स्थावर मालमत्ता क्षेत्रात विशेषत: निवासी मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत दलालीच्या अद्ययावत प्रणालीचीरुजुवात करणाऱ्या उत्तर अमेरिकेतील अग्रणी ब्रॅण्ड ‘कोल्डवेल बँकर’ने देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरापासून पदार्पणाची घोषणा केली आहे. मुंबईत सध्या ८ फ्रँचाइजी धाटणीच्या शाखांपासून सुरुवात करीत, आसपासच्या ठाणे-नवी मुंबईसह वर्षभरात ३० हून अधिक शाखांचे लक्ष्य कोल्डवेल बँकरने निश्चित केले आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्र कात टाकत असून, अनेक टाटा, गोदरेज, महिंद्रसह अनेक कॉर्पोरेट नाममुद्रा येथे स्थिरावत आहेत, बांधकाम क्षेत्रानेही अद्ययावत धाटणी अंगीकारली आहे, त्या तुलनेत विक्रीचे क्षेत्र आजही फुटकळ दलाल आणि स्थानिक मध्यस्थांवर विसंबून होते. ‘कोल्डवेल बँकर’च्या प्रवेशाने ही उणीवही भरून निघेल, असा विश्वास कंपनीचे संचालक विशाल मलिक यांनी व्यक्त केला. मुंबई व परिसरातील २०० हून अधिक प्रकल्पांतील उपलब्ध निवासी मालमत्ता त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, उत्तरोत्तर त्यात वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांच्या मालमत्ता विक्री करायच्या त्या बिल्डरची पाश्र्वभूमी, प्रकल्पांची कायदेशीर मान्यता, परवाने-मंजुऱ्यांचे दस्तऐवज यांची चाचपणी कोल्डवेल बँकर्सकडून केली जाते, त्यामुळे ग्राहकाच्या दृष्टीने संपूर्ण सुरक्षित व पारदर्शक व्यवहाराची खातरजमा होते. शिवाय बँकांबरोबर अर्थसाहाय्यासाठी सामंजस्य, आवश्यक कागदपत्रे, मुद्रांक शुल्क व नोंदणीसाठी तत्पर साहाय्य, मॉर्गेज, विम्याबाबत सल्ला, कायदेशीर तसेच करविषयक सल्ल्याची सोय सर्व एकाच छताखाली उपलब्ध करून देणारी सेवा हे आपले वैशिष्टय़ ठरेल, असे मलिक यांनी सांगितले. या सर्व सेवा ग्राहकांना (जर खरेदीदार असेल तर) कोणत्याही दलालीविना दिल्या जातील, असेही मलिक यांनी आवर्जून सांगितले. (तपशील http://www.coldwellbanker.in वर उपलब्ध) आगामी काळात पुणे, बंगळुरू व अन्य महानगरांत विस्ताराचे आपले लक्ष्य असल्याचे मलिक यांनी सांगितले.

ग्राहकांनी घरासाठी पसंत केलेल्या मालमत्तेबद्दल अधिकाधिक माहिती व मार्गदर्शन विश्वासार्ह स्रोतांतून उपलब्ध झाल्यास, खरेदीबाबतचा निर्णयही ते आत्मविश्वासाने घेतात असे आढळून आले आहे.
– विशाल मलिक, संचालक, कोल्डवेल बँकर.