सेन्सेक्स ३० हजारांवर; निफ्टी नव्याने सर्वोच्च स्थानी

बँक तसेच पायाभूत सेवा क्षेत्रातील सुधारणांचा मार्ग सरकारने मोकळा केल्यानंतर त्याचे स्वागत गुरुवारी भांडवली बाजारात झाले. यामुळे सेन्सेक्सला पुन्हा एकदा ३० हजारांचा टप्पा गाठता आला, तर निफ्टीने ९,३६० नजीकची चाल करताना नवे शिखर पादाक्रांत केले.

गेल्या काही सलग व्यवहारांतील भांडवली बाजारात मरगळ गुरुवारच्या व्यवहाराने झटकली गेली. एकाच सत्रात २३१.४१ अंश वाढ नोंदवीत सेन्सेक्स ३०,१२६.२१ पर्यंत पोहोचला. मुंबई निर्देशांकाची ही २६ एप्रिलनंतरची सर्वोच्च पातळी होती, तर सत्रात तो २०,१६९.९५ पर्यंत झेपावला होता.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने गुरुवारी त्याच्या सर्वोच्च स्तराला गाठले. ४७.९५ अंशवाढीसह निफ्टी ९,३५९.९० पर्यंत गेला. स्थापनेपासून निफ्टी प्रथमच या टप्प्यावर स्थिरावला आहे. गुरुवारच्या सत्रातील त्याचा प्रवास ९,३२३.२५ ते ९,३६५.६५ दरम्यान राहिला.

स्टील उद्योगासाठी नवे धोरण आणि बँकांच्या बुडीत कर्जाची समस्या दूर करण्यासाठीच्या उपाययोजना केंद्र सरकारने बुधवारी उशिरा केंद्रीय मंत्रिमंडळातील निर्णयाच्या माध्यमातून केल्या. यामुळे बँक व पोलाद क्षेत्रातील समभागांना गुरुवारी बाजारात मागणी राहिली. तिमाही नफ्यात तिप्पट वाढ नोंदविणाऱ्या आयसीआयसीआय बँकेचा समभागही लक्षणीय वाढला. एप्रिलमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात सेवा क्षेत्राच्या वाढीची दखलही बाजाराने घेतली.

सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, एशियन पेंट्स, हिरो मोटोकॉर्प यांचे मूल्य ३.६३ टक्क्यांपर्यंत वाढले, तर टाटा मोटर्स, ओएनजीसी, महिंद्र अँड महिंद्र, सिप्ला, रिलायन्स, टीसीएससह १२ समभागांचे मूल्य २.२७ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, वित्त निर्देशांक १.४१ टक्क्यांची वाढ नोंदवीत होते. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.४८ व ०.३६ टक्क्यांनी वाढले.