दोन वर्षांतील उच्चांकाला झेप घेऊन निर्देशांकांची माघार

सत्राच्या सुरुवातीलाच दोन महिन्यांच्या उच्चांकाला सर करणाऱ्या सेन्सेक्सने गुरुवारी अखेर या टप्प्यापासून माघार घेण्याबरोबरच बुधवारच्या तुलनेत घसरण नोंदविली. १४४.७० अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,८३९.७९ पर्यंत खाली आला. तर ४६.०५ अंश घसरणीसह निफ्टी ८,८९९.७५ वर स्थिरावला.

गुरुवारी सहा महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सत्रअखेरच्या टप्प्यात नफेखोरीचे धोरण अवलंबिले. परिणामी तिसऱ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन ७ टक्क्यांच्या पुढे गेल्याच्या स्वागतामुळे बुधवारच्या २४१.१७ अंश वाढीनंतर सेन्सेक्स गुरुवारी सत्राच्या सुरुवातीलाच २९ हजारावर पोहोचला. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बजाराचा प्रमुख निर्देशांक यावेळी गेल्या दोन वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला होता.

व्यवहारात सेन्सेक्सचा प्रवास २९,१४५.६२ ते २८,७८४.३१ असा उतरता राहिला. तर निफ्टीने व्यवहारात ८,९९२.५० हा ३ मार्च २०१५ नंतरचा सर्वोच्च टप्पा गाठला. सत्रातील त्याचा किमान स्तर ८,८७९.८० राहिला. सेन्सेक्सनेही मार्च २०१५ नंतर प्रथमच गुरुवारचा वरचा स्तर नोंदविला होता.

सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभागांचे मूल्य घसरले. मुंबई निर्देशांकातील अदानी पोर्ट्स, सन फार्मा, एनटीपीसी, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज्, महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, भारती एअरटेल, आयटीसी यांचे मूल्य ३.०७ टक्क्यांपर्यंत खाली आले.

तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. यामध्ये ऊर्जा, स्थावर मालमत्ता, सार्वजनिक उपक्रम, आरोग्यनिगा, तेल व वायू, बँक या निर्देशांकांमध्ये तब्बल ४.३४ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदली गेली. सलग दुसऱ्या सत्रात वाहन क्षेत्रीय निर्देशांकाला मागणी राहिली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.४१ व १.३० टक्क्यांनी घसरले.