आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात ७६ टक्क्य़ांची वाढ झाली आहे, तर बँकेच्या निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (एनपीए) ०.५२ टक्क्य़ांपर्यंत खाली आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बँकेचे कार्यकारी संचालक सी. व्हीआर. राजेंद्रन या वेळी उपस्थित होते.
नरेंद्र सिंग म्हणाले, ‘‘गेल्या आर्थिक वर्षांत बँकेने ७५९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षांत बँकेचा नफा ४३० कोटी रुपये होता. पुढील वर्षांत (मार्च २०१४ पर्यंत) २ लाख ३० हजार कोटींची उलाढाल पूर्ण करण्याचे बँकेचे लक्ष्य आहे.मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निर्मूलन निधीस बँकेतर्फे २५१ लाख रुपये देण्यात आले आहेत.
‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’चे आयोजक म्हणून बँकेला एक लाख कोटी रुपयांच्या कर्जासाठी मान्यता मिळाली आहे. यातील ५० हजार कोटींचे कर्ज शेतीसाठी देण्यात येणार आहे. शेती कर्जातही जळगावमध्ये केळी, नाशिकमध्ये कांदा अशा विशिष्ट पिकांसाठीच्या कर्जाला प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या बँकेतर्फे सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) चार शाखा चालवल्या जात असून त्यापैकी एक शाखा पुण्यात आहे. येत्या काळात बँक राज्यात नवीन आठ एमएसएमइ शाखा सुरू करणार आहे. बँकेच्या नवीन शाखा उघडताना ग्रामीण व निमशहरी भागांना प्राधान्य देण्यात येत आहे. पुणे, मुंबई, नंदुरबार, वर्धा आणि अमरावतीत बँकेतर्फे ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (डीबीटी) योजना राबविण्यात येत आहे.’’