तीन सत्रांतील निर्देशांक वाढीला बुधवारी बसलेला अडथळा गुरुवारी बाजूला सरला.  महिन्याच्या अखेरचा गुरुवार अर्थात सौदापूर्तीनिमित्त उलाढाल रोडावल्याने दिवसभर सपाट राहिलेल्या निर्देशांकाला, विशेषत: वाहन कंपन्यांच्या समभागांची खरेदी करत गुंतवणूकदारांनी शेवटच्या अध्र्या तासात आठवडय़ाच्या उच्चांकावर नेऊन ठेवले. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या शुक्रवारी जाहीर होत असणाऱ्या आकडय़ांवर नजर ठेवत गुंतवणूकदारांची साशंकतेचीही बाजारावर छाया दिसून आली. अंतिम टप्प्यातील खरेदीमुळे सेन्सेक्स कालच्या तुलनेत ६७.७६ अंश वाढीने २०,२१५.४० वर, तर निफ्टी १९.७५ अंश वधारणेने ६,१२४.०५ वर बंद झाला. सलग तीन व्यवहारांतील वाढीला भांडवली बाजारात बुधवारी पायबंद बसला होता. गुरुवारी सकाळच्या वेळीही हेच वातावरण कायम होते. आर्थिक सहकार्य व विकास संघटनेने ‘क्यूई-३’ गुंडाळू नयेत व चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या भाष्याने बाजारावरील तणाव दुपापर्यंत कायम राहिला. तथापि टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रसारख्या कंपन्यांनी गेल्या तिमाहीतील नफ्यातील घसरणीची नोंद केली आहे. असे असूनही उभय कंपन्यांच्या समभागांसह सेन्सेक्सही व्यवहाराच्या शेवटच्या क्षणी उंचावला. यामुळे मुंबई निर्देशांकाने २० मे २०१३ रोजीचा २०,२२४ हा वरचा टप्पा पुन्हा गाठला.