|| सुधीर जोशी

आठवडय़ाची सुरुवातच बाजाराच्या मोठय़ा पडझडीने झाली. याला कारण झाले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इराणकडून इंधन खरेदीसाठी भारतासकट सर्व राष्ट्रांना घातलेल्या बंदीचे. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर वाढू लागताच त्याचे भारताच्या वित्तीय तुटीवर, रुपयाच्या विनिमय मूल्यावर आणि वाहतूक दर तसेच महागाईवर होणारे परिणाम लक्षात घेऊन सर्व प्रमुख कंपन्यांचे बाजार भाव खाली आले. एप्रिल महिन्याच्या सौदापूर्तीच्या या आठवडय़ात रोजच्या व्यवहारात दिवसाआड मोठे चढ-उतार दाखवत अखेर मुंबई बाजाराचे निर्देशांक साप्ताहिक तुलनेत अगदी किरकोळ फरकाने बंद झाले.

प्रमुख सिमेंट कंपन्यांपकी अल्ट्राटेक सिमेंटचे व जेके सिमेंटचे वार्षिक आणि एसीसीचे पहिल्या तिमाहीचे निकाल या आठवडय़ात जाहीर झाले. वाढत्या विक्रीबरोबरच, उत्पादन खर्चावरील नियंत्रणामुळे नफ्याचे प्रमाण चांगले राहिले. परंतु इंधन तेलाचे भाव नियंत्रणात राहणे आणि नवीन सरकारने पायाभूत सुविधा व घरबांधणीवरील जोर कायम ठेवणे या क्षेत्राच्या पथ्यावर पडेल.

मारुती सुझुकीने वार्षिक निकाल जाहीर करताना वार्षिक विक्रीत फक्त  ४.७ टक्क्यांची वाढ दाखविली. इतकेच नव्हे पुढील वर्षांसाठी विक्रीमध्ये दहा टक्क्यांपेक्षा कमी वाढीचे संकेत दिले. रुपयाचा प्रतिकूल विनिमय दर, ‘बीएस-६’च्या नियमनासाठी करावा लागणार खर्च, डिझेल प्रवासी वाहनांचे उत्पादन थांबण्याचा निर्णय आणि प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेतील मरगळ यामुळे कंपनीकडून वर्षभर तरी काही अपेक्षा करता येणार नाही.

खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या परंतु ग्राहकाभिमुख सेवाधोरणामध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या नफ्यात, मार्च २०१९ अखेर समाप्त आर्थिक वर्षांत २० टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या बुडीत कर्जाच्या प्रमाणात किंचित घट होऊन ते आता १.३६ टक्के झाले आहे. बाजारातील प्रत्येक मोठय़ा उतरणीत घेण्यासारखा हा समभाग आहे. मागील वर्षांच्या मार्चअखेरच्या तिमाहीतील तोटय़ासमोर या तिमाहीत भरघोस नफा कमावून अ‍ॅक्सिस बँकेच्याही नफ्यातही उत्तम वाढ झाली आहे. एचडीएफसी समूहातून प्रदीर्घ अनुभव घेऊन आलेल्या अमिताभ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या अनुत्पादित कर्जामध्ये घट आणि किरकोळ कर्जातील वाढ याचा हा परिणाम आहे.

स्टरलाईट टेक्नॉलॉजीच्या उत्पन्न व नफ्यात अनुक्रमे ५८ व ६८ टक्के  वाढ झाली असली तरी त्याचा बाजारभावावर परिणाम दिसत नाही. प्रवर्तकांनी गहाण ठेवलेले समभाग हे त्याचे प्रमुख कारण आहे. कंपनीकडे असलेल्या अपूर्तित मागण्या व दूरसंचार क्षेत्रातून फायबर ऑप्टिक केबल्सना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन दीर्घ मुदतीमध्ये हा समभाग नफा देईल.

बँका व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात दिसणाऱ्या सुधारणेमुळे या क्षेत्रातील समभागांना मागणी आहे व बाजाराचे निर्देशांक वरची पातळी टिकवून आहेत. परंतु बाजाराचे निर्देशांक उच्चस्थानावर असताना बाजार पडण्यास कुठलेही निमित्त पुरते. निवडणूक निकालांची साशंकताही पुढील महिनाभर बाजाराला दोलायमान ठेवणार आहे. त्यामुळे मोठय़ा चढ-उतारांचे भान ठेवून नवीन मोठी गुंतवणूक टाळायला हवी.