News Flash

जागतिक बाजारातील तेजीची ‘उसनवारी’

सेन्सेक्स २६,७०० तर, निफ्टी ८,२५० नजीक

दीड महिन्यातील सर्वोत्तम झेप; सेन्सेक्स २६,७०० तर, निफ्टी ८,२५० नजीक

जागतिक भांडवली बाजारातील तेजीला साथ देत सेन्सेक्स व निफ्टीने गुरुवारी सत्रातील मोठी निर्देशांक झेप नोंदविली. गेल्या सहा आठवडय़ांतील सर्वोत्तम सत्रवाढ राखत सेन्सेक्स २६,७०० नजीक, तर निफ्टी ८,२५० जवळ पोहोचला.

४५७.४१ अंश वाढीसह सेन्सेक्स २६,६९४.२८ वर, तर निफ्टी १४४.८० अंश वाढीमुळे ८,२४६.८५ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांक एकाच व्यवहारात १.७५ टक्क्यांपर्यंत झेपावले. युरोपच्या मध्यवर्ती बँकेमार्फत युरोपीय महासंघाकरिता आर्थिक सहकार्य आराखडा जाहीर होण्याच्या आशेने आशियाई व युरोपीय भांडवली बाजारात गुरुवारी तेजीचे वातावरण राहिले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर व्याजदर पतधोरणामुळे मुंबई निर्देशांकाने बुधवारी १५६ अंशांची घसरण नोंदविली होती, मात्र रिझव्‍‌र्ह बँकेने व्यापारी बँकांसाठीच्या रोख राखीव प्रमाणावरील मर्यादा शिथिल केल्याचे जोरदार स्वागत भांडवली बाजारात गुरुवारी झाले.

सत्राच्या सुरुवातीपासूनच सेन्सेक्समध्ये तेजी होती. व्यवहारात मुंबई निर्देशांक २६,७३३.८७ पर्यंत झेपावला. दिवसअखेर त्यात बुधवारच्या तुलनेत १.७४ टक्के वाढ नोंदली गेली. सेन्सेक्स हा १८ ऑक्टोबरनंतरचा सत्रातील सर्वोत्तम प्रवास ठरला. यापूर्वी एकाच व्यवहारात मुंबई निर्देशांकाने ५२०.९१ अंशांची वाढ नोंदविली आहे. तर दिवसअखेरचा सेन्सेक्सचा स्तर हा ११ नोव्हेंबरनंतरचा सर्वोच्च ठरला आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात गुरुवारी १.७९ टक्के वाढ राखली गेली. दिवसअखेर ८,२५० नजीकचा प्रवास राखणाऱ्या या निर्देशांकाने गुरुवारी ८,१५१.७५ ते ८,२५६.२५ दरम्यानचा स्तर अनुभवला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या रोख राखीव प्रमाणबाबतचा निर्णय व युरोपीयन मध्यवर्ती बँकेच्या संभाव्य आर्थिक सहकार्याने बाजारात व्यवहार करताना गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसल्याचे गुरुवारच्या चित्र दिसल्याचे निरीक्षण जिओजित बीएनपी पारिबा फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी नोंदविले आहे. डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या सलग दुसऱ्या व्यवहारातील भक्कमतेचेही सकारात्मक पडसाद भांडवली बाजारात उमटले.

बुधवारी मूल्य रोडावलेल्या बँक तसेच वित्तीय सेवा कंपन्यांचे समभाग गुरुवारी उंचावले. यामध्ये स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचे मूल्य १.७२ टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील सर्वाधिक, ४.६२ टक्क्यांनी वाढला. त्याबरोबरच टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, आयटीसी आदीही वाढले. मुंबई निर्देशांकातील एनटीपीसी वगळता इतर सर्व २९ समभागांना मागणी राहिली.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद २.९३ टक्क्यांनी वाढला. वाहन, पायाभूत सेवा, माहिती तंत्रज्ञान, बँक निर्देशांकातील वाढ २.६३ ते १.५४ टक्क्यांपर्यंत राहिली. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे१.४९ व १.२८ टक्क्याने वाढले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीपूरकता..

युरोपच्या मध्यवर्ती बँकेमार्फत युरोपी महासंघाकरिता आर्थिक सहकार्य आराखडा जाहीर होण्याच्या आशेवर आशियाई तसेच युरोपीय भांडवली बाजारात गुरुवारी तेजीचे वातावरण राहिले. आशियाई बाजारात जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक आदींमध्ये १.४५ टक्के वाढ नोंदली गेली, तर युरोपीय भांडवली बाजारांची सुरुवातही तेजीसह झाली. देशांतर्गत निश्चलनीकरणाने निर्माण केलेली आर्थिक अव्यवस्था आणि रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवण्याचे घेतलेला अनपेक्षित निर्णय यामुळे बुधवारच्या व्यवहारात हिरमुसलेल्या स्थानिक बाजारातही परिणामी उत्साह संचारलेला दिसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:54 am

Web Title: bse nse sensex nifty 2
Next Stories
1 रोकडरहित व्यवहारांच्या कक्षेत दुप्पट लाभार्थी अपेक्षित
2 बंगळुरूत आज ‘एक्स्प्रेस आयटी’ पुरस्कार सोहळा
3 समभागसंलग्न म्युच्युअल फंडांमधील वाढता निधी ओघ नोव्हेंबरमध्ये कायम
Just Now!
X