावा मिळू शकतो. या करता गुंतवणूकदाराने पुढील गोष्टी ध्यानात घ्याव्यात.

१. प्रत्येक गुंतवणूक प्रकारावरचा परतावा आणि जोखीम वेगळी असते

२. अ‍ॅसेट प्रकारांच्या मूळ प्रमाणात फरक पडला तर फेरसंतुलन करा

तुम्ही हे सर्व म्युच्युअल फंडाच्या अ‍ॅसेट अलोकेशन योजनांच्या माध्यमातून सहज करू शकता. यात डेट, इक्विटी आणि सोने यांचे प्रमाण शेअर बाजाराचे मूल्यांकन आणि व्याजदरातील हालचाल यांचा विचार करून घेतले जातात. स्थिर परताव्यासह उद्दिष्टपूर्ती साधण्यासाठी म्युच्युअल फंडातील हायब्रिड योजनांचा फायदा घेऊन तुम्हालाही महिपतीसारखे ‘स्मार्ट’ बनता येईल.

(लेखक, सार्थ वेल्थ अ‍ॅडव्हायजर्सचे संचालक)