गेल्या सलग सात व्यवहारातील भांडवली बाजारातील तेजी अखेर शुक्रवारी थांबली. २३०.८६ अंश घसरणीसह सेन्सेक्स २९,२३१.४१ वर येऊन थांबला. तर ६१.७० अंश नुकसानासह निफ्टी ८,८३३.६० वर स्थिरावला. सेन्सेक्स व निफ्टीने त्यांचा २९,५०० व ८,९०० चा स्तर सप्ताहाअखेरच्या व्यवहारात सोडला आहे.
भांडवली बाजारात गुरुवारीही अस्वस्थता निर्माण झाली होती. २९,१०० वर येऊन ठेपणारा सेन्सेक्स मात्र दिवसअखेर तेजीसह सावरला होता. शुक्रवारी मात्र असे झाले नाही. २९,४४६ या घसरणीवरच सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक व्यवहारात २९,१७८.२६ पर्यंत घसरला. सत्रात त्याचा वरचा टप्पा २९,४६२.०९ पर्यंत राहू शकला. तर निफ्टीने त्याच्या ८,९०० पुढील टप्प्यापासून शुक्रवारी माघार घेतली.
गेल्या सलग सात व्यवहारात मुंबई निर्देशांक १,२३४.८८ अंश म्हणजेच ४.३७ टक्क्यांनी उंचावला आहे. बाजारात गुरुवारीही नफेखोरीचा दबाव निर्माण झाला होता.
शुक्रवारी मात्र तो दिवसअखेपर्यंत कायम राहिल्याने सप्ताहाअखेर निर्देशांकांत घसरण नोंदली गेली. येत्या आठवडाअखेर जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर बाजार गरम असताना, त्याने उंची गाठताच गुंतवणूकदारांकडून नफेखोरीचे धोरण अनुसरले गेले.
सेन्सेक्समधील रिलायन्स सर्वाधिक तीन टक्क्य़ांनी घसरला. आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो हे बडे समभाग मोठय़ा मूल्य फरकाने ढासळले. टाटा पॉवर, भारती एअरटेल, विप्रो, मारुती सुझुकी यांनीही मुंबई निर्देशांकातील २३० हून अधिक अंश घसरणीला साथ दिली. क्षेत्रीय निर्देशांकामध्ये तेल व वायू सर्वाधिक १.७९ टक्क्यांसह घसरला.