आशियाई बाजारांसह विकसित भांडवली बाजारांनाही ‘काळ्या’ सोमवारचा कित्ता गिरविण्यास भाग पाडणारे चिनी निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी आपटते राहिले. सोमवारच्या व्यवहारात दुहेरी आकडय़ांपर्यंत आपटी अनुभवणाऱ्या येथील प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारअखेर ८ टक्क्यांपर्यंतची घसरण राखली.
आशियातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती बँकेने मंगळवारी तिचे व्याजदर पाव टक्क्याने कमी केले. निवृत्ती निधीतील रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्याच्या चिनी सरकारने गेल्या सप्ताहअखेरीस घेतलेल्या निर्णयाचे विपरीत पडसाद सोमवारी उमटले होतेच. चिनी बाजारांनी दर कपातीबाबतही तीच प्रतिक्रिया दिली.
शांघाय कंपोझिट निर्देशांक मंगळवारी ७.६३ टक्क्यांनी कोसळत गेल्या आठ वर्षांच्या तळात आला. त्यातील सोमवारची आपटीही ८.४९ टक्क्यांची होती. शेनझेन कंपोनंट निर्देशांकही ७.०४ टक्क्यांनी घसरला. देशांतर्गत युआनचे डॉलरच्या तुलनेतील ४ टक्क्यांपर्यंतच्या अवमूल्यनातून चिनी अर्थव्यवस्था अद्यापि सावरलेली नाही.
दरम्यान भांडवली बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी आपटी अनुभवली जात असतानाच चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायना या मध्यवर्ती बँकेने तिच्या व्याजदरात पाव टक्क्यापर्यंत कपात केली. सरकारी बँकेने राखीव आवश्यक प्रमाण (आरआरआर) ४.६० टक्क्यांवर आणून ठेवले आहे. त्याचबरोबर ठेवींवरील दरातही याच प्रमाणात कपात करत ते १.७५ टक्के केले आहेत.
नव्या दर कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासूनच होऊ घातली असून आरआरआर हा वित्तीय संस्था, कंपन्या यांच्यासाठीचा कर्जावरील व्याजदर आहे. ठेवींवरील व्याजदरासाठीची एक वर्षांची मर्यादाही शिथिल केली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने ६ सप्टेंबर २०१४ पासून वित्त संस्थांकरिताचे हे दर अध्र्या टक्क्यापर्यंत कमी केले आहेत.
चिनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपात केल्याचे मानले जाते. चिनी निर्मिती क्षेत्राने ऑगस्टमध्ये मार्च २००९ नंतरचा सुमार प्रवास नोंदविला आहे. जूनपासून चीनमधील भांडवली बाजारात निधी गळती असून चार लाख कोटी डॉलर काढून घेण्यात आले आहेत.