18 January 2018

News Flash

गाडी रुळावरून घसरली

जागतिक भांडवली बाजारातील नरमाई आणि मालवाहतुकीत दरवाढ सुचविणारा रेल्वे अर्थसंकल्प या प्रतिकूलता मंगळवारी भांडवली बाजाराची गाडी रुळावरून घसरविणाऱ्या ठरल्या. या जबर घसरणीने गुंतवणूकदारांची मालमत्ता तब्बल

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 27, 2013 12:04 PM

जागतिक भांडवली बाजारातील नरमाई आणि मालवाहतुकीत दरवाढ सुचविणारा रेल्वे अर्थसंकल्प या प्रतिकूलता मंगळवारी भांडवली बाजाराची गाडी रुळावरून घसरविणाऱ्या ठरल्या. या जबर घसरणीने गुंतवणूकदारांची मालमत्ता तब्बल एक लाख कोटी रुपयांनी रोडावली. तर प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने जेमतेम १९ हजाराची पातळी राखून धरली असली तरी तो तीन महिन्यांच्या नीचांकावर आला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्सने चालू महिन्यात दुसऱ्यांदा त्रिशतकी घसरण नोंदविली आहे. तर ‘निफ्टी’ही ५,८००च्या पातळीखाली आला आहे.
‘सेन्सेक्स’ ३१६.५५ अंश घसरणीसह १९,०१५.१४ वर तर ‘निफ्टी’ ९३.४० अंश नुकसानासह ५,७६१.३५ पर्यंत खाली आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांकही तीन महिन्याच्या तळाला आला आहे. मुंबई निर्देशांक २७ नोव्हेंबर २०१२ नंतर प्रथमच १९ हजारापासून लांब गेला आहे. त्यावेळी ‘सेन्सेक्स’ १८८४२.०८ वर होता. तर शेअर बाजाराचा आजचा प्रवास सत्रा दरम्यान १८,९७६.९४ पर्यंत खालावला होता.
‘सेन्सेक्स’मधील २५ समभाग घसरणीत नोंदले गेले. रिलायन्स, एचडीएफसी, टाटा मोटर्स, ओएनजीसी, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, बजाज ऑटो, कोल इंडिया अशा साऱ्या आघाडय़ांच्या कंपन्यांचे समभाग मूल्य ३ ते ४ टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. मिड आणि स्मॉल कॅपमधील आपटी दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १.७६ व २.४३ टक्क्यांनी घसरले होते. एकूणच भांडवली बाजारात गुंतवणूकदारांची मालमत्ता १.०७ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ६६१.४ लाख कोटी रुपयांवर आली.

रेल्वेशी संलग्न कंपन्यांचे समभाग आपटले!
झायकॉम सिक्युरिटी        ८१.८०               ३.४१
कंटेनर कॉर्प                     १०१२.९५            २.२३
कमर्शियल इंजिनीयर्स      ३२.३५               १.४१
बारट्रॉनिक्स                     १६.१०                -०.६२
ट्रान्सफॉर्मर्स-रेक्टिफायर्स  ९९.१५           -०.७५
गेटवे डिस्ट्रिपार्क्‍स            १३३.७०            -०.८९
नेल्को                               ४०.८५           -१.२१
गॅमन इंडिया                     २७.४०             -१.७९
मिक इलेक्ट्रॉनिक्स           ४.६६               -१.८९
बीईएमएल                      २४१.६५            -२.८०
एआरएसएस इन्फ्रा           ३७.०५            -४.७६
टिटागढ वॅगन्स                २४५.४५            -८.१४
हिंद रेक्टिफायर्स                ६०.५०            -८.८२
टेक्समॅको रेल                    ५४.६०            -११.३६
कालिंदी रेल                        ७०.३५            -११.६२
कर्नेक्स मायक्रो                  ४४.३०            -१५.१३
स्टोन इंडिया                       १९.९०             -१६.२१

मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प सुरू होण्यापूर्वीपासून भांडवली बाजारात रेल्वेशी निगडित समभाग सकाळच्या सत्रात घसरलेलेच होते. प्रत्यक्ष अर्थसंकल्प संसदेत मांडला जात असताना घसरण वाढतच गेली. मालवाहतुकीत ५ टक्क्यांहून अधिक दरवाढ जाहीर झाल्याने संबंधित समभागांचे मूल्य दुहेरी आकडय़ांत आपटी खाताना दिसले. प्रमुख निर्देशांकात दीड टक्क्यांची घसरण असताना, दिवसअखेर रेल्वे सेवांशी संबंध येणाऱ्या कंपन्यांचे समभाग मूल्य मात्र १६ टक्क्यांपर्यंत आपटले. स्टोन इंडिया १६.२१ टक्क्यांसह नुकसानात सर्वात आघाडीवर होता. तर कर्नेक्स मायक्रोसिस्टिम्स, कालिंदी रेलनिर्माण अनुक्रमे १५.१३ आणि ११.६२ टक्क्यांपर्यंत घसरले. रेल्वेसाठी पायाभूत उद्योग टेक्समॅको रेल ११.३६ टक्क्यांनी आपटला. हिंद रेक्टिफायर्स, टिटागढ व्हॅगन्स, बीईएमएल यांनीही जबर घसरण नोंदविली.

First Published on February 27, 2013 12:04 pm

Web Title: bse sensex falls to 3 month low blue chip cos hit by rail budget
  1. No Comments.