मार्चअखेर तिमाहीत भारतीय कंपन्यांची मागील दीड वर्षांतील हीन कामगिरी

दुरावलेले ग्राहक आणि सुटय़ा घटकाच्या किमतवाढीने बळावलेला उत्पादन खर्च याचा भारतीय कंपन्यांना मोठा जाच होत असून, आर्थिक वर्ष २०१८-१९ची चौथ्या तिमाहीअखेर कंपन्यांनी साधलेली सरासरी १० टक्क्य़ांची महसुली वाढ ही त्यांची आधीच्या सहा तिमाहीच्या तुलनेत सर्वात खराब कामगिरी ठरली असल्याचे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालातून पुढे आले आहे.

उल्लेखनीय म्हणजे ग्राहकोपयोगी उत्पादनांशी निगडित कंपन्यांची मार्च २०१९ अखेर तिमाहीतील महसुली वाढ ही अवघी ३.८ टक्के इतकी आहे. तर जानेवारी-मार्च २०१९ तिमाहीत वस्तू-निगडित उद्योगातील कंपन्यांतील महसुली वाढ ही १२.४ टक्के अशी आहे, असे ‘इक्रा’द्वारे संकलित या अभ्यास अहवालाने निरीक्षण नोंदविले आहे. प्रवासी वाहने, दुचाकी त्याचप्रमाणे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, तर कैक ग्राहक उत्पादनांनाही बाजारात मागणी नसल्याचे सुस्पष्टपणे दिसत आहे आणि ही ग्राहकांमधील ही खरेदीसंबंधाने उदासीनतेची स्थिती शहरी तसेच ग्रामीण दोन्ही ठिकाणी सारखीच आहे, असे इक्राचे उपाध्यक्ष (कॉर्पोरेट रेटिंग्ज) शमशेर दिवाण यांनी सांगितले.

मार्च तिमाहीत तुलनेने कामगिरीत चांगली सुधारणा असलेल्या उद्योग क्षेत्रांमध्ये प्रवासी विमान सेवेतील कंपन्या, सीमेंट कंपन्या, खाद्यान्न कंपन्या व अन्य उपभोग्य वस्तू निर्मात्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी योग्य समयी किमतीत वाढ केल्याने त्यांच्या नफाक्षमतेवरील परिणाम किमान राहिल्याचे दिसून आल्याचे दिवाण यांनी स्पष्ट केले.

वित्तीय क्षेत्र तरलतेअभावी त्रस्त असताना, वाहनांसह अनेक उपभोग्य वस्तू व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी पूर्वी सुलभपणे उपलब्ध असलेला पतपुरवठा लक्षणीय प्रभावित झाला आहे. बाजारात मागणी मंदावण्याचे हेही एक प्रमुख कारण असून, यापुढे काही काळ त्याचा जाच कंपन्यांच्या ताळेबंदालाही सोसावा लागेल, असा इक्राचा कयास आहे.