लहान शहरांमध्ये वाढते वितरण जाळे रचून ग्राहकांपर्यंत पोहोच वाढविण्याच्या उद्देशाने आखलेल्या धोरणानुसार, सामान्य विमा क्षेत्रातील अग्रेसर खासगी कंपनी भारती अक्सा जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने २०१४ सालात नवीन २९ शाखा उघडण्याचे नियोजन केले आहे. यापैकी २३ शाखा पश्चिम व दक्षिण भारतातील सहा राज्यांत सुरू होत असून, महाराष्ट्रात कल्याण, नांदेड, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगरमध्ये शाखा सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. केवळ पॉलिसी वितरणासाठीच नव्हे तर आपल्या विमेदारांना आवश्यक त्या सेवा नजीकच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी भौगोलिक विस्तार आवश्यक ठरतोच. पण डिजिटल माध्यमांचा अधिकाधिक वापर करताना विशेष समर्पित पोर्टल्स, दूरसंचार सोयीसुविधांच्या वापरावरही भर राहील, असे भारती अक्साचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरनाथ अनंतनारायणन यांनी सांगितले. विमा व्यवसायासाठी अत्यंत आव्हानात्मक आर्थिक वातावरण असतानाही सर्वोच्च १० कंपन्यांमध्ये भारती अक्साने अव्वल दोनांत आपले स्थान कायम राखले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  सामान्य विमा क्षेत्रात सध्या तोटय़ाच्या मानल्या गेलेल्या वाहन विम्याच्या अन्य कंपन्यांच्या ४२% सरासरीपेक्षा खूप अधिक असे भारती अक्साच्या एकूण व्यवसायात सर्वाधिक म्हणजे ७३.२ टक्के वाटा (एप्रिल ते डिसेंबर २०१३) हा वाहन विम्याचा असतानाही कामगिरीतील हे सातत्य प्रोत्साहनपर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयोगशीलता, नावीन्यपूर्ण उत्पादनांचा विकास यातूनच हे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यमान २०१३-१४ आर्थिक वर्षांअखेर वित्तीय कामगिरीत कंपनीकडून प्रथमच नफ्याची नोंद केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.