बँक क्षेत्रातील सर्वात मोठय़ा आर्थिक घोटाळ्याचा केंद्रबिंदू असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या १०,००० हून अधिक डेबिट तसेच क्रेडिट कार्डधारकांविषयीची माहिती गेल्या तीन महिन्यांपासून संकेतस्थळावर ‘विकली’ जात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.

‘एशिया टाइम्स’च्या हवाल्याने ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेने याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.

हिरे व्यापारी नीरव मोदीद्वारे ११,४०० कोटी रुपयांना फसविले गेलेल्या धक्क्यातून पीएनबी सावरण्यापूर्वीच कार्डाची माहिती चोरीला जाण्याचा प्रकार आठवडय़ाच्या आत समोर आला आहे. पीएनबीने मात्र या वृत्ताबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

‘आधार’ची माहिती विकली जाण्याच्या प्रकाराची दखल सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वीच घेतली आहे.

पीएनबीच्या १०,००० हून अधिक कार्डधारकांचे नाव, पत्ते तसेच कार्डविषयक मुदत संपण्याचा कालावधी वगैरे माहिती संकेतस्थळावरून उपलब्ध झाली असल्याचा वृत्तसंस्थेचा दावा आहे. कार्डामागील ‘सीव्हीव्ही’ क्रमांकही संकेतस्थळाला विकण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

पीएनबी घोटाळ्याचा ‘पीडब्ल्यूसी’कडे तपास?

नीरव मोदी प्रकरणात पीएनबीने ‘प्राईस वॉटरहाऊस कूपर (पीडब्ल्यूसी)’ला आर्थिक ताळेबंद तपासाची सूत्रे सोपविली असल्याचे कळते. मोदीच्या विरोधात कडक कारवाई करता यावी याकरिता ठोस पुरावे जमविण्यासही या आंतरराष्ट्रीय लेखापरीक्षण कंपनीला सांगण्यात आले आहे. नीरव मोदी तसेच त्याचा मामा मेहुल चोक्सी, या दोघांच्या कंपन्यांचीही माहिती घेतली जाणार आहे.