रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची ग्वाही

रिझव्‍‌र्ह बँक ही प्रदीर्घ आणि समृद्ध वारसा असणारी देशातील महत्त्वाची संस्था असून, तिची स्वायत्तता, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कायम राखण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही रिझव्‍‌र्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून बुधवारी सूत्रे हाती घेतल्यानंतर शक्तिकांत दास यांनी सांगितले. सरकारसह सर्व सहभागी घटकांशी सल्लामसलतीसह, रिझव्‍‌र्ह बँक कायद्याच्या कक्षेत राहून अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेसाठी आवश्यक ते काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऊर्जित पटेल यांच्या अकस्मात राजीनाम्यानंतर, मंगळवारी केंद्र सरकारकडून नियुक्तीची घोषणा करण्यात आलेले निवृत्त सनदी अधिकारी दास यांनी लागलीच बुधवारी मुंबई रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुख्यालयात येऊन गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर आयोजित आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्तता आणि प्रतिष्ठेशी तडजोड होईल, असा कोणताही कारभार केला जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. तथापि, त्यांचे पूर्वसुरी ऊर्जित पटेल यांना द्यावा लागलेला राजीनामा, केंद्र सरकारशी मतभेदाच्या त्या निमित्ताने होत असलेल्या चर्चा या संबंधाने पुढे आलेल्या प्रश्नांना बगल देणे त्यांनी पसंत केले. ऊर्जित पटेल यांनी मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व आणि केलेल्या कामगिरीचे मात्र त्यांनी कौतुक केले.

‘‘रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकारदरम्यान संबंधाचे मुद्दे आणि त्या संबंधाने सुरू असलेल्या राजकीय वादंगांवर मला कोणतेही भाष्य करायचे नाही. मात्र प्रत्येक संस्थेने तिचे स्वातंत्र्य जपलेच पाहिजे, त्याच वेळी उत्तरदायित्वही पाळले पाहिजे. धोरणकर्ते या नात्याने अर्थव्यवस्थेच्या सांभाळाची सर्वात मोठी जबाबदारी सरकारकडून पाहिली जाते आणि सरकारशी सल्लामसलत सुरू राहिलीच पाहिजे,’’ अशी दास यांनी स्पष्टोक्ती केली.

येत्या दोन दिवसांत प्रथम मुंबईत मुख्यालय असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख, त्यानंतर मुंबईबाहेरील बँकांच्या प्रमुखांशी सल्लामसलतीसाठी बैठका घेण्याचे, पुढे जाऊन खासगी क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. बँकांचे सध्याचे प्रश्न, मुख्यत: रोकडतरलतेची स्थिती, अर्थव्यवस्थेविषयी त्यांची मते जाणून घेण्यासाठी या बैठका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.