मुंबई : येथील भांडवली बाजारातील निर्देशांक घसरण सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना सरकारला भरावयाच्या महसुली रकमेबाबतच्या अनिश्चिततेने गुंतवणूकदारांनी बाजारात पुन्हा एकदा समभाग विक्रीचा सपाटा लावला.

त्याचबरोबर जागतिक स्तरावरील आर्थिक वातावरणानेही बाजारात गुंतवणूकदारांमध्ये धास्ती निर्माण केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २०२.०५ अंश घसरणीसह ४१,०५५.६९ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६७.७५ अंश घसरणीने १२,०४५.८० पर्यंत येऊन स्थिरावला.

व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल सरकार दफ्तरी रक्कम जमा करणार असल्याच्या वृत्ताने सुरुवातीला बाजारात निर्देशांक तेजी नोंदली जात होती. मात्र मुदत जवळ येत असल्याने व तुलनेत दूरसंचार कंपन्यांची रक्कम कमी असल्याबाबतची अस्वस्थता बाजारात अखेरच्या क्षणापर्यंत उमटू लागली.

सत्रात जवळपास ४०० अंश उसळी घेणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर मात्र, शुक्रवारच्या तुलनेत जवळपास अर्ध्या टक्क्याने खाली आला. निफ्टीतील घसरण पेक्षा अधिक राहिली.

सेन्सेक्समध्ये ओएनजीसी सर्वाधिक, ३.२० टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर सन फार्मा, एनटीपीसी, बजाज ऑटो, एचडीएफसी लिमिटेडही घसरले. तर टायटन कंपनी, नेस्ले इंडिया, टीसीएस, कोटक महिंद्र बँक, टाटा स्टील यांचे मूल्य जवळपास दोन टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई निर्देशांकातील १९ कंपन्यांचे समभाग घसरले.

एमटीएनएल                     रु.९.३५           -८.१४%

व्होडाफोन आयडिया         रु.३.४२           -०.५८%

भारती एअरटेल              रु.५६५.००          -०.०२%