केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. सर्वसामान्यांनावर कराचा बोजा पडू न देता समतोल अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे तर विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावरुन सरकारवर टीका केली आहे. खास करुन खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या सरकारच्या निर्णयावरुन विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. असं असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या खास शैलीमध्ये अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. हा देशाचा अर्थसंकल्प आहे की ओएलएक्सवरची जाहिरात असा टोला जगताप यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.

नक्की वाचा >> “रामाच्या भारतात पेट्रोल ९३ रुपये लिटर तर रावणाच्या लंकेत ५१ रुपये लिटर”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण, पॉवर ग्रीड, रेल्वे, विमानतळ, शीतकोठारे, क्रीडांगणे आदी सरकारी अखत्यारीतील कंपन्या व आस्थापनांच्या मालमत्तांच्या व कामांच्या व्यवस्थापनांची जबाबदारी खासगी क्षेत्राकडे देण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी दिली. सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला गती देऊन १.७५ लाख कोटींचा निधी उभारला जाईल, असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षी २.१ लाख कोटींचे लक्ष ठेवले गेले होते, पण बीपीसीएल व एलआयसीच्या निर्गुतवणुकीचा प्रयत्न अपयशी ठरल्याने हे लक्ष साध्य करता आलं नाही. या वर्षी ‘एलआयसी’च्या आरंभिक खुल्या विक्रीचा प्रस्ताव (आयपीओ) आणला जाणार असून त्याद्वारे भांडवल उभारणी केली जाईल तसेच सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका व सरकारी विमा कंपनीचेही खासगीकरण केले जाईल अशी घोषणाही निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये केली आहे.

नक्की वाचा >> “आहो मामी… ज्यांना फोटोचं स्पेलिंग येत नाही ते…”; अमृता फडणवीस ‘त्या’ वक्तव्यामुळे झाल्या ट्रोल

या खासगीकरणाच्या मुद्दयावरुनच भाई जगताप यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. “हा देशाचा अर्थसंकल्प आहे की ओएलएक्सवरची जाहिरात? यांना शक्य झालं तर संसदही विकतील,” असं ट्विट जगताप यांनी केलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पातील खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन सोमवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एक विमा कंपनी यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या भागभांडवलाची विक्री करून सरकारने भारताची मालमत्ता भांडवलदार मित्रांच्या हाती सुपूर्द करण्याची योजना आखली आहे, असा टोला राहुल यांनी लगावला.

नक्की वाचा >> बजेट सादर होताना ज्या अदानींच्या नावे संसदेत विरोधकांनी गोंधळ घातला, ते अदानी म्हणतात…

इंधन दरवाढीवरुन जगताप यांचा मोदी सरकारला टोला

शेती क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर उपकर घेतला जाणार असल्याच्या निर्णय़ावरुनही जगताप यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “६५ वर्षात ६५ रुपयांना मिळणारे पेट्रोल ६५ महिन्यांत शंभरी जवळ गेलंय,” असं ट्विटही जगताप यांनी केलं आहे.

 

नक्की वाचा >> Budget 2021 : “पेट्रोल-डिझेल १००० रुपये लिटर करुन मोदी सरकारला लोकांना मारायचं असेल”

उपकर वाढवण्यात आला असला तरी उत्पादन शुल्कात कपात झाल्यामुळे वाढीव अधिभाराचा भरूदड मध्यमवर्गाला बसणार नाही, असा दावा सरकारने केला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरीलमूलभूत उत्पादन शुल्क आणि विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्काचे दर कमी करण्यात आले आहेत. उपकर वाढवण्यात येण्याची बातमी समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही पेट्रोल-डीझेलचे दर वाढणार नसून याचा सर्वसामान्यांना फटका बसणार नाहीय, असं स्पष्ट केलं आहे.