आज किरकोळ गुंतवणूकदारांना खरेदीची संधी
निर्गुतवणुकीसाठी भांडवली बाजारात उतरलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘कॉन्कॉर’ला बुधवारी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार संस्थांकडून दुप्पट प्रतिसाद मिळाला. कंपनीने फेरविक्रीकरिता सादर केलेल्या ७७.८० लाख समभागांच्या तुलनेत १.५८ कोटी समभागांची मागणी पहिल्या काही तासातच नोंदविली गेली.
कंपनीतील ५ टक्के हिस्सा कमी करण्याच्या माध्यमातून सरकार १,१६५ कोटी रुपये उभारण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीने समभागाकरिता १,१९५ रुपये किंमत प्रस्तावित केली होती. तुलनेत त्याला गुंतवणूकदार संस्थांकडून १,१९६.१२ रुपयांपर्यंत मागणी नोंदली गेली. एकूण ९७.४८ लाख समभाग जारी करण्यात येत आहेत.
कंपनीच्या भागविक्रीची बुधवारची प्रक्रिया गुंतवणूकदार संस्था वर्गासाठी राखीव होती. तर गुरुवारी किरकोळ गुंतवणूकदारांना या प्रक्रियेत भाग घेता येईल. जारी करण्यात येणाऱ्या एकूण समभागांपैकी २० टक्के समभाग किरकोळ गुंतवणूकदारांना घेता येणार आहेत. त्यांना १९.४० लाख समभागासाठी नोंदणी करता येईल. त्यांच्यासाठी जारी केलेल्या समभाग मूल्यात ५ टक्के सवलत देण्यात आली आहे.
गेल्या शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात १,२२६.६५ रुपयांवर स्थिरावलेला समभाग गुंतवणूकदारांना २.५८ टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कंपनीत सरकारचा ६१.८० टक्के हिस्सा आहे. निर्गुतवणुकीच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत १८,००० कोटी रुपये उभारणाऱ्या सरकारचे २५,००० कोटी रुपयांचे लक्ष्य ‘कॉन्कॉर’मार्फत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यमान आर्थिक वर्षांतील ‘कॉन्कॉर’ ही सरकारची निर्गुतवणूक प्रक्रियेतील सातवी कंपनी आहे. यापूर्वी आयओसी, आयईएल, पीएफसी, आरईसी, ड्रेजिंग कॉर्पोरेशनमध्ये निर्गुतवणूक झाली आहे. गेल्याच महिन्यात एनटीपीसीतील ५ टक्के निर्गुतवणुकीची प्रक्रिया राबविली होती.

‘पाव टक्का दर कपात निश्चित’
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />रिझव्‍‌र्ह बँक पाव टक्का दर कपात करेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच’ने व्यक्त केला आहे. ही दर कपात रिझव्‍‌र्ह बँकेच्या ५ एप्रिलच्या पतधोरणापूर्वीही जाहीर होऊ शकते, असाही तिचा कयास आहे.
आपल्या अहवालात, २०१६-१७ करिता रिझव्‍‌र्ह बँकेला ३० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेत आणावे लागतील, असे संस्थेने म्हटले आहे. येत्या आर्थिक वर्षांत याबाबत ५.५ टक्के वाढ राखायची असेल तर रिझव्‍‌र्ह बँकेला दर कपातीची पावले उचलावी लागतील. रिझव्‍‌र्ह बँकेने खुल्या बाजारातून सरकारी रोखे खरेदी करत १५,००० कोटी रुपयांची उभारणी करण्याचे निश्चित केले आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींची वाट पाहण्याचे धोरण अवलंबिताना रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच्या, २ फेब्रुवारीच्या पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते.