करोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यात घरविक्रीला फटका बसणार हे निश्चित होते. परंतु मार्चअखेरीसही नोंदल्या गेलेल्या घरविक्रीचे आकडे पाहिल्यावर यंदा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजसारख्या एखाद—दुसऱ्या बडय़ा कंपनीने तंत्रस्नेही पर्यायांचा वापर केला असला तरी इतरांना त्याचा फारसा वापर करता आलेला नाही. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत यंदा २६ टक्के घरे कमी विकली गेली.

२४ मार्चनंतर जारी झालेली टाळेबंदी त्यास कारणीभूत असल्याचे या संदर्भातील ‘प्रॉपटायगर डॉट कॉम’ या मालमत्तांची विक्री करणाऱ्या कंपनीच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षांतील शेवटच्या तिमाहीत ९३ हजार ९३६ घरांची विक्री करण्यात आली होती. यंदा पहिल्या तिमाहीत तो आकडा ६९ हजार २३५ पर्यंत पोहोचला. जानेवारीत २६ हजार१२६, फेब्रुवारीत २३ हजार ९८७ तर मार्च महिन्यात फक्त १९ हजार १२२ घरांची विक्री झाली.

वास्तविक मार्च महिन्यातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा घरविक्री वाढेल, असा अंदाज होता. परंतु टाळेबंदीचा फटका बसला आणि घरविक्री पार मंदावली.

गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर विकासकांनी नव्या प्रकल्पांची घोषणा करण्याचे ठरविले होते. मात्र टाळेबंदीमुळे त्यांना हिरमोड झाला. मुंबई प्रादेशिक परिसरात बडय़ा विकासकांचे प्रकल्प सुरू होणार होते. यंदा ३५ हजार ६६८ नवी घरे उपलब्ध झाली. तीच संख्या गेल्या तिमाहीत ७२ हजार ९३२ होती, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चीनमध्ये करोना विषाणूने डिसेंबरपासून हातपाय पसरले होते. परंतु भारतातील घरविक्रीला मार्चच्या अखेरीस फटका बसला. मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात घरविक्रीला प्रतिसाद मिळाला.

टाळेबंदीनंतर घरविक्री रोडावली. मार्च महिन्यात घरविक्री चांगली होत असते. डिजिटल पर्यायांचा वापर करून विकासकांनी संभाव्य घरांची विक्री करायला हवी होती, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.