विकसनशील देशांकरिता स्थापन करण्यात आलेल्या नव्या ‘ब्रिक्स’ बँकेमार्फत येत्या एप्रिलपासून प्रत्यक्षातील व्यवहार सुरू करण्यात येणार आहे. लवकरच विविध १० ते १५ प्रकल्पांना निधीपुरवठा करण्याचेही निश्चित केले जाणार आहे.

नवीन विकास बँक (द न्यू डेव्हलपमेंट बँक) म्हणून ओळखले जाणाऱ्या ‘ब्रिक्स’ बँकेचे पहिले अध्यक्ष के. व्ही. कामत यांनी शुक्रवारी येथे याबाबत माहिती दिली. बँकेचे सदस्य असलेल्या प्रत्येक राष्ट्रातील एका प्रकल्पाला व नजीकच्या भविष्यात १० ते १५ प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याचा बँकेचा विचार असल्याचे ते म्हणाले. हरित ऊर्जा भागीदारीतील काही प्रकल्पांना कर्ज देण्याचे सूतोवाचही कामत यांनी या वेळी केले. चीनमध्ये मुख्यालय असलेल्या शांघाय येथे शनिवारी काही करारही पार पडणार आहेत. १० ते १५ प्रकल्पांना करण्यात येणारा निधीपुरवठा हा एकूण २०१६-१७ आर्थिक वर्षांतील असेल व हे प्रकल्प ९ ते १० महिन्यांत सुरू होतील, अशी माहिती कामत यांनी दिली.

‘ब्रिक्स’ बँकेचे भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे सदस्य देश आहेत.